पिता-पुत्राच्या मृत्यूप्रकरणी तमिळनाडूच्या ९ पोलिसांना फाशीची शिक्षा !

‘मदुराई (तमिळनाडू) येथील ‘सीबीआय’ विशेष न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक निवाडा दिला. त्यात तमिळनाडूतील साथानकुलम् येथील कोठडीत पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याप्रकरणी ९ पोलीस कर्मचार्‍यांना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्याची फार थोडी उदाहरणे आहेत. या घटनेतून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’, असे ब्रीदवाक्य असणार्‍या पोलिसांचा पुन्हा एकदा राक्षसी मुखवटा जगापुढे आला.

जयराज आणि त्यांचा मुलगा बेन्निक्स

१. पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाकडून ९ पोलिसांना मृत्यूदंड

जून २०२० मध्ये थुथुकुडी जिल्ह्यातील साथानकुलम् येथे जयराज (वय ५९ वर्षे) आणि त्यांचा मुलगा बेन्निक्स (वय ३१ वर्षे) यांनी त्यांचे दुकान उघडे ठेवले होते. त्यामुळे कोविड महामारी काळातील दळणवळण बंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले होते. कोठडीत असतांना पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले. त्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. मुलाने स्वबळावर कष्ट करून व्यवसाय उभा केला होता. सरकारने ठरवून दिलेल्या वेळेहून अधिक वेळ दुकान उघडे ठेवले, अशा क्षुल्लक कारणाने दोन्ही पिता-पुत्रांना जीव गमवावा लागला. हे प्रकरण प्रचंड गाजले. त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण ‘सीबीआय’कडे वर्ग करण्यात आले. हत्या करणे, पुरावे नष्ट करणे आणि कट रचणे यांसारख्या गंभीर कलमांखाली संबंधित पोलिसांना दोषी धरण्यात आले. या प्रकरणात समोर आलेल्या साक्षी पुराव्याच्या आधारे मदुराई येथील ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने राक्षसी मनोवृत्तीच्या तब्बल ९  पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. दोषींमध्ये १ तत्कालीन पोलीस निरीक्षक, २ उपपोलीस निरीक्षक आणि ६ हवालदार यांचा समावेश आहे. विशेष न्यायालयाने याला ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ घटना संबोधले.

२. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील दुर्मिळ खटला

प्रारंभी या प्रकरणाचे अन्वेषण स्थानिक पोलिसांनी केले. जनतेचा प्रचंड रोष आणि मानवाधिकार आयोगाचा हस्तक्षेप यांमुळे हे अन्वेषण ‘सीबीआय’कडे सोपवण्यात आले. ‘सीबीआय’ने सादर केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी केलेल्या अमानुष छळाचे सविस्तर पुरावे दिले. कोठडीतील हिंसाचाराच्या संदर्भात हा निवाडा देशातील सर्वांत कठोर निवाड्यांपैकी  समजला जात आहे. ‘सीबीआय’ने सादर केलेले प्रयोगशाळेतील पुरावे, रक्ताचे नमुने आणि पोलीस ठाण्याच्या नोंदवहीतील फेरफार हे या प्रकरणातील दोषींना शिक्षा होण्यासाठी महत्त्वाची सूत्रे ठरली. हा ऐतिहासिक निवाडा देतांना मदुराई येथील विशेष ‘सीबीआय’ न्यायालयाचे न्यायाधीश जी. कुमारवेल यांनी ‘हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ या श्रेणीत मोडतो’, असे सांगितले. हा न्याय मिळवण्यासाठी जयराज आणि बेन्निक्स यांच्या कुटुंबाने ४ वर्षे लढा दिला.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

३. फाशीची शिक्षा झाल्याचे काही विशेष खटले 

वर्ष २००८ मध्ये कर्णावती येथे बाँबस्फोट झाला. या प्रकरणातील ३८ धर्मांध जिहादी आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. तत्पूर्वी वर्ष १९९२ मध्ये राजीव गांधी हत्याकांड प्रकरणात २६ लोकांना फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. निर्भया बलात्कार प्रकरणात ४ व्यक्तींना फाशीची शिक्षा सुनावली गेली होती आणि ती सर्वोच्च न्यायालयातही कायम राहिली. बाँबस्फोट करणे, देशाविरुद्ध कट रचणे, आक्रमणे करणे यांविषयी आतंकवादी याकूब आणि महंमद अफझल यांना फाशीच्या शिक्षा झालेल्या आहेत. ही सर्व प्रकरणे एका वेगळ्या प्रकारची होती. वर्ष २००५ मध्ये पोलीस कोठडी चालू असतांना उदय कुमार याचा कोठडीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी वर्ष २०१८ मध्ये थिरूवनंतपूरम् (केरळम्) विशेष न्यायालयाने २ पोलीस अधिकार्‍यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.

४. पोलीस विभागासाठी महत्त्वाचा धडा

पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी तब्बल ९ पोलीस कर्मचार्‍यांना मृत्यूदंड मिळणे, ही खरोखरच दुर्मिळ गोष्ट आहे. या निवाड्यामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. हा निवाडा मानवी हक्कांचे रक्षण आणि पोलीसदलातील उत्तरदायित्व निश्चित करणे, यांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. यातून पोलीस विभागाने बोध घेणे आवश्यक आहे.’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (८.४.२०२६)