शरिरावर सूज येण्याची कारणे आणि त्याचा शरिरावर होणारा परिणाम !

निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक १३२ 

‘संध्याकाळी घरी आल्यावर चप्पल अकस्मात् घट्ट वाटते का ? पायावर बोट दाबल्यावर काही वेळ खड्डा तसाच राहिलेला दिसतो का ? तसेच सकाळी आरशात पहातांना चेहरा थोडा फुगलेला दिसतो का ? तेव्हा आपण सहज म्हणतो, ‘‘थोडी सूज आहे.’’ आपल्या दैनंदिन आयुष्यात ‘सूज’ हा शब्द आपण सहज वापरतो; पण ‘ही थोडी सूज, म्हणजे नेमकी काय आणि ती का येते ? ती कधी सामान्य असते आणि कधी धोकादायक (धोक्याची घंटा) ठरते ?’, हे आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

हात, पाय आणि चेहऱ्यावर येणारी सूज

१. सूज म्हणजे नेमके काय आणि ती शरिरावर का येते ?

शरिराच्या पेंशींमध्ये किंवा ऊतींमध्ये (Tissues मध्ये) अतिरिक्त द्रवपदार्थ जमा झाल्यामुळे अवयवाचा आकार तात्पुरता असामान्यपणे वाढणे किंवा फुगणे म्हणजे सूज येणे होय. सूज म्हणजे केवळ शरिरात पाणी साठणे नाही, तर ती शरिराच्या अंतर्गत संतुलनातील बिघाडाची खूण असू शकते. शरिरातील प्रत्येक पेशीला पोषण देण्यासाठी रक्तवाहिन्यांतून एकप्रकारचा द्रव बाहेर पडतो. हा द्रव पेशींना अन्न आणि प्राणवायू पुरवतो. त्यानंतर उरलेला द्रव पुन्हा रक्तप्रवाहात किंवा लसिका प्रणालीद्वारे शरिरात परत जातो. ही प्रक्रिया सुरळीत चालली, तर आपल्याला काहीच जाणवत नाही; पण जेव्हा बाहेर पडणार्‍या द्रवाचे प्रमाण अधिक होते किंवा तो परत नेणारी व्यवस्था दुर्बल (कमकुवत) होते, तेव्हा हा द्रव ऊतींमध्ये (Tissues मध्ये) साचतो आणि त्या भागात सूज दिसू लागते.

२. सूजेची लक्षणे 

२ अ. त्वचा ताणलेली दिसणे : सुजलेल्या भागावरील त्वचा चमकदार किंवा ताणलेली दिसते.

२ आ. दाबल्यावर खड्डा (पिटिंग एडेमा) : सूज आलेल्या जागेवर बोटाने काही सेकंद दाबून ठेवल्यास तिथे खड्डा पडतो.

२ इ. त्वचा फुगीर होणे : हात, पाय, बोटे, चेहरा किंवा पोटाचा भाग फुगीर दिसतो.

२ ई. वेदना होणे : सूज आलेल्या जागेवर वेदना, जडपणा, टोचल्यासारखे होणे किंवा कडकपणा जाणवतो.

२ उ. त्वचेचा रंग पालटणे : सूज आलेली जागा लाल होते किंवा काळी पडते.

३. सूज येण्याची कारणे  

कु. वैदेही राजेंद्र शिंदे

३ अ. दुखापत किंवा संसर्ग, जखम, मुरगळणे किंवा दाह (Inflammation) : पडणे, मुका मार लागणे किंवा एखादी जखम होणे या कारणांमुळे सूज येते. जेव्हा एखाद्या भागाला इजा होते, तेव्हा शरीर त्या भागात दुरुस्तीची प्रक्रिया चालू करते. त्या ठिकाणी रक्तप्रवाह वाढतो आणि अधिक द्रव पदार्थ पोचवतो. हा द्रव पदार्थ जखमी ऊतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असतो; पण त्याचे प्रमाण वाढले की, त्या भागात फुगवटा दिसतो. ही सूज शरिराची नैसर्गिक संरक्षणात्मक प्रतिक्रिया असते.

३ आ. एडेमा (Edema) : शरिरात पाणी साचते.

३ इ. दीर्घकाळ बसणे किंवा उभे रहाणे : सतत एकाच स्थितीत राहिल्याने रक्ताभिसरण मंदावते. हालचाल न्यून असल्यास गुरुत्वाकर्षणामुळे द्रव पायात साचतो. त्यामुळे संध्याकाळी पाय जड वाटू शकतात.

३ ई. ॲलर्जी (Allergy) : एखाद्या पदार्थाची किंवा कीटक दंशाची ॲलर्जी.

३ उ. मिठाचे अधिक सेवन : मिठातील ‘सोडियम’ शरिरात पाणी धरून ठेवते. त्यामुळे चेहरा, हात किंवा पाय फुगलेले दिसू शकतात.

३ ऊ. संप्रेरकांमध्ये (हार्मोनल) पालट होणे : विशेषतः स्त्रियांमध्ये पाळीपूर्व काळात किंवा गर्भावस्थेत संप्रेरकांमध्ये (‘हार्मोन्स’मध्ये) पालट होतात. या पालटांमुळे शरिरात द्रव साठण्याची प्रवृत्ती वाढते. गर्भधारणा किंवा मासिक पाळीच्या काळात चेहर्‍यावर किंवा शरिरावर सूज येऊ शकते. ही सूज बहुतेक वेळा तात्पुरती असते.

३ ए. काही औषधांचे दुष्परिणाम : काही औषधांमुळेही शरिरात द्रव साठू शकतो. विशेषतः रक्तदाबाची काही औषधे, वेदनाशामक औषधे (Painkillers) किंवा ‘स्टिरॉईड्स’ यांमुळे हात-पाय सुजल्यासारखे वाटू शकतात. अशा वेळी औषध स्वतःहून बंद करू नये. आधुनिक वैद्यांचा सल्ला घ्यावा.

३ ऐ. हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार (किडनी) किंवा यकृत (लिव्हर) खराब होणे : या अवयवांचे कार्य नीट चालत नसल्यास शरिरातील द्रव संतुलन बिघडते, उदा. मूत्रपिंड (किडनी) योग्य प्रमाणात पाणी बाहेर टाकू शकत नसल्यास शरिरात द्रव साचतो. अशा परिस्थितीत सूज ही गंभीर आजाराच्या समस्येचे लक्षण असू शकते.

३ ओ. लसिका प्रणालीतील अडथळा (Lymphedema) : कर्करोगाच्या (कॅन्सरच्या) शस्त्रक्रियेच्या काळात लसिका ग्रंथी काढल्या गेल्यास किंवा लसिका प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास अतिरिक्त द्रव योग्यरित्या परत जाऊ शकत नाही. परिणामी हात किंवा पायांमध्ये कायमस्वरूपी सूज िनर्माण होऊ शकते. याला लसिका सूज (Lymphedema) म्हणतात.

४. सूज शरिरावर कसा परिणाम करते ?

शरीर आणि मेंदू यांच्यात संदेश पोचवणे, हे नसांचे काम असते. सूज आल्यावर त्या भागात दाब वाढतो आणि नसांवर ताण येतो. त्यामुळे मुंग्या येणे, झिणझिण्या, सून्नपणा, वेदना किंवा हालचालीत कमकुवतपणा (Weakness) जाणवू शकतो.

अ. दीर्घकाळ सूज राहिल्यास नसांची कार्यक्षमता न्यून होण्याची शक्यता असते.

आ. सूजेमुळे शरिराच्या इतर भागांवरही परिणाम होतो.

इ. सूज आलेल्या भागावर दाब वाढतो. त्यामुळे सांधे दुखू लागतात.

ई. हालचाल न्यून झाल्याने स्नायू दुर्बल (कमकुवत) होतात.

दीर्घकाळ सूज राहिली, तर त्वचा ताणली जाऊन कडक होऊ शकते आणि संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे सूज ही केवळ दिसणारी समस्या नसून ती कार्यक्षमतेवर परिणाम करणारी समस्या आहे.’

– कु. वैदेही राजेंद्र शिंदे, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) अभ्यासक, फोंडा, गोवा. (२४.३.२०२६)

‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा