सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले एकमेवाद्वितीय आणि अवतारी पुरुष का ?

… मला गवसलेले पैलू !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर ज्यांची श्रद्धा आहे, ते त्यांना ‘अवतारी पुरुष’ मानतात. सनातनचे साधक त्यांना गुरुस्थानी मानतात आणि ‘त्यांच्यासारखे गुरु कुठे पाहिले नाहीत’, असा त्यांचा भाव असतो. या दोन्ही गोष्टींचे कारण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवलेली ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ आणि साधकांसाठी उपलब्ध करून दिलेली अफाट अशी गुरुसेवा ! या दोन्ही गोष्टींचे मला उमगलेले महत्त्व येथे मांडण्याचा प्रयत्न माझ्या अल्पमतीनुसार केला आहे. (या लेखात ‘प.पू. डॉक्टर’ असा उल्लेख करण्यात आला आहे, तो सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी आहे. – संकलक)

१. गुरुकृपायोग 

प.पू. डॉक्टरांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी एकदा ‘सर्वांत श्रेष्ठ योग कोणता ?’, असे विचारले. त्यावर प्रचलित ध्यानयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग यांपैकी एक न सांगता शिष्याचे श्रेष्ठतम गुण असलेल्या प.पू. डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोग’ असे उत्तर दिले. ते ऐकून प.पू. भक्तराज महाराज यांनीही ‘एकदम बरोबर’ असे म्हटले. कुठून आला हा योग ? ज्यांना ‘गुरुकृपेविना काहीच शक्य नाही’, याची अनुभूती आली होती, असे शिष्य प.पू. डॉ. जयंत आठवले यांनाच असे सुचू शकते. त्यामुळे कोणत्याही योगानुसार साधना केली, तरी ती त्या त्या योगातील गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करून गुरुकृपा साध्य केली, तरच ती फलदायी ठरते. त्यामुळेच ‘गुरुकृपायोग’ हाच श्रेष्ठ ! स्वामी विवेकानंद यांनीही भारताचे वैशिष्ट्य जगाला सांगतांना ‘भारताचे वैशिष्ट्य म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’, असेच म्हटले आहे.

२. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, यानुसार विस्तारलेले कार्य !


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अध्यात्मातील कार्य पहायला गेल्यास त्याची व्यापकता लक्षात येते. प्रारंभी केवळ प्रवचने आणि साप्ताहिक सत्संग यांद्वारे चालू झालेल्या या कार्याचा वटवृक्ष सध्या केवळ फोफावलेला नाही, तर त्याच्या पारंब्याही भूमीपर्यंत पोचून त्यांनी घट्ट पकड घेतली आहे. 


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मातील वैशिष्ट्य सांगतांना ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, असे सांगितले. ते केवळ असे सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी त्याप्रमाणे त्या त्या प्रकृतीच्या साधकांना त्यानुसार साधना उपलब्ध करून दिली. ज्याची जशी प्रकृती आणि कौशल्य, त्यानुसार ज्याला त्याला गुरुसेवा (साधना) उपलब्ध झाली. अध्यात्मप्रसार आणि साधक घडवणे, हा त्यांच्या कार्याचा पाया होता.    

कलेच्या माध्यमातून साधना

गुरुदेवांनी कलेचे शिक्षण घेतलेल्या साधकांकडून देवतांची सात्त्विक चित्रे आणि श्री गणेशाची सात्त्विक मूर्ती बनवून घेतली. रांगोळीची कला असलेल्यांना सात्त्विक रांगोळी ओळखायला शिकवली आणि देवतातत्त्व आकृष्ट करून घेणार्‍या रांगोळ्या बनवून घेतल्या. याचा समाजात प्रसार केला. देवतांच्या नामपट्ट्या आणि सात्त्विक उत्पादने (कापूर, अत्तर, उदबत्ती आदी) यांद्वारे समाजात सात्त्विकता निर्माण करण्यासाठी प्रसारात सेवा करणार्‍या साधकांना सुसंधी निर्माण केली. 

संगीत आणि नृत्य

संगीत आणि नृत्य या कला शिकलेल्यांना त्याच माध्यमातून साधना करून ईश्वरप्राप्ती करता येण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना केली. समाजातील कलाकार जोडले गेले आणि तेही साधना करू लागले.

आध्यात्मिक संशोधन

वस्तू आणि वास्तू यांचे वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करण्याची सेवा काही उच्चशिक्षित साधक आणि साधनेद्वारे सहावे इंद्रिय जागृत झालेले सूक्ष्मातील जाणणारे साधक, तसेच संत करत आहेत. हिंदु धर्मातील अनेक गोष्टी व्यक्तीतील सकारात्मकता वाढवण्यास साहाय्यभूत ठरत असल्याचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून  सिद्ध करणारे संशोधनही केले जाते. 

ग्रंथनिर्मिती

शेकडो विषयांवरील विविध भाषांतील ग्रंथनिर्मितीची सेवा कित्येक साधक करत असून ती सेवा पुढे कित्येक वर्षे चालणारी आहे. वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्म प्रायोगिक स्तरावर आणि सहजसोप्या भाषेत सांगणारे हे ग्रंथ पुढील शेकडो वर्षे समाजाला मार्गदर्शक ठरतील. ज्यांचे वर्णन काही जणांनी ‘कलियुगातील वेद’, असे केलेले आहे. ग्रंथांसाठीच्या लिखाणाचे वर्गीकरण, संकलन, रचना, चित्रे, मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ बनवणे, छपाई, विक्री अन् त्यांचा लेखाजोखा, अशा विविधांगी सेवा ग्रंथनिर्मितीत अंतर्भूत आहेत.

ध्वनीचित्रीकरण आणि जतन

आश्रमात किंवा बाहेर होणार्‍या कार्यक्रमांचे चित्रीकरण, छायाचित्रे काढणे, त्यांचे संकलन, चित्रफिती बनवणे, दुर्मिळ वस्तूंचे जतन, त्यांचे प्रदर्शन मांडणे आदी सेवा साधक करत आहेत. 

‘सनातन प्रभात’ नियतकालिके

गुरुदेवांनी चालू केलेली ‘सनातन प्रभात’ नियतकालिके ही अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांविषयी नियमित अन् सातत्याने प्रसार करणारी माध्यमेच नाहीत, तर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठांसाठी वैचारिक व्यासपीठच बनले. साधकांसाठी तर तो ‘गुरुदेवांचा संदेशवाहक’च बनला. यासाठी दैनंदिन बातम्या मिळवणे, त्यांचे मुद्रितशोधन, पानांची रचना, छपाई, वितरण आणि लेखाजोखा, अशा विविधांगी सेवा त्यात अंतर्भूत आहेत !  

पौरोहित्य आणि ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्र जाणणार्‍यांना सेवा करण्यासाठी दिशा देऊन त्याद्वारे त्यांची साधना करून घेतली. पौरोहित्यात रस असलेल्यांना त्यातील यज्ञयागाच्या प्रासंगिक सेवा, तसेच साधक-पुरोहित बनण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य

अध्यात्मातील जिज्ञासू साधना करू लागले; पण त्यातील काही जणांना लक्षात आले की, समाजात धर्माविषयी अज्ञान आहे. समाज धर्मापासून दूर जात असल्याने होणारी हानी पाहून समाजात धर्मशिक्षणाचा प्रसार, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने हिंदु जनजागृती समितीची स्थापना होऊन तिचे कार्य चालू झाले. समितीशी विविध संघटना जोडल्या गेल्या.

३. साधकांना साधनेची पर्वणी ठरलेल्या सेवा

श्री. वीरेंद्र मराठे

या विविध सेवांचा उल्लेख करण्याचे कारण एवढेच की, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ त्याप्रमाणे साधकांना त्यांच्या साधनेसाठी या सेवा उपलब्ध झाल्या. अक्षरशः शून्यातून उभे राहिलेले हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अफाट कार्य प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे ‘दुःखी होवोत जिज्ञासू । जिज्ञासू होवोत मुमुक्षू । मुमुक्षू बनोत साधक । आणि साधक जावोत मोक्षासी ।’ यासाठीच आहे. साधना म्हणून आपल्याला नेमून दिलेल्या सेवा करणे आणि त्या करतांना गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेची त्याला जोड देऊन त्यातून आनंद मिळवणे, ही साधकांसाठी पर्वणीच ठरली आहे. त्याद्वारे अनेक साधकांनी स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घेतली. कित्येक जणांचे पूर्वजन्मातील प्रारब्ध फिटले, तर अनेक जण जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले. काही जण संत झाले, तर कित्येकांचा संतत्वाच्या दिशेने प्रवास चालू आहे.

गुरुदेवांचे आश्रम आणि सेवाकेंद्रे, ही साधनेची अन् जलद आध्यात्मिक उन्नतीची माध्यमेच आहेत. आश्रमांत कौशल्याच्या सेवा असतात, तशा प्रतिदिन सर्वांसाठी सकाळचा आणि दुपारचा अल्पाहार अन् दुपारी आणि रात्री महाप्रसाद बनवणे, विविध सेवांचे नियोजन करणे, आश्रमाची दैनंदिन स्वच्छता, वस्तूसंग्रह, वस्तूंचे जतन आदी कितीतरी सेवा साधकांची साधना करून घेतात.

४. सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणापोटीच !

खरेतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेयांनी हे जे अफाट कार्यविश्व उभे केले आहे, ते त्यांची जगभर ख्याती व्हावी, त्यांचा सन्मान व्हावा, त्यांचा समाजाने गौरव करावा यासाठी केलेले नाही. तसा विचार सूक्ष्म स्तरावरसुद्धा कधी गुरुदेवांच्या मनात आला नाही, हे निश्चित ! त्यांची तीव्र जिज्ञासू वृत्ती, साधकांप्रती असलेली प्रीती, सर्व प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे, अशी धडपड, यांमुळेच हे अफाट कार्यविश्व उभे राहिले आहे. वरील सर्व कार्य त्यांच्याच मार्गदर्शनानुसार चालू झाले आणि त्यानुसारच चालू आहे; परंतु ते मात्र नामानिराळे आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘हें मजचिस्तव जाहलें । परि म्यां नाहीं केलें ।’, अशा स्वरूपाचे आहे. त्यांनी सेवा उपलब्ध केल्या, साधकांनी त्या परिपूर्ण करण्यासाठी स्वतः अथक परिश्रम केले, त्यांनी साधकांना स्वावलंबी बनवले आणि त्यांची साधनाही करून घेतली.

त्यामुळेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले एकमेवाद्वितीय आणि अवतारी पुरुष आहेत. त्यांची चरणसेवा, म्हणजे त्यांच्या या कार्याची धुरा समर्थपणे सांभाळणे, काळानुसार कार्याचा विस्तार करणे, त्यासाठी झोकून देऊन त्यांच्या निर्गुण तत्त्वाची सेवा म्हणून सर्व करणे आणि त्यांच्या प्रमाणेच नामानिराळे रहाणे, हीच त्यांच्याप्रती कृतज्ञता ठरेल !

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था (१.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक