लहान वयातच ‘प्रेमभाव, कर्तव्यनिष्ठता आणि स्थितप्रज्ञता’ हे गुण असलेले सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु !

पू. भार्गवराम प्रभु

१. स्वतः अलिप्तपणे वागून आईला पुत्रमोहाच्या बंधनात अडकू न देणारे पू. भार्गवराम प्रभु !

‘एकदा मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिरासाठी जायचे होते. ते शिबिर ८ दिवस होते. मी घरातून निघत असतांना पू. भार्गवराम प्रभु (सनातनचे पहिले बालसंत, वय ८ वर्षे) यांनी मला केवळ ‘राम-राम’ (त्यांनी इंग्रजी शब्द ‘बाय बाय’ या ऐवजी हे शब्द उच्चारले.) असे म्हणून निरोप दिला. त्यांनी मला ‘‘आई, तू घरी कधी येणार ?’’, असे विचारले नाही. त्यामुळे प्रथम मला थोडे वाईट वाटले. नंतर चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘परात्पर गुरुदेवच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) पू. भार्गवराम यांच्या माध्यमातून मला ‘भावनेत गुंतणे  (Emotional Attachment) हे साधनेला हानीकारक आहे’, हे शिकवत आहेत. पू. भार्गवराम यांनी आपल्या अलिप्त वागण्याने मला पुत्रमोहाच्या बंधनातून मुक्त होण्याचा अनुभव दिला.’

सौ. भवानी प्रभु

२. आसक्तीतून बाहेर पडण्यास साहाय्य करणे

एकदा आम्ही एका साधकासाठी कपडे खरेदी करायला गेलो होतो. त्या वेळी मला स्वतःसाठी काही कपडे पहाण्याची इच्छा झाली. त्या वेळी पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘आई, आज आपण आपल्यासाठी कपडे खरेदी करायला आलो नाही. आपल्याकडे पुष्कळ कपडे आहेत.’’ त्यांचे बोलणे ऐकून ‘मला नवीन कपडे घेण्याची आवड आणि माझ्यात मायेचे आकर्षण आहे’, याची जाणीव झाली.

३. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याला अधिक महत्त्व देणारे पू. भार्गवराम !

एकदा मी एका तरुणीच्या वेशभूषेची प्रशंसा करत म्हटले, ‘‘तुम्ही पुष्कळ सुंदर आणि मोहक दिसता.’’ ते ऐकून पू. भार्गवराम यांनी सहजतेने सांगितले, ‘‘व्यक्ती साधी राहिली, तर ती आणखी सुंदर दिसते.’’ त्यांचे बोलणे ऐकून ‘माझ्या मनात आकर्षक (‘स्टायलिश’) दिसण्याची सूक्ष्म इच्छा जागृत झाली आहे’, याची मला जाणीव झाली. थोड्या वेळाने पू. भार्गवराम मला म्हणाले, ‘‘आई, तू त्या तरुणीपेक्षाही अधिक सुंदर आहेस. मन सुंदर असले, तर व्यक्ती आणखी सुंदर दिसते. केवळ सौंदर्यवर्धकांचा वापर करून कुणी सुंदर दिसत नसते.’’

४. पू. भार्गवराम यांच्यातील कृतज्ञताभाव !

एका साधिकेने माझ्या सुंदर दिसण्याची प्रशंसा केल्यावर पू. भार्गवराम यांनी म्हटले, ‘‘गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) तर सर्वच जण सुंदर वाटतात.’’ त्यांचे बोलणे ऐकून माझ्या लक्षात आले, ‘स्वतःची प्रशंसा ऐकून आनंदी होण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीविषयी कृतज्ञ राहून सर्व श्रेय गुरुदेवांच्या चरणी अर्पण करायला हवे.’

५. कर्तव्यनिष्ठ आणि स्थितप्रज्ञ पू. भार्गवराम !

एकदा मंगळुरू आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करणारी एक साधिका रुग्णाईत होती. त्यामुळे तिला रुग्णालयात भरती करावे लागले. तेव्हा पू. भार्गवराम माझ्याकडे प्रतिदिन तिच्या प्रकृतीची विचारपूस करत होते. ते म्हणत होते, ‘‘आई, आपल्याला त्या साधिकेची चांगली काळजी घ्यायला हवी. ती साधिका प्रतिदिन आश्रमातील सर्व साधकांसाठी स्वयंपाक करते.’’ काही दिवसांनंतर ती साधिका बरी होऊन आश्रमात आली. तेव्हा पू. भार्गवराम यांनी तिची विचारपूस केली नाही. ते पाहून मी त्यांना म्हटले,‘‘ती साधिका आता बरी होऊन आश्रमात आली आहे. तुम्ही तिला प्रकृतीविषयी विचारू शकता.’’ तेव्हा पू. भार्गवराम यांनी स्थितप्रज्ञ राहून सहजतेने उत्तर दिले, ‘‘आई, आता ती सेवा करत आहे ना, तर आता तिच्याकडे गुरुदेवच पहातील.’’

मला या प्रसंगातून पू. भार्गवराम यांच्यातील प्रेमभाव जाणवला आणि ‘त्या प्रेमामागे पू. भार्गवराम यांचा कोणताही व्यक्तीगत मोह किंवा गुंतणे नव्हते. ते कर्तव्यनिष्ठ आहेत’, असे माझ्या लक्षात आले.’

– सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांच्या आई), मंगळुरू, कर्नाटक. (१.३.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक