अक्षय्य तृतीया

त्रेतायुगाचा प्रारंभदिन !

‘त्रेतायुगाचा प्रारंभदिन अक्षय्य तृतीया हा होता. या दिवशी एका युगाचा अंत होऊन दुसर्‍या युगाला प्रारंभ झाला. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलि अशा ४ युगांची सर्व वर्षे मिळून होणार्‍या युगाला ‘महायुग’ असे म्हणतात. ही ४ युगे ‘युगांधी’ (युगचरण) म्हणून मानली जातात. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ आहे, त्याला ‘कल्पादीं’, तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौरवर्षांइतका त्रेतायुगाचा काळ) प्रारंभ म्हणजे ‘युगांधी’ ! ही तिथी वैशाख शुक्ल तृतीयेला येते.

ज्या दिवशी एका युगाचा अंत होऊन दुसर्‍या युगाला प्रारंभ होतो, त्या दिवसाला हिंदु धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवसाने ‘एका कलहकालाचा अंत आणि दुसर्‍या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ’ अशी संधी साधलेली असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच ‘अक्षय्य तृतीया’ या दिवसाला साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त मानले जाते.’

– श्री. अशोक कुलकर्णी, संभाजीनगर 

अक्षय्य तृतीयेशी संबंधित महत्त्वपूर्ण घटना !

१. ‘या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.

२. नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.

३. श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.

४. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे (मूर्तीचे) चरणदर्शन होते. पूर्ण वर्षभर ते मंदिर वस्त्रांनी झाकलेले असते.’ – श्री. अशोक कुलकर्णी, संभाजीनगर

अक्षय्य तृतीयेला काय करावे ?

१. ‘आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो, असे मानले जाते.

२. या दिवशी मातीचे घागरीइतके मडके आणून त्यात पाणी भरून वाळा घालतात. त्याने पाण्याला सुगंध येतो.

३. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर किंवा द्रोणात खीर, आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढले जाते.

४. या दिवशी जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी. सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्र यांचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. ब्राह्मण भोजन घालावे.

५. या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खावे.

६. नवीन वस्त्रे, शस्त्रे आणि दागिने विकत घ्यावेत.

७. नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही या दिवशी केली जातात.’

– श्री. अशोक कुलकर्णी, संभाजीनगर

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे महत्त्व !

‘अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाचे दायित्व असणार्‍यांनी सामूहिकरित्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी विष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी आणि समृद्ध होते. नुसत्या लक्ष्मीदेवीची कृपा आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्ती आहे. जेथे विष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्ती कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करील ? म्हणून कोणत्याही रूपातील लक्ष्मीपूजनाच्या वेळी विष्णूला प्रथम आवाहन करावे आणि नंतर लक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होतो.’

– श्री. अशोक कुलकर्णी, संभाजीनगर

गौरी उत्सवाची सांगता

‘स्त्रिया या दिवशी हळदीकुंकू करतात. या वेळी सुवासिनींना कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, नारळाची करंजी देतात. या दिवशी बत्तासे, मोगर्‍याची फुले किवा गजरे देतात, तसेच भिजवलेल्या हरभर्‍यांनी ओटी भरली जाते. अशा रितीने गौरी उत्सवाची सांगता करण्यात येते.’

– श्री. अशोक कुलकर्णी, संभाजीनगर


अक्षय्य तृतीया आणि अध्यात्मशास्त्र !


१. ‘या दिवशी आरंभलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ ‘अक्षय्य’ (न संपणारे) असे मिळते. अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुण लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे ‘पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते’, अशी कल्पना आहे.
२. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख आणि समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेची उपासना कृतज्ञताभाव ठेवून केल्यास ‘तिच्या आपल्यावरील कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही’, अशी समजूत आहे.’
– श्री. अशोक कुलकर्णी, संभाजीनगर

अक्षय्य तृतीया : मृत्तिकापूजन आणि वृक्षारोपण !

‘सदोदित कृपादृष्टी ठेवणार्‍या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञभाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस !

मातीत आळी घालणे आणि पेरणी !

पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय्य तृतीया येते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतभूमीची मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतभूमीची स्वच्छता करून खतमिश्रित मातीच्या थरांना वर-खाली करणे.) या दिवशी मशागत केलेल्या भूमीतील मृत्तिकेविषयी कृतज्ञ भाव ठेवून शेतकरी पूजन केलेल्या मृत्तिकेत आळी (शेतीत पाणी वाहून जाण्यासाठी किंवा पिकांना पाणी देण्यासाठी मातीत बनवलेली लहान खाच) घालतात. कोकणात या दिवशी बियाणे पेरण्याची प्रथा आहे. या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास प्रारंभ केल्यास त्या बियाण्यांपासून विपुल धान्य पिकते आणि कधीही बियाणांचा तोटा पडत नाही. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य !) कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सतत पाऊस पडत राहिल्यास सुपीक भूमीतील चिकट मातीत आळी (लहान खाच) करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केल्यास भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते. (पूर्वी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच पावसाला प्रारंभ होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात. सध्या पावसाचे प्रमाण अल्प झाल्याने आणि शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने भूमी नापीक होत आहे. त्यामुळे कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही न्यून झाले आहे.)

वृक्षारोपण

या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात, अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही या शुभमुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.’

– श्री. अशोक कुलकर्णी, संभाजीनगर


अक्षय्य तृतीयेचा आध्यात्मिक लाभ !


१. ‘जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करील, तो पापांतून मुक्त होतो.
२. या दिवशी परशुरामाची पूजा करून त्याला अर्घ्य दिले जाते.
३. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते की, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला ‘अक्षय्य तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते.’
– श्री. अशोक कुलकर्णी, संभाजीनगर

तीलतर्पणाच्या साहाय्याने पूर्वजांचे ऋण कसे फेडावे ? 

‘अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उच्च लोकांतून येणारी सात्त्विकता ग्रहण करण्यासाठी भुवर्लाेकातील अनेक जीव पृथ्वीजवळ येतात. यातील बहुतांश जीव हे मानवाचे पूर्वज असतात. पूर्वज पृथ्वीजवळ आल्यामुळे अक्षय्य तृतीयेला मानवाला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. मानवावर पूर्वजांचे ऋणही पुष्कळ असते. हे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे. यासाठी ‘या दिवशी पूर्वजांना गती मिळण्याच्या दृष्टीने तीलतर्पण करावे’, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे.

एका ताटलीत आपल्या पूर्वजांना आवाहन करावे. पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळांमध्ये श्रीविष्णु आणि ब्रह्मा यांची तत्त्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी. त्यानंतर ‘पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणांवर तीळ अन् जल अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवावा. त्यानंतर २ – ३ मिनिटांनी देवतांच्या तत्त्वांनी भारित झालेले तीळ आणि अक्षदा पूर्वजांना अर्पण कराव्यात. सात्त्विक झालेले तीळ हातात घेऊन त्यावरून ताटामध्ये हळूवारपणे पाणी सोडावे. त्या वेळी दत्त, ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांना ‘पूर्वजांना गती देण्यासाठी प्रार्थना करावी’, असे शास्त्रात सांगितले आहे. तीलतर्पणामुळे पूर्वजांच्या सूक्ष्मदेहातील सात्त्विकता वाढून त्यांना पुढच्या लोकात जाण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. ‘मानवाला पूर्वजांपासून काही त्रास होत असल्यास तो न्यून होतो’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.’

– श्री. अशोक कुलकर्णी, संभाजीनगर

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.