१. कायद्याच्या विद्यार्थ्यांना मनुस्मृति, कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’, तसेच भारतीय वैदिकपद्धत शिकवण्याची मुख्य न्यायमूर्ती धर्माधिकारी यांची सूचना
‘विधी विद्यापिठांनी इतर विषयांसह मनुस्मृति, कौटिल्याचे अर्थशास्त्र, जैन आणि बौद्ध धर्मातील काही सूत्रे, तसेच भारतीय वैदिकपद्धत यांचा अभ्यास कायद्याच्या विद्यार्थ्यांना शिकवावा. त्यामुळे वकिली उत्तीर्ण होणारी मुले भारतीय संस्कृती आचरणात आणतील आणि केवळ स्वतःचे अधिकार मागत बसण्यापेक्षा ते त्यांची कर्तव्ये अन् कर्म योग्य प्रकारे पार पाडतील. त्यातून देशाचे चांगले नागरिक घडतील’, असे मार्गदर्शन मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुश्रुत धर्माधिकारी यांनी ‘राष्ट्रीय विधी विद्यापिठा’च्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘विधीच्या विद्यार्थ्यांना भारतीय इतिहासही शिकवला गेला पाहिजे. सहस्रो वर्षांपूर्वी सर्व क्षेत्रांमध्ये भारत प्रगत होता. त्यामुळे त्यांना परिपूर्ण ज्ञान मिळेल. विद्यार्थ्यांना पंचतंत्र, चाणक्य आणि राजा अशोक त्यांच्या काळातील महत्त्वपूर्ण घटनांचाही अभ्यास द्यावा. त्यामुळे ते चांगले भारतीय नागरिक बनतील.’’ धर्माधिकारी पुढे म्हणाले, ‘‘या विद्यापिठातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणारे विद्यार्थी अतिशय असामान्य असे ज्ञान घेऊन बाहेर पडतात; मात्र त्यांचा कल थोड्या कालावधीत कोट्याधीश होण्याकडे असतो. जगात भारतीय न्यायिक पद्धतीची ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय न्यायव्यवस्थेत पालट घडवायचे आहेत. न्यायव्यवस्थेविषयी जगात भारताची नवीन ओळख जगाला घडवून द्यायची असेल, असे करणे आवश्यक आहे.’’
निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांचा विद्यार्थ्यांना ‘यतो धर्मस्ततो जय:’ याचा आदर्श ठेवण्याचा सल्ला

दुसर्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांनी महाभारतातील युद्धापूर्वीचा प्रसंग मांडला. ते सर्वोच्च न्यायालयाच्या ‘यतो धर्मस्ततो जय:’ (जिथे धर्म आहे, तिथे विजय आहे), या ब्रीदवाक्याविषयी म्हणाले, ‘‘महाभारतातील युद्ध चालू होण्यापूर्वी दुर्योधन त्याची माता गांधारी हिचा आशीर्वाद घेण्यासाठी जातो. त्या वेळी गांधारी त्याला ‘विजयी भव’ किंवा ‘जयोस्तुते’ असा आशीर्वाद न देता ‘यतो धर्मस्ततो जय:’, असे म्हणते. हे सांगून निवृत्त सरन्यायाधीश लळीत म्हणतात, ‘‘आपल्या संस्कृतीचे हे गुणवैशिष्ट्य आहे आणि हाच आपला मूळ ढाचा आहे. सत्य आणि केवळ सत्यालाच जीवनात स्थान आहे.’’
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी
२. नवीन कायदे संहिता बनवल्याविषयी भारत सरकारचे कौतुक
या वेळी त्यांनी ‘भारतीय न्याय संहिता’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ आणि ‘भारतीय साक्ष अधिनियम’ बनवल्याविषयी अन् जुने ‘भारतीय दंड विधान’ रहित केल्याविषयी केंद्र सरकारचे कौतुक केले. यासमवेतच प्रत्येक भाषेतील निकालपत्रे येण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘सुप्रीम कोर्ट विधी अनुवाद सॉफ्टवेअर’ विकसित केल्याविषयी कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली. ज्यांच्यासाठी ही न्यायव्यवस्था निर्माण केली, त्यालाच त्याचा अधिवक्ता काय युक्तीवाद करत आहे, हे कळत नाही, तसेच न्यायमूर्ती काय निवाडा देतात, हेही त्याला कळत नाही. खटला विरोधात गेल्यावर त्याचा आणखीनच वैचारिक कोलाहल निर्माण होतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन संगणकीय प्रणालीमुळे लोकांना दिलासा मिळेल.
३. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात प्राचीन ग्रंथांचा समावेश करणार का ?
मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे अधिवक्त्यांना मनुस्मृति, कौटिल्याचे अर्थशास्त्र, भारतीय वैदिक पद्धत शिकवण्यास सांगतात. त्याही पुढे जाऊन सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीशही विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांचा संदर्भ देतात. या गोष्टी जनकल्याणासाठी आवश्यक असतांना केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात या गोष्टींचा अंतर्भाव का करत नाही ? केंद्र सरकारने दोन्ही सन्माननीय न्यायमूर्तींच्या भाषणांचा विचार करावा. एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्ती मनुस्मृतीचे कौतुक करतात, तर दुसरीकडे काही नतद्रष्ट लोक स्वतःचे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी उठसूठ ‘मनुस्मृति’ जाळण्याची भाषा करतात, हे भारताचे दुर्दैव आहे.’ (२६.४.२०२६)
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय

‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !