काल २६ एप्रिल या दिवशी थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांची पुण्यतिथी झाली. त्या निमित्ताने...
(भाग १)

१. सर्जनशीलता
सर्जनशीलता (Creativity), म्हणजे नवीन आणि उपयुक्त कल्पना निर्माण करण्याची क्षमता होय. वैज्ञानिक सर्जनशीलता म्हणजे नवीन शोध लावणे. विज्ञान शाखांमध्ये विश्वमान्य कर्तृत्व करून दाखवणार्या व्यक्तीमत्त्वांनी केलेल्या नवनिर्मिती मागील त्यांच्या सर्जनशीलतेचे रहस्य अवश्य समजून घ्यायला हवे. याचे कारण त्यांचे संशोधनच तितके विस्मयकारक असते.
२. हिंदु धर्म आणि वैज्ञानिक सर्जनशीलता परस्परविरोधी ?

भारतीय संस्कृती, हिंदु धर्म आणि अध्यात्म हे वैज्ञानिक प्रगतीतील अडथळा आहेत, म्हणून आजच्या काळात ‘टाकाऊ’ असे अनेकांना वाटत रहाते. मग संगणक नवीन आणला, तर त्याची पूजा कशाला इथपासून ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ तिरुपतीला यानाचे छोटे प्रतिरूप त्याला प्रत्यक्ष अवकाशात पाठवण्याआधी का नेतात ? आणि तेथे देवासमोर ठेवतात इथपर्यंत टीका चालू असते. या मंडळींना हिंदु धर्म आणि विज्ञान हे दोन्ही विषय दोन ध्रुवांइतके दूर वाटतात. जे काही थोडे हिंदु धर्माचे काही अनुकरण करत असतात, त्यांना ते फारतर संस्कृतीरक्षण आणि मनःशांती यांसाठी महत्त्वाचे वाटते. विज्ञानाच्या वाटेवर चालायचे, तर त्यात अनुसरत असलेल्या धर्माचा काही उपयोग आहे, याची त्यांना जाण नसते. काहींना असली, तर ती जणू काही चमत्कार असल्याप्रमाणे काही तरी असेल, असे कदाचित् वाटत असते. या सगळ्यांना वैज्ञानिक सर्जनशीलतेच्या जोपासनेसाठी हिंदु धर्म-अध्यात्म अत्यंत पूरक आहे, हे लक्षात येत नाही. त्यांना मग ही वैज्ञानिक सर्जनशीलतेची झेप क्षितीजापार जाण्यासाठी ते आवश्यक आहे, हे लक्षात येणे शक्यच नाही. त्यामुळे हिंदु धर्म-तत्त्वज्ञान-अध्यात्म आणि वैज्ञानिक सर्जनशीलता या दोन्हींची विलक्षण सांगड असलेले उदाहरण म्हणून गणितज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांचे चरित्र अभ्यासनीय ठरते.
३. लेखाचा हेतू आणि मर्यादा
‘रामानुजन यांची धार्मिक-आध्यात्मिक वैशिष्ट्येच त्यांच्या अद्भुत गणित संशोधनासाठी पुष्कळ महत्त्वाची ठरली. जर कदाचित् तसे कुणाला वाटले नाही, तरी किमान ती पूरक कशी ठरली, हे पाहून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संशोधक यांना त्यातून काही लाभ होईल’, या उद्देशाने हा लेख आहे. विस्तारभयास्तव लेखातील सूत्रांची मांडणी वर उल्लेखित उद्देशासंबंधी काही दृष्टी मिळावी इतपत मर्यादित असणार आहे. यांत रामानुजन यांचे संक्षिप्त चरित्र, त्यांचा करण्यात आलेला गौरव, त्यांच्या गणिती प्रतिभेची वैशिष्ट्ये, त्यांची धार्मिकता आणि त्यांच्या सर्जनशीलतेत त्यांची धार्मिकता अन् आध्यात्मिकता यांचा वाटा याविषयी आपण पहाणार आहोत.
४. संक्षिप्त चरित्र
२२ डिसेंबर १८८७ मध्ये कुंभकोणम्, तमिळनाडू येथे एका गरीब कुटुंबात रामानुजन यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव श्रीनिवासन रामानुजन अय्यंगार. गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवून मॅट्रिक परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या रामानुजनला महाविद्यालयात गेल्यावर गणित वगळता अन्य कोणत्याही विषयात रुचीच उरली नव्हती. स्वाभाविक त्यांचे ते शिक्षण प्रथम वर्षातच थांबले. तोपर्यंत त्यांचा विवाह झाला होता. उदरनिर्वाहासाठी मद्रास पोर्टमध्ये कारकुनाची नोकरी कशीबशी मिळवावी लागली. लहानपणापासून एकहाती चालू असलेला गणिताचा व्यासंग, तसेच संशोधन मात्र कोणत्याही अडचणी आल्या, तरी थांबले नाही. हे संशोधन त्यांनी वर्ष १९१३ मध्ये इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापिठातील प्रा. जी.एच्. हार्डी यांना ‘पडताळा आणि योग्य वाटल्यास प्रसिद्ध करा’, असे सांगत पाठवले. हे संशोधन पाहून प्रभावित होऊन हार्डी यांनी महत्प्रयासाने त्यांना इंग्लंडमध्ये आणले. वर्ष १९१९ मध्ये शारीरिक अस्वास्थ्यामुळे रामानुजन यांना भारतात परतणे भाग पडले. त्यांचे वर्ष १९२० मध्ये आजारामुळे निधन झाले.
५. जगाने एकमुखाने गौरवलेला गणितज्ञ
अ. ब्रिटिशांनी केवळ त्यांचे संशोधन पाहून त्यांना प्रथम ‘बी.ए.’ (कला शाखेची पदवी) नंतर फेब्रुवारी १९१८ मध्ये ‘एफ्.आर्.एस्. (फेलो ऑफ रॉयल सोसायटी)’ ही पदवी दिली. शास्त्रज्ञ म्हणून हा गौरव प्राप्त होणारा हा पहिला भारतीय आणि मोजक्या तरुणांपैकी एक !
आ. जेम्स न्यूमन, गणितज्ञ : गणिताची प्राचीन परंपरा असणार्या पोर्वात्य जगताच्या इतिहासातील सर्वाधिक प्रतिभाशाली गणितज्ञ !
इ. क्लिफोर्ड स्टोल : भौतिकशास्त्रात जे स्थान न्यूटनचे, संगीतात जे स्थान मोजार्टचे, तेच गणितातील स्थान रामानुजनचे आहे.
ई. ज्युलियन हक्सले : २० व्या शतकातील सर्वश्रेष्ठ गणितज्ञ !
६. अनेक चरित्र ग्रंथ आणि चरित्र चित्रपट (बायोपिक्स)
अनेक भारतीय, तसेच विदेशी लेखकांनी पुस्तकरूपाने, लेखरूपाने त्यांचे चरित्र लिहून त्यांना समजून घेण्याचा आणि जगाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर भारतात ‘रामानुजन’ (वर्ष २०१४), तर हॉलीवूडमध्ये ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ (वर्ष २०१५) हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. ज्याचे ना कुणी राजकीय पाठीराखे आहेत, ना कुणी अन्य कसल्याही प्रकारे वारस आहेत, अशा अल्पायुशी भारतियासंबंधी चरित्र चित्रपट हॉलीवूडने काढावा, हे विशेष नाही का ? येत्या वर्षांत आणखी एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
७. रामानुजन यांच्या गणिती प्रतिभेची काही उदाहरणे
गणिताची ज्यांना माहिती आहे, काही विशेष अभ्यास आहे, त्यांना रामानुजन यांच्या गणितातील प्रतिभेविषयी माहिती असेलच; परंतु ज्यांना त्यांच्या गणिती प्रतिभेविषयी काहीच माहिती नसेल, त्यांच्यासाठी तिची चुणूक दाखवणारी मोजकी सोपी उदाहरणे देत आहे.
अ. शालेय जीवन : रामानुजन यांची गणिती प्रतिभा शाळेत जाण्याआधीपासूनच प्रकट होऊ लागली होती; परंतु शाळेत गेल्यानंतर ती ठळक झाली.
१. प्राथमिक शालेय जीवन : प्राथमिक शाळेत असतांना गणिताच्या शिक्षकांनी वर्गात अंश आणि छेद एकच असेल, तर उत्तर कायम एक येते, हे शिकवले. उदा. ३ आंबे आहेत आणि ३ जणांना वाटायचे आहेत, तर ३ भागिले ३, म्हणजे १ म्हणून प्रत्येकाला एक आंबा मिळेल, असे सांगितले. लगेच रामानुजनने उठून विचारले, ‘म्हणजे शून्यला शून्यने भागले काय होईल ? एक आंबा मिळेल काय ?’
२. माध्यमिक शालेय जीवन
अ. इयत्ता ५ वीमध्ये असतांना श्रीनिवास दूरवर दिसणारे तार्यांकडे एकाग्रतेने पहात असे आणि शिक्षकांना पृथ्वीपासून तार्यांचे अंतर, त्यांचा आकार, दोन तार्यांतील अंतर अशा प्रकारचे प्रश्न विचारत असे.
आ. रामानुजनच्या शाळेत १५०० विद्यार्थी होते आणि ३० शिक्षक होते. मुख्याध्यापकांनी शाळेतील गणिताच्या ज्येष्ठ शिक्षकांना शिक्षकांचे तास आणि विद्यार्थ्यांचे वर्ग यांचे योग्य वेळापत्रक करायला सांगितले. ते त्यांना करता येत नव्हते. त्यांनी श्रीनिवासला सांगितले. त्याने ते चुटकीसरशी करून दिले.
इ. गणितामध्ये श्रीनिवासला १०० पैकी १०० गुण मिळत. त्याची गणिती कुशलता पाहून ‘बी.ए.’चे विद्यार्थी त्याच्याकडे गणित शिकवणीसाठी येत. त्यांची पुस्तके घेऊन श्रीनिवासने एकहाती स्वतःचा अभ्यास पुढे नेला.
आ. महाविद्यालयीन जीवन : गणिताचे प्राध्यापक फळ्यावर अनेक पायर्या (टप्पे) लिहून एखादे प्रमेय शिकवत असत. मध्येच रामानुजनला प्रश्न विचारत. रामानुजन मग त्यातील पायर्या अनावश्यक असल्याचे सांगून थेट उत्तर मांडत असे.
लेखाच्या पुढील भागात आपण रामानुजन यांची धार्मिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये पाहू.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
॥ श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.४.२०२६)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1034498.html
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)