संपादकीय : ट्रम्प-जिनपिंग यांची अविश्वासाची भेट !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचा १३ ते १५ मे या कालावधीत चीनचा दौरा पूर्ण झाला. या दौर्‍यात काय साध्य झाले किंवा झाले नाही, यांपेक्षा द्वयींनी एकमेकांचा अपमान केल्याच्या बातम्या मात्र एक एक करून बाहेर येत आहेत. यापूर्वी वर्ष २०१७ मध्ये ट्रम्प यांनी चीनला भेट दिली होती. यावर्षी ट्रम्प यांचे चीनमध्ये आगमन झाल्यावर स्वत: राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग त्यांच्या स्वागताला गेले नाहीत. त्यांनी उपराष्ट्राध्यक्षांना पाठवले. गत वेळी जेव्हा उत्तर कोरियाचे हुकूमशहा किंम जोंग उन हे चीनच्या दौर्‍यावर गेले तेव्हा मात्र स्वत: राष्ट्राध्यक्ष जिनपिंग त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेले होते. ट्रम्प आणि जिनपिंग या दोघांच्या भेटीचे, म्हणजे हस्तांदोलन करतांनाचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले. त्यातही त्यांच्यात मोकळेपणा नाही, कुणी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरा त्याला दूर लोटत आहे किंवा आणखी झुकण्यास भाग पाडत आहेत, असे या व्हिडिओमध्ये दिसत होते. ट्रम्प यांनी तैवानचे सूत्र उपस्थित केल्यावर चीनने अतिशय आक्रमक सूत्रे मांडल्यामुळे दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचे समजते. चीन तैवानविषयी पुष्कळच आक्रमक आणि आग्रही आहे. पुढील महत्त्वाचे, म्हणजे जेव्हा परतीच्या प्रवासासाठी ट्रम्प विमानात चढल्यावर पुढील अर्ध्या मिनिटामध्येच म्हणजे विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच चीनने विमानतळावरील सर्व गोतावळा आवरलाही ! दुसर्‍या बाजूला चीनने दिलेल्या भेटवस्तू ट्रम्प प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी विमानात चढण्यापूर्वीच कचरापेटीत फेकल्या, तसेच समवेत आणलेले भ्रमणभाष, भ्रमणसंगणक आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणेही विमानात चढण्यापूर्वीच नष्ट केली. चीनच्या हेरगिरीची अमेरिकेलाही केवढी धास्ती ! केवढा हा एकमेकांविषयीचा आदर, विश्वास ! एकूणच दोन अविश्वासू बलाढ्य देशांची कोणत्या विश्वासाने ही भेट पार पडली, हेच मुळी शोधावे लागेल.

निष्फळ भेट !

अमेरिका आणि चीन एकमेकांना कायम पाण्यात पहातात. ज्या अमेरिकेने जगभरात साम्यवाद फोफावू नये म्हणून जगातील अनेक देशांतील व्यवस्था उद्ध्वस्त केल्या, त्या अमेरिकेचे साम्यवादी व्यवस्था असणारा सध्याचा जगातील मुख्य देश चीनशी कसे जमेल ? केवळ स्वार्थी हेतूने आणि ‘चीनला अमेरिकी हिताच्या निर्णयांसाठी सहज वाकवू शकू’, या ट्रम्प यांच्या गुर्मीमुळे म्हणा अमेरिकेने चीनची भेट घेतली; मात्र ‘तेलही गेले तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले’, अशी काहीशी अवस्था अमेरिकेची झाली. इराणच्या संदर्भातील कोंडी फोडण्यासाठी चीनने स्वत:चे वजन वापरावे, असे अमेरिकेचे म्हणणे होते. याविषयी चीनने कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. चीनच्या दृष्टीने तैवान हा मुख्य विषय आहे, म्हणजे तैवानला चीन नियंत्रित करू पहातो, तैवानच्या स्वतंत्र रहाण्याला किंवा त्याच्या स्वातंत्र्याला चीनच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. चीन हा तैवानला ‘ग्रेटर चायना’ किंवा ‘वन चायना पॉलिसी’ यांनुसार स्वतःचा अविभाज्य भाग समजतो. त्याविषयी अमेरिका अथवा अन्य कुणाचीही लुडबुड चीनला मान्य नाही. तैवानचे म्हणणे आहे की, त्यांचे प्रतिनिधी वॉशिंग्टनच्या संपर्कात आहेत. त्यातही पहिल्यांदा जेव्हा ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले होते, तेव्हा ट्रम्प यांनी थेट तैवानच्या राष्ट्राध्यक्षांना संपर्क करून चीनचा पुरता तीळपापड केला होता. तैवानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा अमेरिकाच करते आणि त्याविषयी चीन संतप्त आहेच. अमेरिका तैवानला एकप्रकारे पाठिंबा देते, म्हणजे तैवानच्या स्वातंत्र्याला तिची संमती आहे, हे अधोरखित होते आणि हेच चीनला खटकते. चीनला आशियामध्ये स्वत:चा एकछत्री अंमल हवा आहे. चीनचा असा एकही शेजारी नाही, ज्याच्यासमवेत चीनचा सीमावाद नाही. सीमावाद नसला, तरी तो सीमावाद असल्याप्रमाणे विषय घेतो आणि लावूनही धरतो. अरुणाचल प्रदेशाविषयी चीन सातत्याने करत असलेल्या आगळिकीविषयी भारत परिचित आहेच. भारताने सातत्याने याचा चीनकडे निषेध नोंदवला आहे; मात्र त्यावर या पोकळ निषेधाचा काही परिणाम होत नाही.

