Mangalprabhat Lodha On Jainism : जैन समाज हिंदु असून त्याला मिळालेला ‘अल्पसंख्यांक’ दर्जा फेकून द्यायला हवा !

  • मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे परखड विधान

  • गुलामगिरीची मानसिकता झुगारून मूळ प्रवाहात येण्याचे जैन समाजाला आवाहन !

मुंबई – जैन धर्म हा मूळ हिंदु संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. मोगल आणि इंग्रज यांच्यानंतर काँग्रेसने ‘फोडा आणि राज्य करा’ या कुटील नीतीने हिंदु समाजाचे तुकडे केले. आता जैन समाजाने ही ‘अल्पसंख्यांक’ नावाची गुलामगिरीची मानसिकता आणि दर्जा झुगारून मूळ प्रवाहात येण्याची वेळ आली आहे, अशा परखड शब्दांत राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी हिंदु अस्मितेचा हुंकार भरला. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ते म्हणाले,

मंगलप्रभात लोढा

१. एकेकाळी दक्षिण भारतात २२ ते २३ टक्क्यांच्या आसपास असणारा जैन समाज आज केवळ ३ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. ही केवळ आकडेवारी नसून एका मोठ्या राजकीय षड्यंत्राचा हा परिणाम आहे.

२. मुसलमान समाजात अनेक जाती असूनही काँग्रेसने त्यांना संघटित ठेवले; मात्र हिंदु समाजाला जाती-धर्माच्या कप्प्यात बंदिस्त करून दुर्बल केले.

३. जर समाजात व्यापक सहमती निर्माण झाली, तर जैन समाजाला ‘अल्पसंख्यांक’ दर्जातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येईल. श्रीरामजन्मभूमी आंदोलनाप्रमाणेच आता पुन्हा एकदा ‘आम्ही हिंदु’ ही भावना प्रबळ करण्याची ऐतिहासिक आवश्यकता आहे.

४. ज्या जैन समाजाने जगाला अहिंसा आणि मानवता यांचा संदेश दिला, त्यांना हिंदु धर्मापासून वेगळे करणे हा सांस्कृतिक द्रोह आहे.

५. राजकीय अपलाभासाठी लादलेला ‘अल्पसंख्यांक’ हा शिक्का आता पुसून टाकण्याची वेळ आली आहे. जैन धर्मियांची पूजापद्धत वेगळी असू शकते; पण सांस्कृतिक मुळे हिंदु धर्मातच रुजलेली आहेत.