सनातनच्या साधकांचे सुयश !

कर्णावती येथील सनातनची साधिका कु. लक्ष्मी धारप हिचे इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील सुयश !

कु. लक्ष्मी धारप

गुजरात – कर्णावती येथील सनातनची साधिका कु. लक्ष्मी शैलेंद्र धारप हिला गुजरात बोर्डाच्या इयत्ता १२ वी कला शाखेच्या परीक्षेत ८३ टक्के गुण मिळाले. तिने त्याचे श्रेय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दिले आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. तिने कोणत्याही शिकवणीविना किंवा मार्गदर्शनाविना अनेक अडचणींना धैर्याने तोंड देत निष्ठेने आणि नामजप करत अभ्यास केला.


रायगड येथील सनातनची साधिका कु. श्रुती किचंबरे हिचे पदवी परीक्षेत सुयश !

कु. श्रुती उमेश किचंबरे

रायगड, १० मे (वार्ता.) – कळंबोली (जिल्हा रायगड) येथील सनातनची साधिका कु. श्रुती उमेश किचंबरे हिने विज्ञान शाखेच्या पदवी परीक्षेत ८७.८२ टक्के गुण प्राप्त करून सुयश प्राप्त केले. फोर्ट (मुंबई) येथील ‘द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ महाविद्यालयामध्ये ‘अकार्बनिक रसायनशास्त्र’ (इनऑर्गेनिक केमिस्ट्री) हा विषय तिने घेतला होता. ‘हे सर्व सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी करून घेतले. अभ्यासही मी साधना म्हणून करण्याचा प्रयत्न केला’, असे मत कु. श्रुती हिने सांगितले.

कु. श्रुती सनातनच्या मार्गदर्शनानुसार नामजप, प्रार्थना आदी आध्यात्मिक उपाय करते. सनातनच्या आश्रमात, तसेच घरी राहून प्रासंगिक सेवाही करते. यापूर्वी ती युवक-युवतींचा सत्संगही घ्यायची. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर तिची दृढ श्रद्धा आहे.


युवा सत्संगातील कु. प्रार्थना घाबरे हिचे इयत्ता १० वीत सुयश !

कु. प्रार्थना घाबरे

रामानंदनगर (जिल्हा सांगली) १० मे (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केल्या जाणार्‍या ‘युवा सत्संगा’त नियमित सहभागी होणारी येथील साधिका कु. प्रार्थना दिलीप घाबरे (वय १७ वर्षे) हिने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९५.४० टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. ‘पुस्तकी अभ्यासच नव्हे, तर साधनेचे बळ पाठीशी असल्यानेच यश प्राप्त करता आले’, अशी तिची श्रद्धा आहे. कु. प्रार्थना येथील ‘स्वामी रामानंद विद्यालय आणि ज्युनिअर महाविद्यालया’ची विद्यार्थिनी आहे. तिने अष्टपैलू कामगिरीने ‘आदर्श विद्यार्थिनी’ पुरस्कार प्राप्त केला आहे.

प्रार्थनाने अभ्यासाचे नियोजन करतांना युवा सत्संगात सांगितल्यानुसार आध्यात्मिक कृतींवर भर दिला. अभ्यासाला प्रारंभ करण्यापूर्वी एकाग्रता वाढवण्यासाठी ती प्रार्थना करायची आणि नंतर कृतज्ञता व्यक्त करायची. नियमित नामजपादी उपाय करणे, देवता आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करून अभ्यास करणे, या कृती तिने केल्या. ‘हे यश सर्व गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे आणि सनातन संस्थेच्या युवा सत्संगातून मिळालेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळेच शक्य झाले आहे’, असे प्रार्थना हिने सांगितले.