Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak : कोलू फिरवण्याच्या प्रात्यक्षिकांद्वारे अंदमानात क्रांतीकारकांनी भोगलेल्या अत्याचारांची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चा राष्ट्रप्रेम जागृतीचा अभिनव उपक्रम

कोलू फिरवतांना हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे आणि उपस्थित अन्य मान्यवर

मुंबई – भारताच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांसह अनेक क्रांतीकारकांना ब्रिटिशांनी अंदमानाच्या कारागृहामध्ये ठेवून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. या अत्याचारांचाच एक भाग म्हणजे बैल जुंपण्याच्या कोलूला क्रांतीकारकांना जुंपून त्यांना नियमित ३० पौंड म्हणजे साधारणपणे १४-१५ किलो तेल काढण्यास सांगितले जायचे. क्रांतीकारकांनी भोगलेल्या या अनन्वित अत्याचारांची जाणीव आताच्या पिढीमध्ये निर्माण व्हावी, यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’च्या वतीने ४ आणि ५ एप्रिल या दिवशी कोलू फिरवण्याचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते. ४ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या उपक्रमाला प्रारंभ झाला.

या वेळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या (सौ.) सिद्ध विद्या, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे, स्मारकाचे कार्यवाह श्री. राजेंद्र वराडकर, शिल्पकार श्री. नीलेश ढेरे यांसह अन्य राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते. या वेळी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी पाय आणि हात यांमध्ये बेडी घालून कोलू फिरवून पाहिला. विशेष म्हणजे लहानांपासून अनेक वृद्ध व्यक्तींनीही याचे प्रात्यक्षिक करून पाहिले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही उपस्थित राहून कोलू फिरवून पाहिला आणि ‘वन्दे मातरम्’, ‘भारतमाता की जय’ या घोषणा दिल्या.

अशा प्रकारे राष्ट्रप्रेमी नागरिकांनी घेतला कोलू फिरवण्याचा अनुभव !

अंदमानात असलेल्या कोलूप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये कोलू सिद्ध करण्यात आला आहे. या कोलूमध्ये सुक्या नारळाच्या वाट्या टाकून तो फिरवण्यास सांगण्यात आले. कोलू फिरवतांना क्रांतीकारकांच्या हाता-पायांमध्ये बेड्या घालण्यात आल्या, तशाच बेड्या या वेळी प्रात्यक्षिक करणार्‍यांच्या हाता-पायांमध्ये घालण्यात आल्या होत्या. नोंदणी करून आलेल्या राष्ट्रप्रेमींना या वेळी प्रमाणपत्र देण्यात आले.

हे ही वाचा → Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak : दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात कोलू फिरवण्याची संधी !

सत्तेसाठी क्रांतीकारकांचा त्याग मुंगीचा, तर गांधींचा त्याग हिमालयाप्रमाणे दाखवला गेला ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

गांधी यांचे चरखा फिरवणे आणि क्रांतीकारकांचे कोलू फिरवणे लोकांना सारखे वाटते. अंदमानामध्ये क्रांतीकारकांना ८ घंटे कोलू फिरवावा लागत होता. यामुळे अनेकांनी आत्महत्या केली. काही जणांना वेड लागले. क्रांतीकारकांचे मनोबल खच्चीकरण व्हावे आणि हे पाहून कुणीही क्रांतीकार्यात भाग घेऊ नये, यासाठी त्यांना अमानुष वागणूक दिली जात होती. क्रांतीकारकांनी भोगलेल्या यातनांचा अनुभव घेऊन ‘स्वातंत्र्य टिकवण्याचे दायित्व आपले आहे’, याची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी हे प्रात्यक्षिक आम्ही आयोजित केले आहे. जवाहरलाल नेहरू यांना कारागृहात पंचतारांकित हॉटेलप्रमाणे वागणूक होती. त्यांना आंबे, मध, सिगारेट मिळत होती. त्यांच्यासाठी युरोपातून स्वयंपाकी आपण्यात आला होता. त्यांना टेनिस खेळण्याची व्यवस्था होती. याउलट अंदमानमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगतांना क्रांतीकारकांना करपलेल्या पोळ्या आणि बेचव भाजी दिली जात होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर क्रांतीकारकांचा हा त्याग जनतेच्या लक्षात आल्यास सत्ता मिळणार नाही, म्हणून सत्तेसाठी क्रांतीकारकांचा त्याग मुंगीचा, तर गांधींचा त्याग हिमालयाप्रमाणे दाखवला गेला. सत्तेसाठी क्रांतीकारकांचा त्याग दडपला गेला.

‘नॅरेटिव्ह’द्वारे क्रांतीकार्याला दुय्यम स्थान देण्यात आले ! – अधिवक्त्या सिद्ध विद्या

मी जेव्हा येथे कोलू चालवला, तेव्हा येथे पंखा चालू होता. भीतीचे वातावरण नव्हते; परंतु क्रांतीकारक जेव्हा कोलू चालवत होते, तेव्हा त्यांच्या पायात बेड्या घालण्यात आल्या होत्या. कोलूमध्ये टाकण्यात आलेले नारळ क्रांतीकारकांना हाताने सोलावे लागत. यातून क्रांतीकारकांनी राष्ट्रासाठी किती त्याग केला, याचा अनुभव आला. सध्याच्या काळात मात्र नॅरेटिव्ह (कथानक) निर्माण करून त्यांच्या क्रांतीकार्याला दुय्यम स्थान देण्यात आले.