१२.४.२०२६ या दिवशी ‘सूरसम्राज्ञी’, ‘महाराष्ट्र भूषण’ आणि ‘पद्मविभूषण’, या पुरस्कारांनी सन्मानित गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली !

‘भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखल्या जाणार्या आशा भोसले यांनी त्यांच्या अद्वितीय कंठसामर्थ्याने आणि बहुआयामी गायकीने रसिकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला. विविध भाषा आणि शैली यांमध्ये त्यांनी केलेले गायन केवळ कलात्मकतेचे दर्शन घडवत नाही, तर त्यामागील सूक्ष्म भावविश्व अन् अंतर्मुखता यांचाही प्रत्यय देते. त्यांच्या कलेतील हे पैलू केवळ सरावाचा परिणाम नसून त्यामागे एक आध्यात्मिक अधिष्ठान असल्याचे जाणवते.
कला आणि अध्यात्म यांचा संबंध त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांतून दिसून येतो. कीर्ती, यश आणि लौकिक लाभ यांच्या पलीकडे जाऊन आत्मिक समाधानाचा शोध घेण्याची त्यांची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची एक महत्त्वाची बाजू ठरते. या महान कलाकाराच्या जीवनातील विविध आध्यात्मिक पैलूंचा वेध घेण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केला आहे.
१. आशा भोसले यांनी विविध शैलींची गीते गाऊनही भक्तीगीत परंपरेशी नाते टिकवून ठेवणे
आशा भोसले यांनी गायन क्षेत्रात अढळ स्थान प्राप्त केले. त्यांनी गायलेल्या गाण्यांमध्ये चित्रपटातील सर्व प्रकारच्या भाव-भावना व्यक्त करणारी गीते होती. त्यांमध्ये ‘भक्तीगीते, भावगीते, प्रेमगीते, गझल, लावण्या, उडत्या चालींची गीते’, अशा असंख्य गीतांचा समावेश होता. ज्या शैलीदार पद्धतीने त्या अन्य गीते गायल्या, तितक्याच भक्तीभावाने त्यांनी ‘पांडुरंग कांती…’, यांसारखे अभंगही गायले. त्यांचे ‘विठ्ठल तो आला आला…’, हा अभंग रसिकांच्या मनात भक्तीभाव निर्माण करणारा ठरला. त्यांच्या गळ्यातून विविध ढंगांची गीते त्या त्या शैलीनुसार आणि त्या भावांसह उतरायची.

२. आशा भोसले यांच्या जीवनातील विविध आध्यात्मिक पैलू आणि त्यांचा साधनाप्रवास !
२ अ. देवावर अढळ श्रद्धा असणे : एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले, ‘‘मी सतत उत्साही असते. मी लहानपणापासून हसतमुख होते. मी दुःखाचा फार विचार करत नव्हते आणि दुःख आले, तरी त्याला हसण्यावारी नेत असे. मला जीवनात अनेक दुःखांना सामोरे जावे लागले. कठीण प्रसंगांत प्रथम मला धक्का बसायचा. ‘आता पुढे काय होणार ?’, असे मला वाटायचे. तेव्हा मला आतून वाटायचे, ‘त्याने (देवाने) जन्म दिला आहे, तर तो पुढे नेणारच आहे.’ ‘तो आपल्याला उपाशी मारणार नाही’, अशी माझी देवावर श्रद्धा होती.’’
२ आ. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांना गुरुस्थानी मानणे : आशाताई या श्री श्री रविशंकर यांना गुरुस्थानी मानत होत्या. एका भेटीत त्यांनी गुरूंना सांगितले, ‘‘मी कुठलेही गाणे हृदयापासून आणि प्रेमाने म्हणते.’’ त्यावर श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘मनापासून आणि प्रेमपूर्वक गायन करणे’, हेच भजन आहे. मी, तुम्ही आणि सर्व शिष्य अनेक जन्मांपासून एकत्र आहोत.’’
२ इ. गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे : श्री श्री रविशंकर यांनी त्यांच्या एका लिखाणामध्ये म्हटले आहे, ‘आशाताई या गांभीर्याने साधना करणार्या साधिका होत्या. त्या प्रतिदिन ध्यान आणि ‘सुदर्शन क्रिया’ (श्री श्री रविशंकर यांनी विकसित केलेले एक अत्यंत शक्तीशाली आणि लयबद्ध श्वसन तंत्र) करत असत.’ आशाताई नेहमी म्हणत असत, ‘‘गुरुविना ज्ञान होत नाही. माणूस अर्धवट रहातो. त्यामुळे आई-वडिलांपेक्षाही गुरूंचे स्थान वरचे आहे !’’
२ ई. आशाताईंनी श्री श्री रविशंकर यांच्या चरणी गुरूंची महती वर्णन करणारे गीत समर्पित करणे : १३.५.२०२० या दिवशी आशाताईंनी ‘मैं हूं’, हे गाणे त्यांचे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या चरणी समर्पित केले. त्या गाण्याचे बोल आहेत, ‘तेरे नाम से ही तर जाती हूं । मैं तुममें समायी हूं । मैं तुमसे ही तो आई हूं । तुम्हारे होने से ही मैं हूं ।’ त्याचा आशय पुढीलप्रमाणे आहे – ‘गुरुदेव, तुमच्या असण्यानेच मी आहे. तुमच्या नावानेच मी तरून जाते. मी तुमच्यात सामावलेली आहे. तुमच्यातूनच मी आले आहे. गुरुदेव, तुमच्या असण्यानेच मी आहे.’
२ उ. ‘गाणे हीच पूजा आहे’ असा भाव असणार्या आशाताई ! : जगामध्ये सगळ्यांनाच दुःखे असतात; पण आशाताईंनी दुःखाचा परिणाम आपल्या गाण्यावर होऊ दिला नाही. ‘ध्वनीवर्धक (माईक) हा देव आहे’, असा त्यांचा भाव होता. ‘आपण जसे देवाच्या मूर्तीसमोर बसल्यावर सगळे विसरतो, तसे मी ध्वनीवर्धकाकडे पाहून हातात कागद घेऊन गायला आरंभ केला की, सर्व दुःखे विसरून गात असे’, असे त्यांनी एका मुलाखतीत बोलतांना सांगितले. त्या सांगत, ‘‘प्रत्येक गाणे हे माझे पहिले गाणे आहे आणि हे गाणे चुकले, तर मला पुन्हा संधी मिळणार नाही’, असे समजून प्रत्येक गाण्यात जीव ओतला, तरच गाण्यातील ओळ चांगली म्हणता येते.’’ या विचारसरणीमुळे आशाताई प्रत्येक गाणे हे त्यांचे पहिले गाणे समजत. ‘गाणे हीच माझी पूजा आहे’, असा त्यांचा भाव होता.
२ ऊ. ‘पुनर्जन्म आणि मुक्ती’, हे भारतीय तत्त्वज्ञान सांगणारे आशाताईंचे शेवटचे गाणे ! : आशाताईंनी मार्च २०२६ मध्ये लंडनस्थित ‘बँड गोरिल्लाज’च्या (Band Gorillaz च्या) ‘पर्वत’ या अल्बममधील ‘द शॅडोई लाईट्स (The Shadowy Lights)’, हे हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील गाणे गायले. ते त्यांचे शेवटचे गाणे ठरले. या गाण्याचा अर्थ ‘जीवन, मृत्यू आणि आध्यात्मिक परिवर्तन’, या विषयांवर आधारित आहे. ‘पर्वत’ हे मुक्तीचे प्रतीक आहे. या गाण्यात जीवनरूपी होडीविषयी सांगितले आहे. जीवनातील सर्व सुख-दुःखे भोगून त्याच्या पलीकडील मुक्तीचा हा प्रवास आहे. या गाण्यात नावाड्याला उद्देशून काही पदे म्हटली आहेत. त्यात म्हटले आहे, ‘हे नावाड्या, माझी होडी दुःख आणि पराजय यांच्या पलीकडे घेऊन जा. जेव्हा मी ही जीवनरूपी नदी पार करीन, तेव्हा मला मुक्ती मिळेल. मी एक आवाज बनून सगळीकडे व्याप्त होईन.’ अशा प्रकारे त्यांनी या गाण्याद्वारे ‘मृत्यूच्याही पलीकडे पुनर्जन्म किंवा मुक्ती आहे’, हा भारतीय तत्त्वज्ञानातील विचार मांडला आहे.
कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर पोचला, तरीही त्याला खरे आत्मिक समाधान केवळ साधनेतूनच प्राप्त होते. या साधनेसाठी गुरूंचे मार्गदर्शन अनिवार्य असते. आशाताईंच्या जीवनातून कला आणि अध्यात्म यांचा संगम साधत कलाकारानेही साधनेच्या मार्गावर कृतीप्रवण व्हावे.’
– सौ. रेणुका क्राक, संगीत अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१८.४.२०२६)
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !