‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी काळानुसार साधना करण्यासाठी नियमित प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार आलेल्या नामजपासह १५.२.२०२६ पासून श्रीरामाचा नामजप करण्यास आणि ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ अन् ‘हनुमानचालिसा’ यांचे पठण करायला सांगितले आहे. त्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्रीरामाचा नामजप करतांना
१ अ. मी दिवसभर श्रीरामाचा नामजप करण्याचा प्रयत्न केल्यावर माझ्या मनातील अनावश्यक विचार न्यून झाले.
१ आ. चूक स्वीकारता न आल्याने मनाचा होणारा संघर्ष थांबून मन शांत होणे : फेब्रुवारी २०२६ मध्ये एका प्रसंगात मला माझी एक चूक सांगण्यात आली. तेव्हा मला ती चूक स्वीकारता येत नव्हती. त्यामुळे माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष होत होता. त्या वेळी मी श्रीरामाचा नामजप करू लागले. तेव्हा श्रीरामाने मला त्याच्या जीवनातील पुढील प्रसंगाचे स्मरण करून दिले – ‘श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या दिवशी त्याला सर्व राजयोग सोडण्यास सांगून क्षणात वनवास देण्यात आला. तेव्हा तो कुणालाही एकही प्रश्न न विचारता शांतचित्ताने वनात निघून गेला.’
त्यानंतर ‘माझ्याकडून एक चूक झाली आहे, तरी ती मला का स्वीकारता येत नाही ?’, असा विचार माझ्या मनात येऊन मनाचा संघर्ष त्वरित थांबला. त्यानंतर माझे मन शांत झाले.
१ आ १. ‘रामराज्यातील प्रजेसारखे सात्त्विक होण्यासाठी गुरुदेवांनी साधकांना स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया शिकवली आहे’, या विचाराने बहिर्मुखता न्यून होणे : त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार आले, ‘रामराज्याचे हे वैशिष्ट्य होते की, केवळ प्रभु श्रीरामच सात्त्विक होता, असे नाही, तर त्याची प्रजासुद्धा सात्त्विक होती. आपल्याला रामराज्यात रहायचे असेल, तर आपल्यालाही सात्त्विक व्हावेच लागेल. त्यासाठी श्रीरामरूपी गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) आपल्याला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवली आहे. ती राबवण्यासाठी साहाय्य करायला साधकही दिले आहेत.’ या विचारांमुळे माझ्या मनाची बहिर्मुखता अंशतः न्यून झाली.
२. श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करतांना श्रीरामाप्रतीचा शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव अनुभवणे
श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करतांना अनेक वेळा श्रीरामाचे नाव येते. ते पठण करतांना मला शरणागतभाव अनुभवता येतो. ‘श्रीराम माझ्या शरिराच्या सर्व अवयवांचे रक्षण करो’, अशा अर्थाच्या श्लोकांमुळे मला श्रीरामाप्रती अत्यंत कृतज्ञता वाटते. त्या वेळी माझे मन ‘राममय’ होऊन त्याच्या नामामुळे मी आनंदाने डोलू लागते.
३. हनुमानचालिसाचे पठण करतांना
३ अ. ‘हनुमानचालिसाच्या पठणामुळे स्वतःमध्ये दास्यभावाचे स्फुरण होते’, असे मला जाणवले.
३ आ. ‘गुरुदेवांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न केल्यास त्यांना पुष्कळ आनंद होईल’, असे वाटून भाव जागृत होणे
लाय सजीवन लखन जियाये । श्रीरघुबीर हरषि उर लाये ।।
रघुपति कीन्ही बहुत बडाई । तुम मम प्रिय भरतहि सम भाई ।।
सहस बदन तुम्हरो जस गावैं । अस कहि श्रीपति कंठ लगावैं ।। – हनुमानचालिसा
अर्थ : तू संजीवनी वनस्पती आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवलेस. त्यामुळे संपूर्ण रघुवंशामध्ये श्रेष्ठ असलेल्या श्रीरामाने हर्षित होऊन तुला प्रेमाने आलिंगन दिले. श्रीरामाने तुझी पुष्कळ प्रशंसा करून ‘तू मला तेवढाच प्रिय आहेस, जेवढा माझा भाऊ भरत मला प्रिय आहे’, असे सांगितले. ‘तुझे यश सहस्र मुखांनी वर्णन करण्यासारखे आहे’, असे म्हणून श्रीरामाने तुला हृदयाशी घेतले.
हनुमानाने त्याच्या स्वामींना (श्रीरामाला) आवडेल, असे कार्य केल्यावर श्रीरामाने त्याची प्रशंसा करत त्याला ‘तू मला भरतासारखाच प्रिय आहेस’, असे म्हणत हृदयाशी धरले. ‘जर मीसुद्धा गुरुदेवांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न करू शकले, तर त्यांनाही पुष्कळ आनंद होईल’, या विचाराने हनुमानचालिसातील वरील ओळी म्हणतांना माझा भाव जागृत होतो.
३ इ. ‘हनुमानाचे स्मरण करताच त्वरित सर्व संकटे नष्ट होतात’, या विचाराने आत्मबळ वाढणे
सब सुख लहै तुम्हारी सरना । तुम रच्छक काहू को डर ना ।।
आपन तेज सम्हारो आपै । तीनों लोक हाँक ते काँपै ।।
भूत पिसाच निकट नहिं आवै । महाबीर जब नाम सुनावै ।।
नासै रोग हरै सब पीरा । जपत निरंतर हनुमत बीरा ।।
संकट तें हनुमान छुडावै । मन क्रम बचन ध्यान जो लावै ।। – हनुमानचालिसा
अर्थ : जो तुला शरण येतो, त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. तू रक्षणकर्ता असतांना कशाचीही भीती का बाळगायची ?
तुझे प्रचंड तेज केवळ तूच आवरू शकतोस. तुझ्या केवळ हुंकारानेच तिन्ही लोक (स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ) कंप पावतात. हे महावीर हनुमंता, जेथे तुझा नामजप केला जातो, त्या ठिकाणाच्या जवळपास भूत-पिशाच येत नाहीत.
हे हनुमंता, तुझा निरंतर जप केल्याने रोगाचा (भवरोगाचा) नाश होतो आणि सर्व पीडा दूर होतात. हे हनुमंता, जे मन, कर्म आणि वाणी यांच्याद्वारे तुझेच ध्यान करतात, त्यांना तू सर्व संकटांतून सोडवतोस.
या ओळी म्हणतांना ‘महाबलशाली हनुमान आपल्यासह असतांना साधकाने कोणत्याही संकटाला कशाला घाबरायचे ? संकटमोचन हनुमानाचे स्मरण करताच सर्व संकटे त्वरित नष्ट होतात’, या विचाराने आत्मबळ वाढते’, असे मला जाणवले.
‘हे श्रीरामरूपी गुरुदेवा, साधकांनी साधनेचे हे प्रयत्न केल्यास आपणच आम्हा साधकांना ‘राममय’ करणार आहात. या अनुभूतींसाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘ज्याप्रमाणे त्रेतायुगात आपण आपल्या चरणस्पर्शाने पाषाणरूपी अहल्येचा उद्धार केला, त्याप्रमाणे या क्षुद्र जिवाला निर्मळ बनवून त्याचाही उद्धार करून आपल्या चरणसेवेत पूर्णपणे समर्पित करून घ्यावे’, हीच आपल्या चरणी शरणागत होऊन प्रार्थना करते.’
– सौ. सानिका संजय सिंह, वाराणसी आश्रम, उत्तरप्रदेश. (४.३.२०२६)


मंदिरातील पुजारी मंदिराचे आध्यात्मिक वैभव वृद्धींगत करणारे असावेत !
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !