चर्चा निष्फळ ठरल्याने ट्रम्प यांचा आदेश

नवी देहली – इराण समवेतची युद्ध स्थगितीवरील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता अमेरिकेने इराणच्या बंदरांची नाकेबंदी करण्यास प्रारंभ केल्याचे घोषित केले आहे. इराणची बंदरे, किनारी भागांत प्रवेश करणार्या किंवा तिथून बाहेर पडणार्या सर्व देशांच्या नौकांच्या विरोधात ही नाकेबंदी असणार आहे. यामध्ये अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातातील इराणच्या सर्व बंदरांचा समावेश आहे; मात्र ज्या नौका इराण सोडून इतर देशांच्या बंदरांकडे जाण्यासाठी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करत आहेत, त्यांच्या नौकानयन स्वातंत्र्यात अमेरिकेचे सैन्य कोणताही अडथळा आणणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. चर्चा निष्फळ झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘हॉर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी तात्काळ लागू होईल. मी जगातील सर्वोत्तम असलेल्या अमेरिकेच्या नौदलाला, आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणला कोणतेही शुल्क दिलेल्या कोणत्याही नौकेचा शोध घेऊन त्याला अडवण्याचे निर्देश दिले आहेत. अशा नौकांना समुद्रातून सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही. तात्काळ प्रभावाने ही प्रक्रिया प्रारंभ केली जाईल. इराणला तेल विक्री करण्यापासून रोखणे हा या नाकेबंदीचा उद्देश आहे’, अशी चेतावणी दिली होती.
इराणकडे अण्वस्त्र कधीच नसेल ! – ट्रम्प
इराण परत चर्चेला येईल कि नाही, याची मला पर्वा नाही. तो परत आला नाही, तरी मी समाधानी आहे. उपराष्ट्रपती जे.डी. वान्स यांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबादमध्ये झालेल्या शस्त्रसंधी चर्चेत इराणने अण्वस्त्र मिळवण्याचे संकेत दिले होते. त्याला अजूनही अण्वस्त्र हवे आहे आणि त्याने ती गोष्ट परवा रात्री स्पष्ट केली; पण इराणकडे अण्वस्त्र कधीच नसेल, असा ठाम विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.
अमेरिकेची नाकेबंदी अयशस्वी ठरेल ! – इराण
इराणने अमेरिकेच्या नौदल नाकेबंदीच्या विरोधात चेतावणी देतांना म्हटले की, ही नाकेबंदी अयशस्वी होईल आणि अमेरिकेला पराभवाला सामोरे जावे लागेल. ज्याप्रमाणे अमेरिका हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणविरुद्ध यशस्वी होऊ शकली नाही, त्याचप्रमाणे ती या वेळीही अपयशी ठरेल. इराणी सैन्य अमेरिकेला अशी कारवाई करू देणार नाही. इराणकडे प्रत्युत्तर देण्यासाठी अनेक पर्याय आहेत, जे अद्याप वापरले गेलेले नाहीत. इराण हा असा देश नाही, ज्याला काल्पनिक योजनांनी कोंडीत पकडता येईल.
आम्ही कोणत्याही धमकीपुढे झुकणार नाही ! – गालिबाफ

इराणच्या संसदेचे अध्यक्ष गालिबाफ यांनी ट्रम्प यांना चेतावणी देतांना म्हटले की, जर तुम्ही लढाईचा मार्ग स्वीकाराल, तर आम्हीही त्याचप्रमाणे उत्तर देऊ, जर तुम्ही समजुतीने पुढे आलात, तर आम्हीही समजुतीने संवाद साधू. आम्ही कोणत्याही धमकीपुढे झुकणार नाही. त्यांनी आमची इच्छाशक्ती पुन्हा तपासून पहावी, म्हणजे आम्ही त्यांना योग्य धडा शिकवू शकू.
.. तर समझोत्याचा मार्ग नक्कीच निघू शकतो ! – राष्ट्रपती पेजेश्कियान

इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी म्हटले की, जर अमेरिका सरकारने कठोर आणि दबावाची भूमिका सोडली अन् इराणी जनतेच्या अधिकारांचा आदर केला, तर समझोत्याचा मार्ग नक्कीच निघू शकतो.
‘बाब अल-मंडेब’ सामुद्रधुनीलाही धोका
अमेरिकेच्या निर्णयानंतर इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमाने संदेश देत बाब अल-मंडेब सामुद्रधुनीलाही लक्ष्य केले जाऊ शकते, अशी चेतावणी दिली. विशेषतः येमेनमधील हूती बंडखोरांकडून या मार्गावर दबाव वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बाब अल-मंडेब सामुद्रधुनी लाल समुद्राला एडनच्या आखाताशी जोडते आणि युरोप, आशिया तसेच पश्चिम आशियामधील व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात तेल, वायू आणि कंटेनर वाहतूक केली जाते. येथे अस्थिरता वाढल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे खर्च आणि विमा दर वाढतात.

डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !