सर्वसामान्य मनुष्य त्याचे प्रारब्ध भोग भोगण्यासाठी (सुख-दु:ख दोन्हीही) परमेश्वर इच्छेने जन्माला येतो. संत / सत्पुरुष मात्र आपल्या विशिष्ट कार्याकरता अवतरित होत असतात. सर्वसामान्यांना आपल्या गतजन्मीची स्मृती नसते. संतांना ही स्मृती सदैव असते. भगवद्गीतेत अर्जुनाला योगेश्वर श्रीकृष्णाने ‘बहूनिमे व्यतितानि जन्मानि तव चार्जुन’, असे सांगितले आहे, ते उगीच नाही.

संत प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांचा आध्यात्मिक अधिकार
संत प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांच्या चरित्रात एक सुंदर प्रसंग आहे. एका ठिकाणी रुद्राभिषेक चालू होता आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गुरुजींचा त्यातील एक मंत्र चुकत होता. महाराजांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी तेथील मुख्य गुरुजींना सांगितले की, यांचा अमुक अनुवाकातील मंत्र चुकतो आहे. तुम्ही लक्ष ठेवा आणि योग्य उच्चार करायला सांगा. त्या गुरुजींना महाराजांचा अधिकार माहिती होता. ते नम्रतेने म्हणाले, ‘महाराज तुम्ही योग्य तो उच्चार सांगावा.’ तेव्हा महाराज म्हणाले, ‘या जन्मी माझा वेदाधिकार नाही, तेव्हा मी शास्त्रानुसार वेदमंत्र म्हणणार नाही. गतजन्मी माझे वेदाध्ययन झालेले होते. माझी पूर्वजन्मीची स्मृती अत्यंत स्पष्ट आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगितले.’ संत गुलाबराव महाराज अत्यंत अधिकारी सत्पुरुष होते. प्रत्यक्ष माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी त्यांना अनुग्रह दिला होता एवढा अधिकार त्यांचा ! त्यांनीही शास्त्र उल्लंघन न करता वर्णाश्रम धर्माचे पालन काटेकोरपणे करून मंत्रामधील चुकीची सुधारणा करून घेतली.
प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी मदोन्मत्त दोन विद्वान ब्राह्मणांचे केलेले गर्वहरण
दुसरा प्रसंग प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या ‘श्रीगुरुचरित्रा’त आहे. यवनराजाचे दास असलेले मदोन्मत्त २ विद्वान; पण गर्विष्ठ ब्राह्मण जेव्हा वेदांचा गर्व करून गावोगावी जाऊन ब्राह्मणांचा आणि तेथील राजांचा पराभव विद्वत सभेत करून ‘हारीपत्र’ घेऊन माज करू लागले, पालखीत बसून मिरवू लागले, तेव्हा महाराजांनी एका मांग जातीच्या अशिक्षित गरीब नराची पूर्वजन्मीची स्मृती जागृत केली. ७ जन्मांपूर्वी तो ब्राह्मण वर्णात असतांना त्याने केलेले ३ वेदांचे सांगोपांग अध्ययन त्याला आठवून, त्याची पूर्वजन्मीची स्मृती जागृत करून या मदोन्मत्त २ ब्राह्मणांचा शास्त्रसभेत पराभव केला.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पूर्वजन्मीची स्मृती
जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘वेदांचा अर्थ आम्हांसीच ठावा’ ते उगाच नाही. या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या चरित्रात त्यांनी कोणत्याही वेदपाठशाळेत अध्ययन केले असल्याचा उल्लेख जरी नसला, तरी त्यांना पूर्वजन्मीची स्मृती आणि त्यांची अवतार परंपरा ठामपणे ज्ञात होती. त्यांचे अभंग हेही वेदमंत्राच्या गुढार्थाची भाष्येच आहेत, यात संदेह नाही.
दत्तावतारी प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांचा केलेला गौरव
दत्तावतारी प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज हे अत्यंत कठोर निःस्पृह धर्माचरणी होते. ते एकदा नृसिंहवाडी येथील मंदिरात कीर्तन श्रवण करत होते. बुवांनी निरुपणाला संत तुकाराम महाराज यांचा अभंग घेतला होता. अभंग ऐकताच थोरल्या महाराजांची समाधी लागली. काही काळाने जागृत झाल्यावर ते म्हणाले, ‘तुकाराम साधूंची योग्यता फार मोठी आहे. अभंग ऐकताच समाधी लागते.’ एका संतांनी दुसर्या संतांचा केलेला केवढा गौरव आहे हा !
त्यामुळे संतांची चरित्रे वाचतांना, अभ्यास करतांना सर्वसामान्य माणसांच्या नियमाने आपल्या अकलेनुसार, बौद्धिक कुवतीनुसार त्यांची परीक्षा आपण करू नये. ‘अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा’, हे असो किंवा ‘अणु पासुनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे’, हे असो, हे त्रिवार सत्य आहे. या सिद्धि त्यांना प्राप्त होत्या. त्यांनी त्या प्रसिद्धीकरता कधीच वापरल्या नाहीत. संतांचे चरित्र हे स्वतःशी आणि फालतू लोकांशी तुलना करून कधीच अभ्यासू नये.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. (४.३.२०२६)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?