‘हिंदूंनो, आपले अंतिम ध्येय स्वर्गप्राप्ती हे नसून मोक्षप्राप्ती हे आहे’, हे लक्षात घेऊन मोक्षप्राप्तीसाठी साधना करा !

श्री. गुरुप्रसाद गौडा

१. पुण्यकर्मांच्या फळामुळे व्यक्तीला केवळ स्वर्गलोकाचीच प्राप्ती होऊ शकणे; मात्र तिला स्वर्गलोकापुढील उच्च लोकांपर्यंत प्रवास करणे शक्य नसणे 

‘सध्या समाजात अनेक हिंदू पुण्यसंचय करण्यासाठी विविध सत्कर्मे करतात. भिक्षुकांना दान देणे, मंदिरांना देणगी देणे, गरीब मुलांच्या शिक्षणाचे दायित्व घेणे आणि अडचणीत असलेल्या लोकांना साहाय्य करणे इत्यादी कार्ये धर्मशास्त्रानुसार पुण्यकारक मानली गेली आहेत. त्यामुळे अशी कार्ये करतांना अनेक हिंदूंना अभिमान वाटतो आणि अशा कार्यांत सहभागी होण्यासाठी ते पुढाकार घेतात; मात्र या पुण्यकर्मांचे फळ व्यक्तीला केवळ स्वर्गलोकापर्यंतच घेऊन जाऊ शकते. व्यक्तीचे पुण्य जितके अधिक, तितका अधिक काळ तिला स्वर्गातील सुखांचा उपभोग घेता येतो; मात्र व्यक्तीचे पुण्यबळ संपल्यावर तिला पुन्हा जन्म-मरणाच्या चक्रांतून जावे लागते, म्हणजेच तिला पुण्याच्या बळावर स्वर्गाच्या पुढील उच्च लोकांपर्यंत प्रवास करणे शक्य होत नाही.

२. ‘सनातन हिंदु धर्मात मानव जन्माचे अंतिम ध्येय स्वर्गप्राप्ती नसून मोक्षप्राप्ती आहे’, असे मानले गेले आहे. व्यक्तीने पुण्यकर्म केल्याने तिला मोक्षप्राप्ती साध्य होत नाही. व्यक्तीला मोक्षप्राप्ती केवळ आध्यात्मिक साधनेद्वारेच प्राप्त होऊ शकते.

३. ‘हिंदु धर्माची महानता ओळखून गुरूंच्या मार्गदर्शनानुसार नियमित आध्यात्मिक साधना करून मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणे’, यातच जीवनाचे सार्थक आहे !

‘इस्लाममध्ये अंतिम ध्येय ‘जन्नत’ (स्वर्गप्राप्ती) आहे’, असे सांगितले आहे, तर ‘ख्रिस्ती पंथात ‘हेवन’ (स्वर्गप्राप्ती)’, हेच अंतिम ध्येय मानले जाते. या दोन्ही पंथांत साधनेचा उद्देश स्वर्गप्राप्ती हाच आहे; मात्र हिंदु धर्मात ‘स्वर्गप्राप्ती’, हे अंतिम ध्येय मानले गेले नाही. ‘स्वर्गाच्या पुढे ‘महर्लोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक’, असे उच्च लोक अस्तित्वात आहेत’, हे केवळ हिंदु धर्मात सांगितले आहे. ‘सत्यलोकाच्या पुढेच मोक्षप्राप्ती होते’, असा दिव्य संदेश हिंदु धर्म देतो; म्हणूनच हिंदूंनो, ‘आपले अंतिम ध्येय स्वर्गप्राप्ती नसून मोक्षप्राप्ती आहे’, हे लक्षात घ्या. ‘हिंदु धर्माची ही महानता ओळखून गुरूंच्या मार्गदर्शनानुसार नियमित आध्यात्मिक साधना करा आणि मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करा’, यातच जीवनाचे सार्थक आहे.’

– श्री. गुरुप्रसाद गौडा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४४ वर्षे), हुब्बळ्ळी, कर्नाटक. (२१.३.२०२६)                          ॐ