नक्षलवाद संपला ( ? )

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील नक्षलवादी दहशत संपल्याची संसदेत केलेली घोषणा ही संपूर्ण देशाने उत्सवासारखी साजरी करावी इतकी महत्त्वाची आहे. बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्रप्रदेश या राज्यांमधील जवळपास १८० जिल्ह्यांचा समावेश असलेला पशुपती ते तिरुपती हा ‘रेड कॉरिडॉर’ (नक्षलींचा प्रभाव असलेले क्षेत्र), म्हणजे समता आणि सामाजिक न्यायाच्या आकर्षक मुखवट्यांमागे हिंसा अन् अराजक यांचे थैमान घालत भारतीय प्रजासत्ताकाविरुद्ध पुकारलेले युद्ध होते.

१. नक्षलींच्या दृष्टीकोनातून ‘हिंसा’ आवश्यक आणि चांगली गोष्ट

भारताचे तुकडे करण्याचे ध्येय समोर असलेल्या अनेक शक्ती कार्यरत आहेत. या शक्तींमधील सगळ्यात घातक आणि धोकादायक शक्ती म्हणजे नक्षलवाद; कारण या विचारसरणीने हिंसेचे तत्त्वज्ञान बनवले आहे. यांच्या दृष्टीने हिंसा ही नाईलाजाने करायची गोष्ट नाही, तर आवश्यक आणि ‘चांगली’ गोष्ट आहे. यामुळे अमर्याद हिंसा योग्य कि अयोग्य ? हा संभ्रम यांच्या मनात कधीच निर्माण होत नाही. रक्ताचे पाट वहावत असतांना आपण ‘चांगले’ कृत्य करत आहोत, ही खात्रीच त्यांच्या मनात असते.

२. नक्षलवादातील विचारसरणीतील २ प्रवाहांचा संगम

साम्यवाद्यांच्या सगळ्याच आविष्कारांचा हिंसा हा गाभा असला, तरीही नक्षलवादात त्यांच्या विचारसरणीच्या ज्या दोन प्रवाहांचा संगम झाला आहे, त्यांनी हिंसेचे ‘रोमँटिसायझेशन’ (आदर्शवादी दृष्टीकोनातून पहाणे) एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवले आहे.

२ अ. बंदुकधारी नक्षलवादी हे माओवादाचा पहिला प्रवाह ! : यातील पहिला प्रवाह, म्हणजे माओवाद. मार्क्सने ‘बंदुकीच्या नळीतून येणारी क्रांती औद्योगिकरण झालेल्या देशांमध्ये होईल आणि औद्योगिक कामगार तिचे नायक असतील’, असे प्रतिपादन केले होते.

श्री. अभिजित जोग

माओने क्रांतीचे नायकपद शेतकरी आणि शेतकामगारांना दिले, तसेच ‘ही क्रांती ग्रामीण भागात चालू होईल आणि ‘गुरीला वॉरफेअर’ने (गनिमीकावा पद्धतीने) शहरी भागाला वेढून टाकत शेवटी संपूर्ण देशात पसरेल’, असे माओवादाचे प्रतिपादन होते. क्रांतीचे सातत्य आणि त्यातून निर्माण होणारे अराजक अन् हिंसा हा माओवादाचा महत्त्वाचा पैलू आहे. भारतातील माओवाद्यांनी प्रारंभीला तेलंगाणात शेतकरी-शेतकामगारांची क्रांती करण्याचा प्रयत्न केला; पण त्यात फारसे यश मिळत नाही म्हटल्यावर त्यांनी त्यांचे केंद्र जंगलांकडे हलवले आणि वनवासींना क्रांतीचे नायकपद दिले. ढोबळमानाने असे म्हणता येईल की, जंगलात राहून हिंसा आणि अराजक यांचे थैमान घालून भारतीय प्रजासत्ताक उलथून टाकण्याचा प्रयत्न करणारे बंदुकधारी नक्षलवादी हे माओवादाचे पाईक आहेत.

२ आ. शहरी (विद्वान आणि विविध क्षेत्रांत कार्य करणारे) नक्षलवादी हा दुसरा प्रवाह : नक्षलवादातील दुसरा प्रवाह, म्हणजे युरोपातील, विशेषतः फ्रान्समधील ‘रॅडिकल’ (मूलगामी) चिंतकांमध्ये हिंसेला क्रांतीकारक आणि प्रागतिक ठरवून ‘रोमँटिसाईझ’ करण्याची वर्ष १९६० नंतर चालू झालेली चढाओढ. ‘पोस्ट मॉडर्निझम’चा (उत्तर आधुनिकता) एक प्रणेता मिशेल फुको (Michel Foucault) याच्या मते ‘इंटलेक्चुअल्स’चे (विद्वानांचे) उत्तरदायित्व आहे की, त्यांनी स्वतःला ‘ॲकेडेमिक्स’पुरते (शैक्षणिकपुरते) मर्यादित न ठेवता क्रांतीत प्रत्यक्ष सहभाग घेऊन ‘रिव्हॉल्यूशनरी ॲक्टिव्हिस्ट’ (क्रांतीकारी कार्यकर्ता) बनायला हवे. आणखी एक फ्रेंच विद्वान फ्रँझ फॅनन (Franz Fanon) याचे असे म्हणणे होते की, सामाजिक पालट केवळ हिंसेच्या मार्गानेच होतो. भावविरेचन (Catharsis) करणारी, म्हणजेच तीव्र भावनांना मोकळी वाट देणारी हिंसा आवश्यकच आहे.

फ्रँकफर्ट स्कूलचा एक प्रवर्तक हर्बर्ट मार्क्यूज म्हणतो, ‘राज्यसंस्थेकडून होणार्‍या अन्यायापासून मुक्ती मिळवण्यासाठी हिंसा हे योग्य आणि नैतिक हत्यार आहे.’ वर्ष १९६० नंतर या विद्वानांनी विद्यापिठांवर संपूर्ण पगडा बसवलेला असल्यामुळे तेथे त्यांचे  विचार ‘मेनस्ट्रीम’ (मुख्य प्रवाह) झालेले आहेत. या विचारांनी प्रभावित झालेले ‘ॲकॅडेमिया’, ‘मिडिया’ (माध्यमे), ‘ज्युडीशिअरी’ (न्याययंत्रणा), ‘ब्युरोक्रसी’ (नोकरशाही) या क्षेत्रांमधील लोक मनोमन स्वतःला ‘रिव्हॉल्युशनरी ॲक्टिव्हिस्ट’ मानतात आणि ‘क्रांती’मध्ये सक्रीय सहभाग देणे, हे आपले कर्तव्य मानतात. जंगलातील नक्षलवादाला वैचारिक, आर्थिक आणि ‘नॅरेटिव्ह’ (कथानक)चे पाठबळ, तसेच कायदेशीर आणि धोरणात्मक संरक्षण मिळवून देणारे हे ‘अर्बन (शहरी) नक्षल्स’ आहेत. हिंसा हे सामाजिक पालटाचे ‘लेजिटिमेट वेपन’ (कायदेशीर शस्त्र) असल्याची त्यांना खात्री असल्यामुळे अतिरेकी हिंसेचे समर्थन करण्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही किंवा कसलीही टोचणी लागत नाही.

३. भारतात नक्षलवाद वाढण्यामागील कारण

नक्षलवाद हे देशासमोरील सगळ्यात घातक आणि धोकादायक आव्हान ठरते, ते या दुपदरी रचनेमुळे आणि वैचारिक कट्टरतेमुळे ! म्हणूनच हे आव्हान स्वीकारण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवल्याकारणाने भारत सरकार, गृहमंत्री अमित शहा आणि नक्षली हिंसेला उखडण्याचे धाडस दाखवणार्‍या सुरक्षादल यांचे अभिनंदन करावे, तेवढे थोडेच आहे.

संसदेत ही घोषणा करतांना गृहमंत्र्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. गरिबीमुळे नक्षलवाद पसरला नाही, तर नक्षलवादामुळे गरिबी वाढली. हे १०० टक्के सत्य आहे. वर्ष १९६७ पासून नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात त्यांच्या दहशतीमुळे शाळा, रस्ते, दवाखाने, पूल, कारखाने, व्यवसाय, भ्रमणभाष मनोरे (मोबाईल टॉवर्स) यातील काहीच येऊ शकले नाही आणि वनवासींचे जीवन अधिकाधिक कष्टप्रद होत गेले. साम्यवादी विचारसरणीचे हे वैशिष्ट्यच आहे. गरीब, शोषित, वंचित यांच्या स्थितीत सकारात्मक पालट किंवा सुधारणा करणे, हे त्यांना मान्यच नसते.

उलट त्यांची परिस्थिती जितकी हलाखीची आणि कष्टप्रद होईल अन् रसातळाला जाईल, तितके ते क्रांतीसाठी लवकर सिद्ध होतील, असे त्यांचे म्हणणे असते; कारण क्रांती आणि तिच्यासह येणारे अराजक, तसेच हिंसा अन् विध्वंस हेच त्यांचे खरे उद्दिष्ट असते. ज्या शोषितांचे नाव घेऊन ते या गोष्टी करत असतात, तेच या वावटळीत सर्वाधिक भरडले जातात, याच्याशी त्यांना काहीही घेणे-देणे नसते. लोकांच्या आयुष्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीसाठी ‘रिव्हिजनिस्ट’(सुधारणावादी) हा शब्द शिवीसारखा वापरून तिला ‘प्रतिक्रांतीवादी’ ठरवले जाते. याचे एक उदाहरण बघण्यासारखे आहे. रशियात साम्यवादी राजवट येण्याआधी मोठा दुष्काळ पडला. त्या वेळी लोकांच्या हालअपेष्टा न्यून व्हाव्यात, यासाठी सुप्रसिद्ध लेखक टॉलस्टॉय यांनी ‘सूप किचन’सारखे काही उपक्रम चालू केले. त्या वेळी लेनिनने त्यात सहभागी व्हायचे नाकारले. त्याचे म्हणणे होते, ‘लोक जितके भुकेने तडफडतील तितक्या लवकर ते क्रांतीसाठी सिद्ध होतील !’

४. नक्षलवादाची पुढची वैचारिक पातळीवरील लढाई जिंकणे महत्त्वाचे !

एक महत्त्वाचे लक्षात ठेवायला हवे ते, म्हणजे ‘जंगलातील हिंसा थांबवणे, ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची कामगिरी असली, तरी याचा अर्थ ‘नक्षलवाद संपला’, असा लावणे धोक्याचे ठरेल’; कारण विद्यापिठे, सांस्कृतिक क्षेत्र, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमे, नोकरशाही, न्यायव्यवस्था यांतील ‘अर्बन नक्षल्स’ विविध आकर्षक मुखवट्यांच्या मागे जोपर्यंत कार्यरत आहेत, तोपर्यंत ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने हिंसा-अराजक-विध्वंस हे चक्र फिरत रहावे, यासाठी प्रयत्न करणार हे नक्की. हे चक्र कायमचे थांबवायचे, तर ही लढाई वैचारिक पातळीवर लढून ती जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.

संपादकीय भूमिका

ग्रामीण नक्षलवाद संपला, तरी ‘अर्बन नक्षल्स’च्या माध्यमातून कार्यरत असलेला साम्यवाद संपवणे, हेच मुख्य उद्दिष्ट हवे !