वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक २०
आपण लेख क्र. १९ मध्ये (४ एप्रिल २०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये) स्वयंपाकघराविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या लेखामध्ये आपण शयनकक्षाविषयी माहिती जाणून घेऊया. शयनकक्ष हासुद्धा आपल्या वास्तूतील एक महत्त्वाचा भाग आहे; कारण या ठिकाणी आपण जवळपास ७ ते ८ घंटे एकाच ठिकाणी झोपलेले असतो. येथील स्पंदनांचा आपल्यावर परिणाम होत असतो. यासाठी शयनकक्षाची दिशा आणि रचना इत्यादी गोष्टी योग्य असणे आवश्यक आहे.
लेखांक १९ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1026049.html
१. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या अनुषंगाने शयनकक्षाचा विचार
शयनकक्षाचा विचार करतांना प्राधान्याने गृहस्वामीच्या कक्षाचा विचार वास्तूशास्त्रामध्ये केलेला आहे. याविषयी पुढील श्लोक आहे.
दक्षिणावसथकं गृहेशितुर्वामरङ्गमुदितं तु योषितः ।
तद्विपर्ययमशोभनं तयोश्चित्तदुःखमनिशं ददाति हि ॥ – मयमतम्, अध्याय २७, श्लोक १३३
अर्थ : गृहस्वामीची खोली दक्षिणेला असावी आणि त्याच्या डाव्या बाजूला पत्नीची व्यवस्था असावी. या विपरीत झाल्यास दोघांची वाईट विचारांनी मनःशांती दुरावेल.
तसेच घरमालकाची खोली नैर्ऋत्य दिशेला असावी, असाही नियम सांगितला आहे, त्यामध्ये नैर्ऋत्य दिशा ही पृथ्वी तत्त्वाची दिशा असल्याने वास्तूमालकाला स्थिरता प्रदान करते. केवळ झोपतांना डोके पूर्वेला होईल, अशी व्यवस्था असावी.
अविवाहीत मुलीसाठी खोलीचा विचार करतांना वायव्येकडील रुद्र अथवा यक्ष्मा पदांमध्ये तिची झोपण्याची व्यवस्था असावी. यामुळे पुढे तिच्या विवाहादी विषयांमध्ये लाभ होतो. तसेच अविवाहीत मुलांसाठी आग्नेय दिशेस ‘सवितृ’ आणि ‘सावितृ’ या पदांमध्ये व्यवस्था असावी. ही दिशा अग्नीतत्त्वाची असल्याने मुले ऊर्जावान रहाण्यास साहाय्य होते.
एकाच कुटुंबातील ३ भाऊ असल्यास जो सर्वांत वडीलधारी असेल, त्याची खोली नैर्ऋत्येस असावी. द्वितीय क्रमांकाच्या भावाची खोली दक्षिणेस आणि तृतीय क्रमाकाच्या भावाची खोली पश्चिमेस असावी. भावांची संख्या अधिक असल्यास याप्रमाणेच पुढील क्रम ठेवावा.

