धार्मिक कार्यक्रमाची अनुमती नाकारणार्‍या हिंदुद्वेष्ट्या प्रशासनावर बेंगळुरू उच्च न्यायालयाच्या निवाड्याने मात !

१. कर्नाटकमध्ये आद्यशंकराचार्य जयंतीच्या कार्यक्रमाला अनुमती देण्यास बेंगळुरू पश्चिम शहर महापालिकेचा नकार

देशभरात १९ एप्रिल २०२६ या दिवशी आद्यशंकराचार्य जयंती साजरी झाली. कर्नाटकच्या ‘मल्लेश्वरम् ब्राह्मण सभा ट्रस्ट’लाही आद्यशंकराचार्य जयंतीचा कार्यक्रम साजरा करायचा होता. त्यासाठी त्यांनी ‘संकेत टँक पार्क’ येथील ‘योग सभागृह’ मिळण्यासाठी अर्ज केला; परंतु बेंगळुरू पश्चिम शहर महापालिकेने तो असंमत केला. त्यासाठी त्यांनी ‘शंकराचार्यांची जयंती साजरी करणे, हा धार्मिक उपक्रम आहे. या सभागृहाच्या नियमानुसार येथे केवळ योगासंबंधी कार्यक्रम घेतले जाऊ शकतात. त्यामुळे तेथे धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना अनुमती दिली जात नाही’, असे कारण देण्यात आले.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. बेंगळुरू उच्च न्यायालयाकडून कार्यक्रमाला अनुमती

त्यामुळे ‘मल्लेश्वरम् ब्राह्मण सभा ट्रस्ट’ने महापालिकेच्या निर्णयाच्या विरोधात बेंगळुरू उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली. या वेळी ‘धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांच्या संदर्भात सभागृहाकडे कुठल्याही प्रकारचे नियम किंवा नियमावली लिखित स्वरूपात नव्हती. त्यामुळे त्यांनी दिलेले कारण अनधिकृत आहे’, असा युक्तीवाद करण्यात आला. हा युक्तीवाद बेंगळुरू उच्च न्यायालयाच्या एकल पिठाचे न्यायमूर्ती एम्.आय. अरुण यांनी मान्य केला. याविषयी उच्च न्यायालयाने निकालपत्र देतांना एक अतिशय महत्त्वाचे सूत्र मांडले, ‘केवळ शंकराचार्यांचे नाव आल्याने त्याला धार्मिक स्वरूप देणे अयोग्य आहे. हा कार्यक्रम फार तर धार्मिक आणि सांस्कृतिक म्हणता येईल. कोणतीही नियमावली सिद्ध नसतांना त्यांना अनुमती नाकारणे, हे अनधिकृत आहे.’ उच्च न्यायालय पुढे म्हणते, ‘शंकराचार्यांनी भारतभरात अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रचार केला. हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. यासमवेतच संस्कृती हा भारताचा आत्मा आहे. त्यामुळे तुम्ही  कुठल्याही गोष्टीला धार्मिक उपक्रमाचे नाव देऊन अनुमती नाकारू शकत नाही.’

३. न्याययंत्रणेच्या माध्यमातून हिंदुद्वेष्ट्या प्रशासनावर मात

काँग्रेस आणि त्यांची पिलावळ असलेल्या स्वराज्य संस्था यांनी प्रत्येक गोष्टीत राजकारण केले. हिंदूंचा कार्यक्रम असला की, त्याला धार्मिक स्वरूप देऊन अनुमती नाकारायची, हा उद्योग त्यांनी स्वातंत्र्यानंतर गेली ७८ वर्षे केला. आता जनता शहाणी होऊ लागली आहे. त्यामुळे ते अशा स्थितीत न्यायालयाचे साहाय्य घेतात आणि अनुकूल आदेश पदरात पाडून घेतात. याविषयी आपण श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया.’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२६.४.२०२६)