मानवी जीवनाचा संकुचिततेकडून व्यापकतेकडे होणारा नैसर्गिक प्रवास दर्शवणारी कुंडलीतील १२ स्थाने !

‘जन्मकुंडलीतील १२ स्थाने ही मनुष्याचा नैसर्गिक जीवनप्रवास दर्शवतात. हा प्रवास संकुचिततेकडून व्यापकतेकडे, स्थुलातून सूक्ष्माकडे, तामसिकतेकडून सात्त्विकतेकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे आहे. प्रस्तुत लेखातून कुंडलीतील स्थानांचे रहस्य समजून घेऊया.

हिंदु धर्मात प्रत्येक गोष्टीचा किती सखोल आणि सूक्ष्म विचार केला आहे, याचे उदाहरण म्हणून हा लेख प्रकाशित करत आहोत.

१. कुंडलीतील स्थाने म्हणजे काय ?

कुंडलीतील स्थाने म्हणजे आकाशाचे १२ विभाग. एक विभाग ३० अंशाचा असतो. १२ विभाग मिळून आकाशाचे ३६० अंश होतात. हे विभाग पृथ्वीसापेक्ष असतात; म्हणजे व्यक्ती पृथ्वीवर जेथे उभी असते, त्या स्थळाला अनुसरून हे १२ विभाग असतात. मानवी जीवनातील सर्व गोष्टी या १२ विभागांमध्ये सामावलेल्या असतात.

१ अ. कुंडलीतील स्थाने आणि आकाशातील ४ मुख्य बिंदू

१. कुंडलीतील प्रथम स्थान हे पूर्व क्षितिजाचे दर्शक असते. क्षितीज (horizon) म्हणजे भूमी आणि आकाश जेथे एकमेकांना मिळाल्यासारखे वाटतात, तो भाग. पूर्व क्षितिजावर जो ग्रह उदय पावत असेल, तो कुंडलीत प्रथम स्थानात लिहिला जातो.

२. कुंडलीतील दशम स्थान हे ‘खस्वस्तिका’चे दर्शक असते. खस्वस्तिक, म्हणजे पृथ्वीवर उभी असलेल्या व्यक्तीच्या डोक्याच्या बरोबर वर असलेला आकाशाचा भाग. खस्वस्तिकावर जो ग्रह येईल, तो कुंडलीत दशम स्थानात लिहिला जातो.

३. कुंडलीतील सप्तम स्थान हे पश्चिम क्षितिजाचे दर्शक असते. पश्चिम क्षितिजावर जो ग्रह अस्त पावत असेल, तो कुंडलीत सप्तम स्थानात लिहिला जातो.

४. कुंडलीतील चतुर्थ स्थान हे ‘अधःस्वस्तिका’चे दर्शक आहे. अधःस्वस्तिक म्हणजे खस्वस्तिकाच्या बरोबर विरुद्ध दिशेत असलेला, तसेच व्यक्तीला दिसू न शकणारा (पायाखालचा) आकाशाचा भाग. अधःस्वस्तिकावर जो ग्रह येईल, तो कुंडलीत चतुर्थ स्थानात लिहिला जातो.

२. कुंडलीतील स्थानांची विभागणी

कुंडलीतील १२ स्थानांची २ प्रकारे विभागणी करण्यात आली आहे – पुरुषार्थानुसार आणि स्वभावानुसार.

२ अ. पुरुषार्थानुसार : पहिली विभागणी पुरुषार्थानुसार करण्यात आली आहे. कुंडलीतील १, ५, ९ ही स्थाने ‘धर्म पुरुषार्थ’; २, ६, १० ही स्थाने ‘अर्थ पुरुषार्थ’; ३, ७, ११ ही स्थाने ‘काम पुरुषार्थ’ आणि ४, ८, १२ ही स्थाने ‘मोक्ष पुरुषार्थ’ दर्शवणारी स्थाने आहेत.

२ आ. स्वभावानुसार : द्वितीय विभागणी ही स्वभावानुसार करण्यात आली आहे. कुंडलीतील १, ४, ७, १० ही स्थाने ‘चर स्वभावी स्थाने’; २, ५, ८, ११ ही स्थाने ‘स्थिर स्वभावी स्थाने’; तर ३, ६, ९, १२ ही स्थाने ‘द्विस्वभावी स्थाने’ आहेत. हे पुढील सारणीत दिले आहे.

३. पुरुषार्थ आणि स्वभाव यांनुसार स्थानांची वैशिष्ट्ये

कुंडलीतील स्थानांना दिलेले पुरुषार्थ आणि स्वभाव यांमुळे तेथील प्रत्येक स्थानाचे निराळे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यात झालेला हा मेळ कोणती रहस्ये उलगडतात, हे पाहूया.

३ अ. चर स्वभावी स्थानांद्वारे ४ पुरुषार्थ साध्य करण्यासाठी मनुष्याला करावे लागणारे प्रयत्न सूचित होणे : ‘निसर्ग (कालपुरुषाच्या) कुंडलीत’ (मेष रास प्रथम स्थानात असलेल्या कुंडलीत) १, ४, ७ आणि १० या स्थानांमध्ये अनुक्रमे मेष, कर्क, तूळ आणि मकर या चर स्वभावी राशी येतात. ‘चर’ म्हणजे गती किंवा हालचाल. गती ही प्रयत्नांची सूचक आहे. धर्मादी पुरुषार्थे साध्य करण्यासाठी मनुष्याला जे प्रयत्न करावे लागतात, ते या स्थानांतून सूचित होतात. ही कुंडलीतील बलवान स्थाने आहेत. ज्योतिषशास्त्रातील बहुतांश ‘राजयोग’ (उत्तमोत्तम फळे देणारे योग) हे या ४ स्थानांतील ग्रहयोगांमुळे होतात. या ४ स्थानांतील बलवान ग्रह व्यक्तीला प्रयत्नवादी, परिश्रमी आणि पराक्रमी बनवतात. या ४ स्थानांची संक्षिप्त माहिती पुढे दिली आहे.

३ अ १. प्रथम स्थान : प्रथम स्थान हे धर्म पुरुषार्थाचे आणि चर स्वभावाचे आहे. धर्म म्हणजे स्वभाव किंवा प्रवृत्ती. व्यक्तीची जन्मजात प्रवृत्ती आणि प्रकृती कशी असेल ? तिच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास कोणत्या दिशेने होईल ? तिला जीवनात कोणत्या गोष्टीची ओढ आहे ? तिचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा आहे ? इत्यादी गोष्टी प्रथम स्थानाशी संबंधित आहेत. प्रथम स्थानातील ग्रह, प्रथम स्थानाच्या स्वामीचा अन्य ग्रहांशी असलेला योग, प्रथम स्थानातील रास आदी घटकांवरून या गोष्टी लक्षात येतात.

३ अ २. चतुर्थ स्थान : चतुर्थ स्थान हे मोक्ष पुरुषार्थाचे आणि चर स्वभावाचे आहे. व्यक्तीला जीवनात लागणारी मानसिक सुरक्षितता, आधार आणि सहानुभूती हे चतुर्थ स्थान सूचित करते. त्यामुळे हे स्थान गृह, माता, कुटुंब आदी गोष्टींशी संबंधित आहे. हे मोक्ष पुरुषार्थाचे पहिले स्थान आहे; कारण येथे मनाचे अंतरंग आहे. व्यक्तीला मनाच्या अंतरंगात डोकावून पहाण्याची, म्हणजे ‘स्व’चा शोध घेण्याची इच्छा येथून होते. येथून अध्यात्माच्या प्रवासाचा आरंभ होतो.

श्री. राज कर्वे

३ अ ३. सप्तम स्थान : सप्तम स्थान हे ‘काम’ पुरुषार्थाचे आणि चर स्वभावाचे आहे. हे व्यक्तीच्या परस्पर-संबंधांचे स्थान आहे. त्यामुळे वैवाहिक जोडीदार, व्यवहारातील भागीदार, निकटवर्तीय, प्रतिस्पर्धी आदी व्यक्तींशी संबंध कसे रहातील, हे सप्तम स्थान सूचित करते. हे स्थान व्यक्तीचे देवाण-घेवाण संबंध दर्शवते.

३ अ ४. दशम स्थान : दशम स्थान हे ‘अर्थ’ पुरुषार्थाचे आणि ‘चर’ स्वभावाचे आहे. हे कर्मस्थान आहे. व्यक्तीने कोणती कर्मे करण्यासाठी जन्म घेतला ? तिचे नियत (नियतीने नेमलेले) कर्म कोणते ? तिचे कार्यक्षेत्र कोणते ? आदी गोष्टी दशम स्थानावरून कळतात. व्यक्तीला जीवनात असलेली कर्तव्ये आणि दायित्व यांचा बोध या स्थानावरून होतो. व्यक्तीचा कर्म करण्यामागे असलेला दृष्टीकोन दशम स्थानावरून सूचित होतो.

३ आ. स्थिर स्वभावी स्थानांद्वारे ४ पुरुषार्थांचा संचय सूचित होणे : ‘निसर्ग (कालपुरुषाच्या) कुंडलीत’ २, ५, ८, ११ या स्थानांमध्ये अनुक्रमे वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या स्थिर स्वभावी राशी येतात. स्थिरता ही ‘संचय’ किंवा ‘संग्रह’ यांची दर्शक असते. त्यामुळे २, ५, ८, ११ या स्थानांमध्ये धर्मादी पुरुषार्थांशी संबंधित गोष्टींचा संचय होतो. ही स्थाने बलवान आणि शुभ असणे, हे व्यक्तीने पूर्वजन्मी पुण्यकर्मे केल्याचे दर्शक असते. या ४ स्थानांची संक्षिप्त माहिती पुढे दिली आहे.

३ आ १. द्वितीय (२) स्थान : द्वितीय स्थान हे ‘अर्थ’ पुरुषार्थाचे आणि ‘स्थिर’ स्वभावाचे आहे. येथे अर्थाचा (धनाचा) संचय होतो. स्थावर संपत्ती, धन, मौल्यवान वस्तू यांसारख्या ज्या भौतिक वस्तूंवर व्यक्तीचे स्वामित्व असते, त्या येथून लक्षात येतात. हे स्थान व्यक्तीचे बालपण दर्शवते. त्यामुळे बालपणी होणारे संस्कार आणि घराण्याच्या परंपरा येथून दिसतात. हे व्यक्तीचे पोषण करणारे स्थान आहे.

३ आ २. पंचम (५) स्थान : पंचम स्थान हे ‘धर्म’ पुरुषार्थाचे आणि ‘स्थिर’ स्वभावाचे आहे. हे स्थान व्यक्तीने मागील जन्मी केलेल्या चांगल्या कर्मांमुळे निर्माण झालेला पुण्यसंचय दर्शवते. हे स्थान बुद्धीमत्ता आणि विद्या दर्शवते. हे व्यक्तीचे ‘स्वधर्म’ दर्शवणारे स्थान आहे. याचा अर्थ हे स्थान व्यक्तीच्या मूलभूत प्रवृत्तीनुसार त्याची असलेली क्षमता दर्शवते. पंचम स्थान जेवढे बलवान असेल, तेवढी व्यक्तीची क्षमता आणि तिच्या जीवनाचा पाया चांगला असतो.

३ आ ३. अष्टम (८) स्थान : अष्टम स्थान हे ‘मोक्ष’ पुरुषार्थाचे आणि ‘स्थिर’ स्वभावाचे आहे. ‘आकस्मिकता’ आणि ‘रूपांतरण’ ही या स्थानाची वैशिष्ट्ये आहे. जीवनात अशा काही गोष्टी अकस्मातपणे घडतात, ज्यामुळे जीवनाला नवे वळण येते. या स्थानात असलेला संचय गुप्त स्वरूपाचा असतो आणि तो अचानकपणे प्रकट होतो. हे एक मोक्षस्थान आहे; कारण अध्यात्माची कास धरणे, म्हणजे स्वतःत खोल जाणे, स्वतःतील गुप्त आणि अदृश्य तत्त्वांचा शोध घेणे अन् स्वतःचे आध्यात्मिक रूपांतरण करणे. हे स्थान कुंडलीतील बुद्धीअगम्य आणि रोचक स्थान आहे.

३ आ ४. एकादश (११) स्थान : एकादश स्थान हे ‘काम’ पुरुषार्थाचे आणि ‘स्थिर’ स्वभावाचे आहे. येथे कामना आणि इच्छा यांचा संचय आहे. या स्थानातील ग्रह त्यांच्या गुणधर्मांप्रमाणे व्यक्तीतील कामना दर्शवतात. या कामना जन्मजात असतात. त्यांच्या पूर्तीसाठी व्यक्ती प्रयत्नरत असते. कामनांमुळे मनुष्य क्रियाशील होतो आणि क्रियेमुळे लाभ होतो. त्यामुळे या स्थानाला ‘लाभ स्थान’ म्हणतात. या स्थानावरून धनाची आवक, प्रसिद्धी, मित्रमंडळी आदी गोष्टी लक्षात घेता येतात.

३ इ. द्विस्वभावी स्थानांद्वारे व्यक्तीमध्ये निर्माण होणारा विवेक आणि व्यापकता सूचित होणे : ‘निसर्ग कुंडलीत’ ३, ६, ९, १२ या स्थानांमध्ये अनुक्रमे मिथुन, कन्या, धनु आणि मीन या द्विस्वभावी राशी येतात. द्विस्वभावत्व हे वैचारिक शक्तीचे लक्षण आहे. एखाद्या गोष्टीचा सारासार विचार करतांना व्यक्ती ‘योग्य काय आणि अयोग्य काय ?’, असा विचार करते. हा विचारांचा उहापोह म्हणजेच द्विस्वभावत्व. ३, ६, ९, १२ ही स्थाने व्यक्तीचा विवेक जागृत करणारी आणि व्यक्तीला व्यापक बनवणारी स्थाने आहेत. ही स्थाने काही मिळवण्यापेक्षा त्यागण्याचा संदेश देतात.

३ इ १. तृतीय (३) स्थान : तृतीय स्थान हे ‘काम’ पुरुषार्थाचे आणि द्विस्वभावाचे आहे. येथे असलेल्या कामना या इंद्रियजन्य नसून बुद्धीजन्य आहेत. हे स्थान संवाद, वक्तृत्व, लेखन, सादरीकरण आदींचे कौशल्य दर्शवते. हे स्थान वैचारिक शक्ती आणि कल्पनाशक्ती यांना बळ देणारे आहे. जीवनाची सार्थकता आणि उदात्तता शोधण्याची जिज्ञासूवृत्ती हे स्थान दर्शवते. हे स्थान साहित्यिक, कवी, विचारवंत, तत्त्वज्ञ आदींसाठी महत्त्वाचे असते.

३ इ २. षष्ठ (६) स्थान : षष्ठ स्थान हे ‘अर्थ’ पुरुषार्थाचे आणि द्विस्वभावाचे आहे. हे स्थाने धन मिळवण्यापेक्षा दान करण्याकडे, तसेच अधिकार मिळवण्यापेक्षा सेवा करण्याकडे कल असल्याचे दर्शवते. हे स्थान समाजाच्या कल्याणासाठीचे कार्य दर्शवते. त्यामुळे आध्यात्मिक दृष्टीने हे स्थान शुभ आहे. ‘संघर्ष’ हे या स्थानाचे सार आहे. त्यामुळे शत्रू, कर्ज, व्याधी, कष्ट या गोष्टी या स्थानावरून लक्षात येतात. नकारात्मक गोष्टी असल्यामुळे हे स्थान अशुभ मानतात; परंतु संघर्षातून माणूस घडत असतो; म्हणून दीर्घकाळाच्या दृष्टीने हे स्थान लाभदायक आहे.

३ इ ३. नवम (९) स्थान : नवम स्थान हे ‘धर्म’ पुरुषार्थाचे आणि द्विस्वभावाचे आहे. हे स्थान उदात्तता (महानता) याच्याशी संबंधित आहे. जीवनातातील महान तत्त्वे, उदा. सत्य, श्रद्धा, नीती, मूल्ये, गुरु आदी या स्थानाशी संबंधित आहेत. या स्थानाला ‘भाग्य’ स्थान म्हटले जाते; परंतु त्याचा अर्थ ‘सांसारिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी लागणारे नशीब’ एवढ्यापुरता मर्यादित नाही, तर ‘आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि क्षमता’, असा त्याचा सूक्ष्म अर्थ आहे; कारण ‘भाग्य’ याचा खरा अर्थ ‘जे आपली आध्यात्मिक उन्नती साधण्यास साहाय्यक असते, ते म्हणजे भाग्य !’ नवम स्थानावरून पूर्वजन्मी केलेल्या साधनेचा बोध होतो.

३ इ ४. द्वादश (१२) स्थान : द्वादश स्थान हे ‘मोक्ष’ पुरुषार्थाचे आणि द्विस्वभावाचे आहे. ‘त्याग’ हे या स्थानाचे सार आहे. येथे जीवनाची सार्थकता आहे. नवम स्थानात सात्त्विक इच्छा शेष रहातात; पण बाराव्या स्थानात कोणतीही इच्छा शेष रहात नाही. सर्व कामनांचा त्याग झाल्यावर प्रगट होणारा निर्भेळ आनंद या स्थानात आहे. या स्थानात सर्वस्वाचा त्याग, समर्पण आणि ईश्वराप्रती शरणागती आहे. या स्थानाला ‘मुक्तीस्थान’ म्हणतात. हे स्थान म्हणजे जीवात्म्याच्या प्रवासातील अंतिम चरण आहे. कुंडलीत बारावे स्थान शुभ आणि आध्यात्मिक ग्रहांशी संबंधित असल्यास व्यक्तीने पुढील आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी जन्म घेतलेला असतो.

४. कुंडलीतील १२ स्थाने व्यक्तीचा नैसर्गिक विकासक्रम दर्शवत असणे

वरील विवेचनातून लक्षात येते की, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या ४ पुरुषार्थांना कुंडलीत प्रत्येकी ३ स्थाने देण्यात आली आहेत. त्यांपैकी १, ४, ७, १० ही स्थाने मनुष्याचे प्रयत्न आणि कर्तृत्व दर्शवतात. १, ४, ७, १० या स्थानांद्वारे मनुष्य जे प्रयत्न करतो, त्यांचा संचय २, ५, ८, ११ या स्थानांमध्ये होतो. ही स्थाने मनुष्याने केलेल्या कर्मानुसार त्याला चांगले-वाईट फळ देतात. २, ५, ८, ११ या स्थानांद्वारे मनुष्य जे चांगले-वाईट फळ भोगतो आणि सर्व प्रकारचे अनुभव घेतो, त्यांद्वारे तो शिकतो आणि प्रगल्भ होऊ लागतो. प्रगल्भतेमुळे जागृत होणारा विवेक ३, ६, ९, १२ या स्थानांद्वारे दिसतो. येथे मनुष्य आत्मकेंद्रितपणा त्यागून जीवनातील उदात्तता आणि सार्थकता जाणून त्यांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. तो त्यागी, व्यापक आणि ज्ञानी होऊन आत्मिक विकास साधतो.

अशा प्रकारे कुंडलीतील १२ स्थाने ही व्यक्तीचा नैसर्गिक विकासक्रम दाखवतात. ‘कामना निर्माण होणे, त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करणे, केलेल्या प्रयत्नांचे फळ भोगणे, त्यातून शिकणे आणि शेवटी सगळ्याचा त्याग करणे’, असा हा नैसर्गिक विकासक्रम आहे. ज्योतिष हे केवळ एक शास्त्र नसून एक तत्त्वज्ञान आहे. ते व्यक्तीला विकासाच्या पुढच्या पायरीवर घेऊन जाण्यासाठी ईश्वराने दिलेले एक माध्यम आहे, अशी प्रचिती याद्वारे येते !’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१८.११.२०२५)