वास्तूशास्त्रानुसार पाणी, सांडपाणी आणि जिना यांची जागा

वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक २१

११ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये आपण ‘शयनकक्षा’विषयी जाणून घेतले. आता आपण वास्तूमध्ये पाण्याचा साठा कुठे असावा ? याविषयी जाणून घेऊया. यासाठी आपल्याला दिशांच्या तत्त्वांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. पाण्याचा अभ्यास करतांना वापरण्यासाठीचे पाणी आणि सांडपाणी या दोन्ही दृष्टीने आपल्याला विचार करावा लागतो.

लेखांक २० वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1028565.html

१. पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने दिशा आणि घ्यावयाची काळजी

अ. ईशान्य दिशा ही जलतत्त्वाची दिशा आहे. त्यामुळे साहजिकच पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने ही दिशा अनुकूल आहे. या दिशेला विशेष करून पर्जन्य, आप, अपवत्स या पदांमध्ये पाण्याचा साठा, म्हणजेच भूमीखाली पाण्याची टाकी, विहीर, बोरवेल आदींचा विचार आपण करू शकतो. केवळ ईशान्य दिशेला जर पाण्याची टाकी असून त्याच्यासमोरच मुख्य दरवाजा असेल, तर द्वार वेध निर्माण होतो. म्हणून भूमीखालील पाण्याचा साठा आणि मुख्य प्रवेशद्वार एकाच ठिकाणी नसावे.

आ. नैऋत्य दिशा ही अधिकाधिक कोरडी असणे आवश्यक आहे. नैऋत्य दिशेला घरावर आपण पाण्याची मोठी टाकी ठेवू शकतो; कारण नैऋत्य दिशा ही जड असणे आवश्यक आहे; परंतु त्या दिशेला पाणी झिरपणार नाही किंवा सांडणार नाही, याची मात्र काळजी घेणे आवश्यक असते. नाही तर या दिशेला पाणी सांडल्यास त्यातून नवीन वास्तूदोष निर्माण होतो.

इ. आग्नेय दिशा ही अग्नीतत्त्वाची दिशा आहे आणि अग्नी अन् जल यांमध्ये शत्रूत्व आहे. त्यामुळे आग्नेय दिशेस पाणीसाठा आल्यास संततीविषयक अडचणी निर्माण होतात. घरामध्ये सतत वादविवाद, कटकट आणि तामसी स्वभाव निर्माण होतो. घरातील ऊर्जा नष्ट होऊन कठीण जीवन जगावे लागते.

ई. दक्षिण दिशेमध्ये भूमीखाली पाण्याचा साठा कधीही करू नये. यामुळे पोटाचे आजार संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.

उ. पश्चिम दिशेला जर पाणीसाठा घ्यायचा असेल, तर तो वरुण पदामध्ये घ्यावा.

ऊ. वायव्य दिशेमध्ये पाण्याचा साठा घेतल्यास त्याची योग्य ती स्वच्छता राखणे आवश्यक आहे. अस्वच्छतेमुळे वायुतत्त्व दूषित होऊन घरामध्ये चंचलता, भ्रमिष्टपणा, मानसिक त्रास, तसेच नोकर वर्गाकडून त्रास होण्याची शक्यता असते.

ए. उत्तर दिशेला सोम पदामध्ये भूमीखाली पाण्याचा साठा करू नये. यामुळे संपत्तीचा क्षय होतो.

ऐ. विहीर, कूपनलिका हे सर्प ते महेंद्र या ईशान्य चौकोनात असावी.

श्री. श्रेयस पिसोळकर

२. सांडपाण्याची व्यवस्था

सांडपाण्याची व्यवस्था कधीही दक्षिण आणि नैऋत्य भागात करू नये. नैऋत्य दिशेकडून ईशान्य दिशेकडे वार्‍याचा सर्वसाधारण प्रभाव असतो. त्यामुळे नैऋत्य दिशेत असेल, तर दुर्गंधी आणि सूक्ष्मजंतू यांचे वहन ईशान्य दिशेकडे होते. संपूर्ण वास्तूमध्ये त्याचे संचलन होते; म्हणून सांडपाणी नैऋत्येत नसावे. ‘सेप्टीक टँक’ वायव्य दिशेत शोष या पदामध्ये करावा.

३. घरातील जिना 

जिना म्हणजे घरातील एक जड भाग म्हणून आपण विचार करतो. त्यामुळे तो नैऋत्य दक्षिण-पश्चिम दिशेत असणे अधिक योग्य आहे. ‘जिना हा प्रदक्षिणा मार्गाने वर जाणारा असावा’, असा आग्रह वास्तूग्रंथांमध्ये केला आहे. जिन्याच्या पायर्‍या सम संख्येत असाव्यात. त्यामध्येही शून्य समसंख्या, म्हणजेच १०,२०, ३० अशा नसाव्यात. वास्तूशास्त्रामध्ये गोल वर जाणार्‍या जिन्याचा निषेध सांगितला आहे. पूर्व, ईशान्य, उत्तर आणि वायव्य या दिशा त्यातल्या त्यात हलक्या अन् मोकळ्या असणे आवश्यक म्हणून या ठिकाणी जिना घेणे टाळणे आवश्यक आहे. ईशान्य दिशेस जीना घेतल्यास प्रगतीला आणि आरोग्याला त्रासदायक ठरतो, तर आग्नेय दिशेचा जिना हा मुलांचे आरोग्य बिघडवतो. जिन्याचा उतार उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असायला हवा. जिन्याखाली देवघर, शौचालय आणि झोपण्याची जागा इत्यादी करू नये.

(संदर्भ ग्रंथ : विश्वकर्मप्रकाश आणि मानसार)

– गुरुसेवक श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (२३.४.२०२६)

लेखांक २२ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1035769.html