बांगलादेशातील हिंदु पीडितांची खोट्या खटल्यातून निर्दोष मुक्तता !

बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंच्या अधिकारांसाठी लढणार्‍या ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या संघटनेच्या न्यायालयीन लढ्याला यश !

उजवीकडे पू. अधिवक्ता रवींद्र घोष

ढाका (बांगलादेश) – येथील सह-जिल्हा न्यायाधिशांनी धामराई उपजिल्ह्यातील पीडित हिंदूंची एका खोट्या खटल्यातून नुकतीच निर्दोष मुक्तता केली. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंच्या अधिकारांसाठी लढणार्‍या ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’च्या न्यायालयीन लढ्याला यश प्राप्त झाले, अशी माहिती ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक पू. अधिवक्ता रवींद्र घोष यांनी दिली. जीवन पाल, कार्तिक हलदर आणि रूपा हलदर, अशी या तिघा पीडित हिंदूंची नावे आहेत.

१. निर्दाेष मुक्त झालेल्या पीडित हिंदूंनी एका प्रकरणात पोलिसांत तक्रार केली होती. त्यांना न्याय देण्याऐवजी ढाका पोलिसांच्या गुन्हे शाखेने मानवी अधिकार उल्लंघनाच्या एका जुन्या प्रकरणात तक्रारदार हिंदूंविरुद्धच गुन्हे नोंदवून त्यांना आरोपी बनवले.

२. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने घटनास्थळी जाऊन या सर्व प्रकरणाचे अन्वेषण केले असता जीवन पाल, कार्तिक हलदर आणि रूपा हलदर यांच्या छळासाठी पोलीसच उत्तरदायी असल्याचे आढळून आले.

३. पू. अधिवक्ता रवींद्र घोष यांनी २१ एप्रिल २०२६ या दिवशी ढाका न्यायालयातील सह-जिल्हा न्यायाधिशांसमोर पीडित हिंदूंची बाजू मांडली. पोलिसांनी तक्रारदारांवरच दबाव आणून आणि धमकी देऊन बलपूर्वक जबाब नोंदवून घेतल्याचे सूत्र अधिवक्ता घोष यांनी न्यायाधिशांच्या निदर्शनास आणून दिले.

४. न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर हिंदु पीडितांची सर्व आरोपांतून मुक्तता करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात नरकासम जीवन जगाव्या लागणार्‍या बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंसाठी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’सारख्या संघटना आशेचा किरण होत !