उच्चशिक्षित पोलीस शिपाई सोनाली हिंगे स्वतःच्या यशाच्या पीडित ठरल्या का ?

‘पुणे शहर पोलीस दलात ‘रील स्टार’ (सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ बनवून प्रसिद्ध मिळवलेली व्यक्ती) म्हणून ओळखल्या जाणार्‍या महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे यांच्यासह तिघा पोलिसांचे निलंबन करण्यात आले. नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून तब्बल ७ लाखांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप या तिघांवर आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस शिपाई सुदाम तायडे आणि ‘दामिनी’ पथकातील सोनाली हिंगे या तिघांचा समावेश आहे.

लाच घेतांनाचे प्रतिनिधिक ‘एआय’ निर्मित छायाचित्र

१. प्राचार्यांकडे मागितली लाच  

एका महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीची काही कागदपत्रे अडकल्याने तिने पोलिसांचे साहाय्य घेतले. या तिघा पोलिसांनी याचाच अपलाभ घेत विद्यार्थिनीला समवेत घेऊन प्राचार्यांना जाब विचारण्यास प्रारंभ केला. पुढे त्यांनी विद्यार्थिनीच्या माध्यमातून प्राचार्य आणि महाविद्यालय यांच्या विरोधात छळाची तक्रार देण्यास भाग पाडले. तक्रारीची भीती दाखवत या तिघांनी प्राचार्यांना धमकावले. त्यांच्याकडे १० लाख रुपये लाच मागितली. भीतीपोटी प्राचार्यांनी ७ लाख रुपये दिले, अशी माहिती समोर आली आहे. ही रक्कम तिघांनी आपापसांत वाटून घेतल्याचाही आरोप आहे. विद्यार्थिनीने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला आणि तिन्ही पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

२. घटनेचे २ पैलू

श्री. नारायण नाडकर्णी

हे प्रकरण एखाद्या ‘पोलीस बुलेटिन’पेक्षा (पोलिसांच्या दैनंदिनीपेक्षा) ‘हाय-व्होल्टेज सायकॉलॉजिकल थ्रिलर’सारखे (रोमांचकारी रहस्यपटासारखे) अधिक वाटते. या वादळाच्या केंद्रस्थानी आहेत – सोनाली हिंगे. ही तीच महिला, जी काही काळापूर्वीपर्यंत महाराष्ट्र पोलिसांच्या आधुनिक आणि सक्षम प्रतिमेचा चेहरा होती; मात्र आज त्याच कायद्यांचा आधार घेत खंडणी उकळल्याच्या आरोपावरून त्या निलंबित आहेत. त्याच कायद्यांच्या रक्षणाची शपथ त्यांनी घेतली होती. या घटनेला २ पदर आहेत. एक म्हणजे सोनाली हिंगे या स्वतःच्याच झपाट्याने झालेल्या प्रगतीचा आणि विभागातील अंतर्गत राजकारणाच्या पीडित ठरल्या आहेत का ? कि सामाजिक माध्यमांवरील प्रसिद्धीची नशा आणि झटपट पैशाच्या मोहाने एका तल्लख बुद्धीमत्तेला चुकीच्या वाटेवर नेले ?

३. गणवेशातील उच्चशिक्षित आणि मत्सरछायेचे सावट

सोनाली हिंगेंना अटक का झाली ? हे समजून घेण्यासाठी आधी सोनाली हिंगे यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पोलीसदलात शिपाई पदासाठी किमान पात्रता १२ वी उत्तीर्ण असते, तिथे हिंगे या एक अपवाद होत्या. अवसरी गावच्या असलेल्या सोनाली यांनी ‘एम्.कॉम.’ (वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी) आणि ‘एम्.फील.’ यांसारख्या पदव्या मिळवून एक भक्कम शैक्षणिक अन् क्रीडा पार्श्वभूमी सिद्ध केली होती. पोलीसदलातील त्यांचा प्रवास मोठ्या महत्त्वाकांक्षेने चालू झाला होता. त्यांनी यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेसाठी प्रयत्न केले होते; परंतु अवघ्या अर्ध्या गुणाने त्यांची संधी हुकली होती. त्या पराभवाने खचून न जाता त्यांनी पोलीस शिपाई म्हणून दलात प्रवेश केला. वाहतूक विभाग, कोंढवा आणि शिवाजीनगर पोलीस ठाणे अशा विविध विभागांतील अनुभवातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू असल्याने त्यांच्याकडे बौद्धिक क्षमतेसह शारीरिक शिस्त आणि बळाचा सुरेख संगम होता.

४. ‘दामिनी’ पथकातील सन्मानाचे स्थान

पुणे पोलिसांच्या ताफ्यातील महिला आणि मुली यांच्या सुरक्षेचे कवच मानल्या जाणार्‍या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘दामिनी’ पथकात त्यांची वर्णी लागली. हिंगे यांनी केवळ स्वतःचे कर्तव्य बजावले नाही, तर त्यांची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीही केली. इन्स्टाग्रामवरील त्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या ‘रील्स’मुळे त्या ‘रील स्टार’ बनल्या. शिपाई पदावर असूनही त्यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याप्रमाणे दरारा आणि धडाकेबाज व्यक्तीमत्त्व सामाजिक माध्यमांतून लोकांसमोर उभे केले. तांत्रिकदृष्ट्या त्या पदक्रमातील सर्वांत खालच्या पायरीवर होत्या, तरीही जनमानसात त्यांना एखाद्या उच्चपदस्थ अधिकार्‍याइतकाच आदर मिळत होता.

५. वर्चस्वाचे राजकारण

सरकारी सेवेत अशा प्रकारच्या झपाट्याने होणार्‍या वैयक्तिक प्रगतीची अनेकदा मोठी किंमत मोजावी लागते. पोलीसदलासारख्या शिस्तबद्ध विभागात जेव्हा एखादा शिपाई ‘सेलिब्रिटी’ (वलयांकित व्यक्ती) बनतो, तेव्हा तो नकळतपणे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अहंकाराला धक्का लावू शकतो. जेव्हा एखादा कनिष्ठ कर्मचारी आयुक्तांपेक्षाही अधिक लोकप्रिय होतो, तेव्हा अंतर्गत संघर्ष अटळ असतो.

६. हा विभागीय घातपाताचा प्रकार ?

शिपाई म्हणून हिंगे यांना हवालदारापासून प्रत्येक वरिष्ठ पदाच्या आदेशांचे पालन करावे लागते. जर वरिष्ठ अधिकार्‍याने एखादी योजना आखली, तर कनिष्ठाने त्याला नकार देणे, म्हणजे स्वतःची कारकीर्द पणाला लावण्यासारखे असते. येथे प्रश्न असा निर्माण होतो की, भ्रष्टाचार करणार्‍या मोठ्या टोळीसाठी सोनाली हिंगे यांच्या लोकप्रिय प्रतिमेचा वापर ‘ब्रँड’ (दूत) म्हणून केला गेला आणि डाव अंगाशी आल्यावर त्यांना ‘बळीचा बकरा’ बनवून सोडून दिले गेले का ? पदोन्नतीची स्पर्धा आणि विभागातील वर्चस्वाच्या लढाईत ‘एम्.फील.’सारखी पदवी अन् अफाट लोकप्रियता असलेला एक ‘शिपाई’ हा प्रस्थापित व्यवस्थेसाठी नेहमीच डोकेदुखी ठरतो.’

– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा.