विनामूल्य असूनही भाविकांकडून पैसे घेणार्‍या ई-रिक्शा चालकावर मंदिर समितीकडून कार्यवाही !

ए-आय निर्मित छायाचित्र

पंढरपूर – ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’च्या वतीने वयोवृद्ध, दिव्यांग (अपंग) आणि गरोदर महिला भाविकांसाठी मंदिर परिसरात विनामूल्य ई-रिक्शा सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेसाठी ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या आस्थापनाच्या माध्यमातून कंत्राटी चालक नियुक्त करण्यात आले आहेत. यातील कंत्राटी चालक श्री. कुणाल राजेंद्र घोडके यांनी भाविकांकडून पैसे स्वीकारल्याचा प्रकार १५ मेच्या रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ‘श्री संत नामदेव पायरी’ येथील मुखदर्शन रांगेच्या प्रवेशद्वार क्रमांक १ येथे सीसीटीव्ही. चित्रीकरणात उघडकीस आला. ही सेवा विनामूल्य असतांना संबंधित चालकाने पैसे स्वीकारल्याने मंदिरे समितीने संबंधित कर्मचार्‍याची सेवेवर तात्काळ समाप्तीची कार्यवाही चालू असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची कारवाई समितीकडून चालू आहे. ‘याचसमवेत पुणे येथील ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या आस्थापनाला ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे,’ अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. प्रवीणकुमार घम यांनी दिली.