२. झोपतांना डोके कुठे असावे ?
शयनकक्ष कुणासाठीही असला, तरी झोपतांना डोके कोणत्या दिशेस असावे, याविषयी सर्वांसाठीच सारखे नियम आहेत.
सौम्यं प्रत्यक्छिरो मृत्युर्वंशाद्या रुक्सुतार्तिदा ।
प्राक्छिराः शयने विद्याद् दक्षिणे सुखसंपदः ॥ – विश्वकर्मप्रकाश, अध्याय १०, श्लोक ४९
अर्थ : झोपतांना उत्तरेस किंवा पश्चिमेस डोके करून झोपल्यास मृत्यू येतो. पलंगाच्या पट्टीवर डोके ठेवून झोपल्यास रोगकारक आणि लहान मुलांना दुःखकारक असते. पूर्वेकडे डोके केल्यास विद्यालाभ होतो आणि दक्षिणेस केल्यास सुख-संपत्तीचा लाभ होतो.
आपल्या शरिराच्या ध्रुव बिंदूनुसार विचार करता डोके हे उत्तर ध्रुव आणि पाय हे दक्षिण ध्रुव मानले जाते. दोन विजातीय बिंदू एकत्र राहू शकतात; परंतु सजातीय बिंदु एकत्र आल्यास अस्वस्थता निर्माण होते. म्हणून उत्तरेकडे डोके करून झोपू नये.
३. झोपण्यासाठी पलंग कोणत्या लाकडाचा असावा ?
झोपण्यासाठी पलंग कोणत्या लाकडाचा करावा, याचेही नियम वास्तूशास्त्रामध्ये आलेले आहे; कारण त्याचाही परीणाम झोपणार्या व्यक्तीवर होत असतो.
कथयामि तथा शय्यां येन सौख्यमवाप्नुयात् ।
अशनस्पन्दनचन्दनहरिद्रुसुरदारुतिन्दुकीशालाः॥
काश्मर्यार्ज्जुनपद्मकशाकाम्राः शिंशिपा च शुभाः । – विश्वकर्मप्रकाश, अध्याय १०, श्लोक ५४, ५५
अर्थ : आता मी मानवाला सुख प्रदान करणार्या पलंगासाठी योग्य लाकूड सांगतो. अशन (विजयसार), स्पंदन, चंदन, हळद, देवदार, टेंभुर्णी, शाल, अस्मरी, अर्जुन, पद्मकाष्ठ, शाक, आंबा, सागवान या वृक्षांचे लाकूड हे पलंगादी सिद्ध करण्यास शुभ असतात.
४. पलंगासाठी कोणती लाकडे वर्ज्य करावीत ?
अशनिजलानिलहस्तिप्रपातिता मधुविहङ्गकृतनिलयाः ॥
चैत्यश्मशानपथिजार्धशुष्कवल्लीनिबद्धाश्च ।
कण्टकिनो ये स्युर्महानदीसंगमोद्भवा ये च ॥
सूरप्रासादगा ये च याम्यपश्चिमदिरगताः ।
प्रतिषिद्धवृक्षजा ये ये चान्येऽपि अनेकधा ॥
त्याज्यास्ते दारवस्सर्वं शय्याकर्मणि कर्मवित् । – विश्वकर्मप्रकाश, अध्याय १०, श्लोक ५५ ते ५८
अर्थ : वीज, पाणी, हवा किंवा हत्तीने पाडलेली झाडे, मधमाशांचे पोळे, अनेक पक्षांची घरटे असलेली झाडे, चैत्य, स्मशान किंवा रस्त्याच्या बाजूंना असलेली झाडे, अपुरे सुकलेले, लता-वेली आदींनी लपेटलेले, काटेदार झाडे, मोठ्या नद्यांच्या संगमावर वाढलेली झाडे, देवालयाच्या परिसरातील वृक्ष, कोणत्याही गावाच्या दक्षिणेस किंवा पश्चिमेस उत्पन्न झालेली झाडे आणि निषिद्ध असलेली झाडे यांचे लाकूड शय्येसाठी, म्हणजे पलंगासाठी वापरू नये.

५. अन्य काही सूत्रे
अ. झोपतांना शरिराच्या वर बीम (तुळई) इत्यादी गोष्टी येऊ नये. ज्या भागावर बीम येतो, त्या अवयवासंदर्भात आजार होण्याची शक्यता वाढते.
आ. शयनगृहात झोपतांना आरसा समोर असू नये, म्हणजे आपण झोपलेल्या स्थितीतील प्रतिबिंब आरशात दिसू नये.
इ. झोपतांना डोक्याच्या बाजूला वातानुकूलन यंत्र (एसी) वगैरे तत्सम अधिक विद्युत् क्षमतेचे यंत्र असू नये.
ई. घरमालकाची खोली नैर्ऋत्य दिशेला घेतल्यावर दक्षिण दिशेत खिडकी घेऊ नये. घेतल्यास शक्यतो बंद ठेवावी.
उ. पाहुण्यांसाठी खोलीची व्यवस्था वायव्य दिशेत करावी, तर घरातील निवृत्त आणि वयस्कर यांची व्यवस्था ईशान्य दिशेत करावी. आजारी व्यक्तींना ईशान्य दिशेत खोली दिल्यास त्यांचे आजारपण न्यून होण्यास साहाय्य होते.
६. विद्याभ्यासासाठी योग्य स्थान
मृगे च सर्वजातीनां विद्याभ्यासार्थ मंडपम् । – मानसार
अर्थ : घरामध्ये अध्ययनासाठी मृग पद हे सर्वांत लाभदायक आहेत. त्या ठिकाणी आपण विद्याभ्यासाला बसण्याची व्यवस्था करू शकतो.
(संदर्भ ग्रंथ : मयमतम्, विश्वकर्मप्रकाश, मानसार)
– गुरुसेवक श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (९.४.२०२६)
लेखांक २१ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1033383.html

क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !