Kerala CM Suspense : केरळमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री ठरेना !

(डावीकडून) व्ही.डी. सतीशन्, के.सी. वेणुगोपाल व रमेश चेन्निथला

थिरूवनंतरपूरम् (केरळ) – राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणीत आघाडीला सत्ता मिळूनही अद्याप मुख्यमंत्री म्हणून कुणाचीच घोषणा करण्यात आलेली नाही. कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री करावे, याविषयी काँग्रेस पक्षाचा निर्णय अद्याप झालेला नाही. या संदर्भात काँग्रेसकडे ११ दिवसांचा कालावधी आहे; कारण केरळ विधानसभेची मुदत २३ मे या दिवशी संपणार आहे. विविध कारणांमुळे सरकार स्थापन होऊ न शकल्यास अशा परिस्थितीत कलम ३५६ अंतर्गत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते.

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडण्यात काँग्रेसला विलंब का होत आहे ?

केरळ विधानसभेच्या एकूण १४० जागा आहेत. त्यांपैकी काँग्रेसने ६३ जागा जिंकत सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या आघाडीला केरळमध्ये ९२ जागांसह बहुमत मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे; परंतु केरळमध्ये काँग्रेसच्या ३ मुख्य नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस वाढली आहे. काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन् हे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रसिद्ध आहेत, के.सी. वेणुगोपाल हे नव्याने निवडून आलेल्या आमदारांमध्ये प्रसिद्ध आहेत, तर रमेश चेन्निथला हे काँग्रेसचे केरळमधील सर्वांत ज्येष्ठ नेते आहेत. के.सी. वेणुगोपाल यांची मुख्यमंत्रीपदावर नियुक्ती केल्यास आणखी एक छोटीशी अडचण असेल, ती म्हणजे वेणुगोपाल हे सध्या केरळ विधानसभेचे आमदार नाहीत. त्यांना ६ महिन्यांत आमदार म्हणून निवडून यावे लागेल. या तिघांपैकी कुणाला मुख्यमंत्रीपदावर बसवायचे यावर काँग्रेसच्या अध्यक्षांकडून निर्णय घेण्यास विलंब होत आहे.