आज चैत्र पौर्णिमा या दिवशी असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने…
एकदा आलेले नैराश्य झटकून हनुमान पुन्हा सीतामातेच्या शोधासाठी सज्ज झाले. अगदी चार अंगुळेही जागा शिल्लक रहाणार नाही इतका शोध त्यांनी घेतला, तरीही सीतामाई काही मिळेना. आता काय करायचे ? गंभीर पेच आहे.
इतके शोधूनही भगवती सीता सापडत नसेल, तर ती मृत असण्याचा संभव अधिक. हा निरोप मी रामरायांना दिला तर ? हे ऐकून ते तर दुःखाने प्राण सोडतील. त्यांनी प्राण सोडल्याचे दुःख पाहून मागोमाग त्यांची तिन्ही भावंडे, माता कौसल्या आणि सुमित्राही दुःखाने प्राणत्याग करतील. हा सगळा अनर्थ पाहून सुग्रीव दुःखी होऊन प्राण त्यागेल आणि त्या पाठोपाठ तारा, रुमा आणि अंगदही… हनुमंताचे विचारचक्र वेगाने चालू होते.

१. सीतामाई शोधून न मिळाल्यावर ‘प्रायोपवेशना’चा विचार आलेल्या हनुमानाची कुशाग्रता जागृत होऊन तो कृतीशील होणे
हा, एका गोष्टीने हा सारा अनर्थ टळेल. मी जर माघारी फिरलोच नाही तर… ! मी इथेच लंकेत थांबून वानप्रस्थ आणि मग संन्यास स्वीकारतो किंवा सरळ चितेत स्वतःला झोकून देतो अथवा ‘प्रायोपवेशना’ला (मृत्यू येईपर्यंत उपोषण) बसतो. मला गिधाडे आणि कावळे खाऊन टाकतील किंवा मग सरळ या अथांग समुद्रातच स्वतःला झोकून देतो. नकारात्मक विचारांचे काहूर मनात दाटलेले ! पण इतक्यात स्थितप्रज्ञ हनुमंताची कुशाग्रता जागृत झाली. तो म्हणतो,
‘विनाशे बहवो दोषा जीवन् भद्राणि पश्यति ॥
तस्मात्प्राणान् धरिष्यामि ध्रुवो जीवितसङ्गमः । – वाल्मीकि रामायण, ५.१३.४७
आत्महत्या हे तर फारच मोठे पाप आहे. जिवंत राहिलो, तरच काहीतरी प्रयत्न करून सुखद समाचार मिळवता येईल ना ? म्हणून आत्महत्येचा विचार सोडून देऊन जिवंत रहाणेच योग्य. किमान पुढे काहीतरी आनंददायी वृत्त मिळण्याची तरी शक्यता राहील !
असा विचार करून पुढच्याच क्षणी हनुमंत विचार करू लागला, ‘या रावणालाच सरळ बकोट्याला धरून घेऊन जातो आणि रामरायाच्या चरणी आदळतो किंवा त्याला इथेच सरळ ठार करून टाकतो ! अथवा मग असे करतो की, आणखी जरा प्रयत्न करून भगवती सीतेचा शोध घेतो आणि जोवर त्या सापडत नाहीत, तोवर पुन: पुन्हा ही संपूर्ण लंका पिंजून काढतो.’
यावत्सीतां हि पश्यामि रामपत्नीं यशस्विनीम् ॥
तावदेतां पुरीं लङ्कां विचिनोमि पुनः पुनः । – वाल्मीकि रामायण, ५.१३.५२
असे म्हणून हनुमंत अशोकवाटीकेत शिरला. पुढे काय झाले, हा इतिहास आपल्याला ठाऊक आहेच !

२. बिकट स्थिती असतांना हृदयातून हनुमानाला हाक मारा !
जीवनात कधी हरला आणि आत्महत्येचा विचार मनात आला की, हा प्रसंग दृष्टी खालून घालायचा. एकदा नाही, तर पुन्हा पुन्हा वाचायचा. डोळे बंद करून हनुमंताला आठवायचे आणि पुन्हा प्रयत्नांना लागायचे ! लिहित आहे तितके सोपे नाही, अगदी मान्य; पण अगदीच अशक्यही नाही ना ? अगदी हृदयातून हनुमानाला हाक मारा. तुमच्या मार्गाला मोकळे करायला, तो उभा राहील गदा घेऊन भक्कम !
कुणास ठाऊक तुम्हीही आत्महत्येचा विचार करत असतांना कदाचित असेच तुमच्या अशोकवाटीकेच्या बाहेरच असाल आणि केवळ आणखी एक प्रयत्नच पुरेसा असेल तर ?
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?