२ कार्डियाक आणि १२ सर्वसाधारण रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्या ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्राथमिक आरोग्य केंद्रामधून खासगी रुग्णालयांकडे रुग्णांना पाठवणार्‍यांवर होणार कारवाई

डॉ. उदय सामंत

रत्नागिरी – जिल्हा शासकीय रुग्णालयाचे गेल्या २ वर्षापूर्वीपेक्षा सद्याचे काम चांगले आहे. गुढघारोपण सारख्या यशस्वी शस्त्रक्रिया होत आहेत. ही कौतुकाची गोष्ट आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा रुग्णालयाला लाभ झाला असून १४५ ‘डॉक्टर्स’ काम करत आहेत. २ कॉर्डियाक आणि १२ सर्वसाधारण रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्यावा, असे सांगतानाच प्राथमिक आरोग्य केंद्रातून जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयाकडे रुग्णांना पाठवणार्‍यांच्यावर कडक कारवाई करा, त्यासाठी भरारी पथक ठेवा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

जिल्हा शासकीय रुग्णालयात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले,

१. समिती सदस्यांनी रुग्णांशी बोलून त्यांच्या अडीअडचणी समजून त्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सांगितल्या पाहिजेत. महिन्यातून एकदा बैठक घेतली पाहिजे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेत येत असतात का ? रुग्णांच्या अडचणी रुग्णांसाठीच्या सुविधा याविषयीसुद्धा समिती सदस्यांनी देखरेख केली पाहिजे.

२. गरीब, गरजू रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार व्हायला हवेत. जर कुणी खासगी रुग्णालयाकडे रुग्ण पाठवत असतील, तर ते पडताळा. त्याविषयी त्यांच्यावर कारवाई करा. रुग्ण बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता घ्या. आरोग्य व्यवस्था सुधारली आहे. जिल्हा रुग्णालयात विविध शस्त्रक्रिया, गुढघारोपण यशस्वी होत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या तिसर्‍या वर्षाचे विद्यार्थीसुद्धा जिल्हा रुग्णालयात काम करत आहेत.

३. श्रवणतज्ञ (ऑडीओलॉजीस्ट) पडताळणी नसल्याने ज्या दिव्यांगांची पेन्शन थांबली आहे, त्यांच्यासाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथून ऑडीओलॉजीस्ट बोलावून शिबिरे घ्यावीत आणि प्रथम प्राधान्याने त्यांची पडताळणी करून त्यांची ‘पेन्शन’ चालू करा. दिव्यांगांच्या प्रमाणपत्रामध्ये काहीजणांचे दिव्यांगत्वाची टक्केवारी वाढलेली आहे, काही जणांची अल्प झालेली आहे. याची चौकशी केली जाईल. पूर्वीची आणि आताची याविषयी फेरतपासणी केली जाईल.