Sayeeda Begum Arrested : भाग्यनगर (तेलंगाणा) येथून अटक केलेली सईदा बेगम इस्लामिक स्टेटच्या ‘खवातीन’ (महिला) संघटनेची प्रमुख !

‘इन्फ्लुएंसर’च्या नावाखाली करत होती जिहादी आतंकवादी कारवाया !

(‘इन्फ्लुएंसर’ म्हणजे प्रभाव निर्माण करणारे)

सईदा बेगम (डावीकडे)

विजयवाडा (अमरावती) – गेल्या महिन्यात आंध्रप्रदेश पोलिसांनी अटक केलेल्या भाग्यनगरच्या ३८ वर्षीय इंस्टाग्राम ‘इन्फ्लुएंसर’ सईदा बेगम हिच्या चौकशीत गंभीर माहिती समोर आली आहे. सईदा हिच्यावर आंतरराज्य आतंकवादी ‘मॉड्यूल’शी (आतंकवादी कृत्यांचे नियोजन आणि आणि त्याची कार्यवाही यासाठी बनवलेली तुकडी) संबंधित असल्याचा आणि ‘खवातीन’ (महिला) नावाची महिलांची स्वतंत्र आतंकवादी शाखा स्थापन करण्याची सिद्धता केल्याचा आरोप आहे. ही कारवाई विजयवाडा येथे पकडलेल्या मोठ्या ‘मॉड्यूल’ अंतर्गत करण्यात आली असून त्याचे अन्वेषण अद्याप चालू आहे. या मोहिमेत आतापर्यंत ६ राज्यांमधून १२ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

ऑनलाईन कट्टरतावाद आणि ४२ महिलांच्या भरतीचा आरोप !

सईदा बेगम ऑनलाईन मंचांच्या माध्यमातून कट्टरतावादी कारवायांमध्ये सहभागी होती. तिने इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांच्याशी संबंधित ऑनलाईन गटांच्या माध्यमातून ४२ महिलांना या जाळ्यामध्ये जोडले होते. या गटांमध्ये अल्-कायदाचा आतंकवादी ओसामा बिन लादेन याचे व्हिडिओ आणि झाकीर नाईक अन् इसरार अहमद यांसारख्या कट्टरपंथी प्रचारकांची प्रक्षोभक भाषणे प्रसारित केली जात होती. सईदा या गटांमध्ये जिहादी साहित्य प्रसारित करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करायची आणि तरुणांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करायची, असे अन्वेषण यंत्रणांचे म्हणणे आहे.

‘खवातीन’ शाखा आणि आक्रमणांचा कट !

पोलिसांच्या माहितीनुसार सईदाला ‘खवातीन’ (महिला) नावाच्या महिला आतंकवादी शाखेचे नेतृत्व करण्यासाठी सिद्ध केले जात होते. या शाखेअंतर्गत महिलांना शस्त्रे चालवणे, ‘स्नायपर रायफल्स’ आणि स्फोटकांचा वापर यांचे प्रशिक्षण देण्याची योजना होती, जेणेकरून देशभरात आतंकवादी आक्रमणे करता येतील. या ‘मॉड्यूल’चे धागेदोरे पाकिस्तानमधील ‘हँडलर्स’शी (आतंकवाद्यांची हाताळणी करणारे) जोडलेले आहेत. सईदा या नेटवर्कचा मुख्य आरोपी रहमतुल्लाह शरीफ याच्यासमवेत काम करत होती, ज्याला २४ मार्च २०२६ या दिवशी विजयवाडामधून अटक करण्यात आली आहे.

सामान्य महिला ते आतंकवादी !

सईदा बेगम चंचलगुडा भागात तिचे आई-वडील आणि ६ वर्षांचा मुलगा यांच्यासह एका छोट्या भाड्याच्या घरात रहात होती. पतीपासून वेगळे झाल्यानंतर ती घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तिने घरात स्वयंपाक करतांनाचे स्वतःचे रील्स बनवले, नंतर स्थानिक शिवणकाम करणारे आणि छोटे व्यावसायिक यांचे विज्ञापन करणारे व्हिडिओ बनवून ती ५०० ते १००० रुपयांपर्यंत कमाई करत होती.

संपादकीय भूमिका

अशांना कारागृहात ठेवून पोसत बसण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !