श्रीनिवासन रामानुजन यांच्यातील आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि प्रतिभेचे रहस्य !

‘श्रीनिवासन रामानुजन यांची धार्मिक-आध्यात्मिक वैशिष्ट्येच त्यांच्या अद्भुत गणित संशोधनासाठी पुष्कळ महत्त्वाची ठरली. जर कदाचित् तसे कुणाला वाटले नाही, तरी किमान ती पूरक कशी ठरली, हे पाहून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संशोधक यांना त्यातून काही लाभ होईल’, या उद्देशाने हा लेख आहे. विस्तारभयास्तव लेखातील सूत्रांची मांडणी उल्लेखित उद्देशासंबंधी काही दृष्टी मिळावी इतपत मर्यादित असणार आहे. यांत रामानुजन यांचे संक्षिप्त चरित्र, त्यांचा करण्यात आलेला गौरव, त्यांच्या गणिती प्रतिभेची वैशिष्ट्ये, त्यांची धािर्मकता आणि त्यांच्या सर्जनशीलतेत त्यांची धार्मिकता अन् आध्यात्मिकता यांचा वाटा यांविषयी आपण पहाणार आहोत. 

२७ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘संक्षिप्त चरित्र, जगाने एकमुखाने गौरवलेला गणितज्ञ आणि रामानुजन यांच्या गणिती प्रतिभेची काही उदाहरणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.                    

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1034269.html

थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवासन रामानुजन

१. रामानुजन यांच्या गणितांचे संशोधन आजही चालू 

रामानुजन यांनी इंग्लंडला जाण्यापूर्वी केलेल्या संशोधनाच्या नोंदींच्या (अनुमाने ३७०० हून गणिते) ३ वह्या ‘नोटबुक’ या नावाने विख्यात आहेत. त्या काळी देशी-विदेशी गणितज्ञांना ते सर्व बुचकळ्यात टाकणारे होते. रामानुजन यांनी काही गणितांचे लेखन करून इंग्लंडला मोठ्या गणितज्ञांना ‘हे संशोधन प्रसिद्ध करण्यायोग्य आहे का ? हे पहावे’, असे म्हणत पाठवले. काहींनी ते टपाल उघडूनही न पहाता, तर काहींनी उत्तर न देता परत पाठवले. शेवटी प्रा. हार्डी यांच्या हातात ते पडले अणि सगळेच पालटले. या ‘नोटबुक’मधील गणितांवर आजही जगभरात संशोधन चालू आहे.

२. रामानुजन यांची धार्मिकता आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये 

रामानुजन यांचे संशोधन जितके कल्पनातीत, तसेच धार्मिकता-आध्यात्मिकता यांविषयीचे वेगळेपण तितकेच कल्पनातीत होते. हे वैशिष्ट्य आज १०० वर्षांनंतर आणखीनच ठळक होते.

अ. धार्मिकता : रामानुजनची कुलदेवी श्रीनमगिरीदेवीवर दृढ श्रद्धा होती. कौल आणि आंतरिक साक्षात्कार यांतून देवीची अनुमती घेऊनच ते इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेले, तरी त्यांची प्रतिदिनची पूजा कधी चुकले नाही. त्यांनी प्रसंगी उपाशी रहाणे स्वीकारले; परंतु शाकाहार सोडला नाही. यामुळे त्यांच्यात व्यावहारिक ठोस हाती काही येत नसले, तरी निवडलेल्या मार्गावरची निष्ठा किती दृढ होती ते दिसते.

आ. एकांत आणि धार्मिक ग्रंथाध्ययन यांची आवड : बालक श्रीनिवासन ध्यान प्रकृतीचे होते. त्याला इतरांमध्ये मिसळणे आणि रस्त्यात खेळणे यांत रुची नव्हती. जरा मोठे झाल्यावर उपनिषद, तिरुकल, गीता यांतील श्लोक आणि उतारे त्यांना पाठ असत. ते रामायण अन् महाभारत यांतील कथा त्यासंबंधीच्या तत्त्वज्ञानासह ओघवत्या भाषेमध्ये सांगत. एकदा एका जत्रेला ६ कि.मी. चालत जातांना त्यांनी त्यांच्या मित्राला महाभारत आणि उपनिषद यांविषयी न थांबता सांगितले होते.

ई. तत्त्वज्ञान जगणे : ट्रामगाडीतून जातांना चालकाला पाहून ते म्हणाले, ‘त्याला वाटते की, तो सर्व चालवतो आहे. प्रत्यक्षात वरून येणार्‍या विजेच्या आधारे सर्व चालत आहे. तसेच जीवनाचे आहे. सर्व माया.’ एका मध्यरात्री चाळीत तळमजल्यावर रामानुजन एका मित्राला काही गणितीय सूत्रे सांगत असतांना त्यांचे बोलणे बंद व्हावे, यासाठी कुणीतरी वरून त्यांच्या डोक्यावर पाणी ओतले. तात्काळ ते म्हणाले, ‘गंगास्नान झाले.’

उ. ज्योतिषाची आवड : रामानुजन ज्योतिष आणि हस्तरेषा अभ्यासत. स्वत:च्या हस्तरेषांचा अभ्यास करून स्वत:चा मृत्यू वयाच्या ३५ वर्षांच्या आत होणार, हे त्यांनी मित्रांना सांगितले होते. यातून त्यांची स्वत:संबंधीची तटस्थता स्पष्ट दिसते. ही तटस्थता गणित संशोधनात महत्त्वाची ठरते.

ऊ. स्वप्नांमधूनही सत्य शोधण्याची वृत्ती : रामानुजन यांना स्वप्नांची उकल करणे आवडत असे. एकदा त्यांनी भावाच्या स्वप्नाचा अर्थ गल्लीतील कुणीतरी लवकरच मरणार, असा लावला आणि तसेच झाले. रामानुजन यांना गणिती सूत्रे प्रत्यक्ष लिखित स्वरूपात दिसत. ‘देवीने स्वप्नात येऊन गणिती सूत्रे सांगितली’, असे ते सांगत. त्यांनी स्वप्नांना किती महत्त्व दिले, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

डॉ. दुर्गेश सामंत

ए. चिकाटी, एकनिष्ठता आणि संघर्ष : मॅट्रिकनंतर रामानुजन यांचे गणित सोडून अन्य कोणत्याही विषयात लक्षच लागत नसल्याने त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अपूर्णच राहिले. घरच्यांचा रामानुजानने गणितात वाहून जाण्यास विरोध होता. गरिबी इतकी की, सुचलेले लिहायला कागदाचीसुद्धा टंचाई होती. प्रसंगी मंदिरातील लादीवर ते लेखन करत. घरच्यांपासून लपवण्यासाठी ते पलंगाखाली जाऊन लिखाण करत. असे असूनही रामानुजन गणिताशी इतके एकरूप होते की, त्यांचे नवनवीन लिखाण कधी थांबलेच नाही. त्यांची एकरूपता इतकी होती की, त्यांना सामान्यांना हा संघर्ष वाटेल तेवढेसुद्धा त्यांना वाटत नसे, जणू ते त्यांच्या खिजगणतीतही नसे.

ऐ. आध्यात्मिकता : ‘सर्वभूती एकच ईश्वर’, ‘सर्वश्रेष्ठ सत्य एकच आणि ते साध्य करणे’, हे जीवनध्येय यांविषयी त्यांच्या मनात शंका नव्हती. पारलौकिक जीवनाविषयी त्यांच्या मनात संभ्रम नव्हता. प्रा. नेवील म्हणतात, ‘यश आणि प्रतिष्ठा यांमुळे रामानुजन यांच्या नैसर्गिक सहजतेत कधीच फरक पडला नाही. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या त्यांच्या पद्धती अनोख्या होत्या.’ हे सर्व त्यांच्यात अहंकार नसण्याचे लक्षण झाले.

३. रामानुजन यांच्या गणितातील प्रतिभेचे रहस्य

प्रतिभा म्हणजे स्फुरण. जीवनाचे मूळ स्फुरण अध्यात्माच्या आधारेच समजून घेता येते. प्रतिभा म्हणजे मूळ स्फुरणाची जवळपास तितकीच शुद्ध; परंतु विशिष्ट क्षेत्रातील अभिव्यक्ती. सर्वांनाच विशेषत: सामान्य संशोधकांच्या क्षितीजांच्या मर्यादा ओलांडून पलीकडील दिसणे, हे गणितातील असामान्य प्रतिभेचे लक्षण झाले. या प्रतिभेची वैशिष्ट्ये समजून घेतली, तर रामानुजन यांच्या सजर्नशीलतेच्या मुळांचा वेध घेणे थोडे सोपे होईल. रामानुजन यांचा अभ्यास, म्हणजे त्यांच्या गणितांचे संशोधन यावरच अनेक दशके अनेकांचे लक्ष राहिले. त्यांच्या प्रतिभेच्या मुळाशी जाण्याचा आणि ती त्यांच्यामध्ये कशामुळे असू शकते, याचा अभ्यास करण्याचा गंभीर प्रयत्नसुद्धा झाला नाही. सोबत त्यांच्या या प्रतिभेचा काही संबंध त्यांच्या धार्मिकतेशी आहे का ? कि अन्य कशाशी आहे ? हे पहाण्याचाही प्रयत्न झाला नाही. आजकाल हा प्रयत्न होत आहे. या प्रयत्नांचे फलित समजण्यापूर्वी प्रथम समजून घेऊया…

४. कला आणि तत्त्वज्ञान यांच्या क्षेत्रांतील अन् गणितातील सर्जनशीलता

कलेमधील सर्जनशीलतेमध्ये जे वाटते, दिसते ते रंग-रेषांनी दाखवता येते. तेच मांडण्यासाठी तत्त्वज्ञानात शब्दांत मांडले जाते. रंग-रेषा, शब्द ही परिचित परिभाषा. त्यांच्या अभिव्यक्तीचा कुठेतरी वस्तूस्थितीशी आणि रुजलेल्या संकल्पनांशी संबंध असतो. उदा. लिओनार्डो विन्सीची ‘मोनालिसा’ किंवा मार्क्सचा साम्यवाद. अशी अभिव्यक्ती त्यामुळे अवास्तव असली, तरी ती त्याज्य होत नाही. गणितात शब्दातीताला फारतर चिन्हांकित स्वरूपात मांडता येते. जे मांडायचे ते सिद्ध करून दाखवावे लागते. ते सत्य नसेल, तर वेड्याचा कारभार म्हणून सर्व फेकून दिले जाते. त्यामुळे रामानुजन यांच्या गणितातील सर्जनशीलतेचे मोजमापन सोपे नाही. तरी त्यांच्या प्रतिभेची काही वैशिष्ट्ये आणि त्यांचा रामानुजन यांच्या धार्मिकतेशी संबंध यांविषयी आपण पुढच्या लेखात पाहू.

(क्रमशः)

॥ श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, (वय ६५ वर्षे) एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.४.२०२६)

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1034827.html