दुटप्पी भूमिका ?

व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी शासनासमवेतच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटक यांनी उत्तरदायित्व स्वीकारून संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत विधानसभा अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. मुंबई येथे ‘सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागा’च्या वतीने ‘व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला बाबा सत्यपाल महाराज, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते.

कोणत्याही अमली पदार्थांचे व्यसन, ही केवळ वैयक्तिक समस्या नाही, तर सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या आहे. व्यसनामुळे आर्थिक आणि आरोग्याची हानी, गुन्हेगारीत वाढ, एकत्र कुटुंबपद्धतीचे विघटन, गृहकलक, शैक्षणिक सामाजिक स्तर खालावणे इत्यादी समस्या उद्भवतात. भारत हा जगातील सर्र्वांत तरुण देश असून वर्ष २०२७ पर्यंत जगातील ३ री सर्र्वांत मोठी अर्थव्यवस्था होईल. ‘विकसनशील राष्ट्र’  असलेल्या भारताने वर्ष २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ होण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असले, तरी चुकीच्या सरकारी धोरणामुळे या उद्दिष्टाला सुरुंग लागू नये, हीच अपेक्षा !

समाज व्यसनमुक्त घडवण्यासाठी नागरिक, संस्था आणि समाजातील प्रत्येक घटक धडपडत असतोच; मात्र त्याला राजाश्रय नसला, तर ती धडपड व्यर्थ ठरते. सातारा जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा (मॅफेड्रोनचा) साठा आढळून येत आहे. सातारासारख्या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये ‘उभी बाटली आडवी करून’ व्यसनाविरोधात मतदान घेतले जाते; मात्र दुसर्‍या बाजूला कर संकलनासाठी मद्यविक्रीच्या असंख्य दुकानांना प्रशासनाकडूनच अनुमतीपत्र प्रदान केले जाते ! जरी केंद्रीय मंत्र्यांनी ‘नशा’ आणि ‘गरिबी’ मुक्तीचा संकल्प केला असला, तरी प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे हा संकल्प सिद्धीस जाणे केवळ अशक्य आहे ! व्यसनमुक्तीसाठी कार्य करणार्‍या शेकडो व्यक्ती आणि संस्था यांचा सत्कार करतांना हा ढोंगीपणा उघड झाला आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? सामाजिक न्यायाचे उत्तरदायित्व सांभाळणार्‍या केंद्र आणि राज्य येथील मंत्र्यांनी ‘नशायुक्त’ समाजाला ‘नशामुक्त’ करण्यासाठी कार्य करण्यासह मुळावर घाव घालत मद्यविक्रीची अनुमती देणे बंद करणे, अमली पदार्थांचा साठा नष्ट करणे, त्याची निर्मिती आणि विक्री करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणे अशा कठोर भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. समाजानेही अशा दुटप्पी धोरणांविषयी प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे !

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा