Bangladesh On High Alert : बांगलादेशाच्या संसदेसह देशातील महत्त्वाच्या संस्थांवर आतंकवादी आक्रमणाचा कट उघड

AI निर्मित चित्र

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या सुरक्षादलांनी एक मोठा आतंकवादी कट उधळून लावला आहे. बांगलादेश पोलीस मुख्यालयाने प्रसारित केलेल्या एका गुप्तचर परिपत्रकातून ही माहिती समोर आली आहे. या कटाचे लक्ष्य देशातील प्रमुख संस्था होत्या, ज्यामध्ये संसद, सैन्य आणि पोलीस प्रतिष्ठाने, धार्मिक स्थळे, मनोरंजन केंद्रे आणि ढाका येथील प्रसिद्ध शाहबाग परिसर यांचा समावेश होता.

सैन्यातून बडतर्फ केलेल्या सैनिकांशी संबंध

एका प्रतिबंधित आतंकवादी संघटनेच्या इश्तियाक अहमद आणि अबू महंमद या दोन आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर या कटाचा खुलासा झाला. चौकशीत असे समोर आले की, हे दोघेही सैन्यातून काढून टाकलेल्या २ सैनिकांच्या सतत संपर्कात होते. आरोपींनी स्फोटके, देशी बाँब आणि धारदार शस्त्रे यांचा वापर करून देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर आक्रमण करण्याची योजना आखली होती.

बांगलादेश वायूदलातही आतंकवाद्यांचा प्रवेश

काही दिवसांपूर्वीच बांगलादेश वायूदलाच्या गुप्तचर विभागाने वायूदलाचे अधिकारी आणि सैनिक यांचे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचे उघड केले. त्यानंतर या विभागाने वायूदलाच्या ३ महत्त्वाच्या तळांवर धाडी घालून २ अधिकारी आणि १० सैनिक यांना अटक केली. या कारवाईपूर्वीच १० ते १२ सैनिक पसार झाले होते, त्यांपैकी काही जण पाकिस्तान, तुर्कीये, न्यूझीलंड आणि पोर्तुगाल या देशांत पोचले आहेत. पायदळ आणि नौदल यांतील सैनिकांचेही आतंकवादी गटांशी संबंध आहेत का ?, याचा आता शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे.