‘छोटा उस्मान’ याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा – NIA Court Bengaluru

बेंगळुरू कारागृहातील आतंकवादी आक्रमणाचा कट रचल्याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित आतंकवादी विक्रम कुमार उपाख्य ‘छोटा उस्मान’ याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने ७ वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली. यात ३० सहस्र रुपयांच्या दंडाचाही समावेश आहे. ही शिक्षा वर्ष २०२३ च्या बेंगळुरू कारागृहात आतंकवादी आक्रमणाचा कट रचल्याच्या प्रकरणात सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे.

१. छोटा उस्मान कारागृहात बंद असतांना कट्टरतावादी बनला आणि टी. नासीर अन् सह आरोपी जुनैद अहमद यांच्या संपर्कात आला. सुटका झाल्यानंतरही तो सातत्याने त्यांच्या संपर्कात राहिला. मे २०२३ मध्ये त्याने हरियाणाच्या अंबाला येथून हातबाँब बेंगळुरूमध्ये दुसर्‍या आरोपीपर्यंत पोचवले होते. पोलीस टी. नासीर याला कारागृहातून न्यायालयात नेत असतांना त्याला पळवून नेण्याच्या कटातही तो सहभागी होता.

२. हे प्रकरण जुलै २०२३ मध्ये समोर आले होते, जेव्हा बेंगळुरू केंद्रीय गुन्हे शाखेने शहरात आतंकवादी आक्रमणाचा कट रचणार्‍या आरोपींकडून शस्त्रे, दारुगोळा आणि संचार उपकरणे जप्त केली होती. नंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कारागृहाच्या आत तरुणांना कट्टरतावादी बनवणारे आणि भरती करणारे मोठे जाळे उघड केले होते.

संपादकीय भूमिका

कारागृहातून सुटल्यानंतर असे कट्टरतावादी पुन्हा आतंकवादी कारवायाच करणार, यात शंका नसल्याने अशांना फाशीचीच शिक्षा केली, तरच देशातील आतंकवादी कारवाया थांबतील !