Tirupati Laddu Ghee : तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या लाडूसाठी पडताळणी न करता ७० लाख किलो तूप वापरले !

चौकशी समितीचा अहवाल

भाग्यनगर (तेलंगाणा) – तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या लाडू प्रसादासाठी तुपाच्या खरेदीच्या प्रकरणात एक सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानुसार अनुमाने ७० लाख किलो तूप अनिवार्य पडताळणीविना खरेदी करण्यात आले आणि अनेक प्रकरणांमध्ये प्रयोगशाळेचा अहवाल येण्यापूर्वीच त्याचा प्रसादात वापर करण्यात आला.

१. समितीने मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय त्रुटी असणे, प्रक्रियेचे उल्लंघन करणे आणि संगनमत असणे , असे आरोप केले आहेत. समितीचे म्हणणे आहे की, याच कारणांमुळे भेसळयुक्त तुपाचा पुरवठा शक्य झाला.

२. समितीच्या अहवालात देवस्थानाचे माजी कार्यकारी अधिकारी ए.व्ही. धर्मा रेड्डी यांना उत्तरदायी धरले आहे. समितीने त्यांच्यावर निविदा नियम दुर्बल करणे, भेसळ असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही कारवाई न करणे आणि संशयास्पद पुरवठादारांना काम चालू ठेवू देणे, असे आरोप केले आहेत.

३. धर्मा रेड्डी यांनी यापूर्वीच सांगितले आहे की, सर्व निर्णय खरेदी समितीच्या सर्व सदस्यांच्या सहमतीने घेण्यात आले.

काय आहे प्रकरण ?

आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आरोप केला की, राज्यात वर्ष २०१९ ते २०२४ या कालावधीत तत्कालीन ‘वाय.एस्.आर्.सी.पी.’ (युवाजन श्रमिका रिथु काँग्रेस पक्ष – युवा, कामगार आणि शेतकरी काँग्रेस पक्ष) सरकारच्या कार्यकाळात लाडू प्रसाद बनवण्यासाठी भेसळयुक्त तुपाचा वापर झाला. ‘वाय.एस्.आर्.सी.पी.’ने म्हटले आहे की, हे आरोप राजकीय हेतूने केले जात आहेत.