दोन वाईटांमध्ये श्रेष्ठ कोण ? 

चीनचा विचार केला, तर त्याला कपटी, धूर्त, क्रूर, साम्राज्यवादी इत्यादी विशेषणे लागू पडतात, तर अमेरिकेचा विचार करता स्वार्थांध, कपटी, धूर्त, साम्राज्यवादी आणि वर्चस्ववादी मानसिकता इत्यादी दुर्गुण लागू पडतात, म्हणजे चीन आणि अमेरिका हे एकसारखीच वाईट मानसिकता असलेले देश आहेत. ते एकत्र येऊन काय हशील होणार ? जागतिक स्तरावर प्रसारमाध्यमांसमोर अमेरिका अाणि चीन यांच्यात चांगली बोलणी झाली, सकारात्मक चर्चा, दोन्ही बाजूंकडून चांगली पावले उचलली, अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. असे असले, तरी खरी स्थिती काय आहे, हे जाणकारांकडून सामाजिक माध्यमांतून लिखाण आणि व्हिडिओ यांद्वारे या भेटीचे योग्य विश्लेषण करण्यात येत आहे. यातून या भेटीतून काहीही निष्पन्न झालेले नाही, असे आता स्पष्ट होत आहे. बंद दाराआड दीड-दोन घंटे जी चर्चा झाली, त्यामुळे तर आणखी संशय ! यामध्ये ट्रम्प तर विक्षिप्त मानसिकता असलेले आणि बोलणे अन् वागणे यांवर ताळतंत्र नसलेले नेते आहेत, हे त्यांनी स्वत:च इराण युद्धातील सातत्याने पालटत्या भूमिका आणि चुकीची माहिती यांवरून दिसून येते. चीनच्या जिनपिंग यांचे जीवनच गुलदस्त्यात असते ! ते मध्यंतरी काही महिने सार्वजनिक जीवनातून गायबच झाले होते. त्यामुळे ते गंभीर आजारी असल्याचे किंवा त्यांनी राजकीय जीवनातून संन्यास घेतल्याच्याच बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्या कालावधीत चीनच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना कामावरून काढले, काहींच्या हत्या झाल्या, त्यानंतर ते एकाएकी रुजू होऊन त्यांनी कार्यभार हाती घेतला. एकूण सर्वच संशयाचे वातावरण निर्माण करणारे ! असा चीन महासत्ता म्हणून मिरवणार्‍या अमेरिकेला बधेल का ? अमेरिकेला आशियामध्ये तिच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी चीनचाच मोठा अडथळा आहे. चीनने इराणला साहाय्य करू नये म्हणून अमेरिकेने चीनला गंभीर परिणामांची धमकी दिल्यावर लगोलग चीननेही ‘आमच्याकडे हायड्रोजन बाँब अाहे, तो टाकल्यावर भयंकर विध्वंस घडेल’, अशी धमकी दिली होती. अमेरिका आणि चीन यांच्यात उघड शत्रूत्व नसले, तरी शीतयुद्धाप्रमाणे स्थिती आहे. ‘अमेरिकेने चीनच्या संदर्भात काही जरी चूक केली, तर त्याचे अमेरिकेला भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात’, हेच चीनच्या धमकीतून स्पष्ट होते. चीनचा रशियानंतर जागतिक वातावरणात दबदबा वाढत आहे. चीन अमेरिकेसारख्या धमक्या देत न बसता गुप्त रणनीती आखून थेट कृती करतो. त्याच्या साम्राज्यवादी मानसिकतेसाठीही अमेरिकाच सर्वांत मोठा अडथळा आहे. अशा प्रकारे एकमेकांना पाण्यात पहाणार्‍यांची भेट म्हणजे जगाच्या डोळ्यांत निव्वळ धूळफेक आहे. जगाने या दोन्ही कपटींपासून सावध रहाणेच हिताचे आहे !

क्रूर चीन आणि कपटी अमेरिका एकत्र आले, तर ते जगाचे सोडाच; पण स्वहितही न साधता विध्वंसच करतील !