घटनेची बातमी होते तेव्हा…

सध्या महाराष्ट्रात २ प्रकरणे गाजत आहेत. दोन्ही बलात्कार आणि लैंगिक अत्याचार या प्रकारात मोडणारी आहेत. त्या घटना खर्‍या आहेत, असेच गृहीत धरून जरी बातम्या केल्या, तरी त्याचे मथळे आणि बातम्या कशा पद्धतीने ठसवल्या जातात, यावरून त्यांचा हेतू ठरतो. ‘वादग्रस्त विधान’ हे लिहिण्यासाठी कुणीतरी विधान करणे पुरेसे असते, ते वादग्रस्त असलेच पाहिजे, असे नाही. विशेषणे कोणती द्यायची ?  मथळ्यांची शब्दयोजना कशी असावी ? यासह बातमी आधीच ठरलेली असते, त्यात बसणार्‍या घटनेचा शोध केवळ घेतला जातो.

१. ‘अंकशास्त्रज्ञ’, ‘ज्योतिषी’, असे न म्हणता ‘बाबा’ असे का म्हटले जाते ?

अशोक खरात हा स्वत:ला अंकशास्त्रज्ञ, ज्योतिषी म्हणवून घेत होता आणि तांत्रिक विधी करत होता, हे उघड आहे. तो स्वत:ला कुठेही ‘बाबा’ म्हणवून घेत नव्हता. त्याचा पेहराव किंवा काम करण्याची पद्धत ‘बाबा’सारखी नव्हती. सामान्यत: ज्यांना ‘बाबा’ म्हटले जाते, तसा तो अजिबातच नव्हता. साधारणपणे भगवे वस्त्र, प्रवचन सांगणे, संप्रदाय असणे, भक्तांना प्रवचने देणे वगैरे असल्या गोष्टी हे ‘बाबा’ लोक करतात. तसे कोणतेही कृत्य न करणारा अशोक खरात वास्तविक ज्योतिषी, हात पाहून भविष्य सांगणारा, तंत्रमार्गी विधी करणारा आहे. त्याला ‘बाबा’, ‘अघोरी’ ही बिरुदावली लावणे चुकीचे आहे. अनेक पंथांमध्ये तंत्रमार्गी लोक असतात; पण सर्वांनाच अघोरी म्हटले जात नाही. अघोरी हे प्रामुख्याने कापालिक परंपरेतील असतात. असे असूनही त्याला ‘अंकशास्त्रज्ञ’, ‘ज्योतिषी’, असे न म्हणता ‘बाबा’ असे का म्हटले जाते ?

२. ‘सामाजिक कार्यकर्ता’ वा ‘संस्थापक’ असे न म्हणता बातम्यांत ‘धर्मगुरु’, ‘आध्यात्मिक गुरु’ असे का संबोधण्यात येते ?

ऋषिकेश वैद्य या व्यक्तीस ‘धर्मगुरु’, ‘आध्यात्मिक गुरु’ अशा बिरुदावल्या लावल्या गेल्या. यापैकी एकही पदवी त्याने स्वत:च स्वत:ला लावलेली नाही. ‘ज्ञानेश्वरी’वर, अध्यात्मावर बोलले, म्हणजे फार तर तो प्रवचनकार, कथावाचक, अभ्यासक असू शकतो; पण ‘धर्मगुरु’, ‘आध्यात्मिक गुरु’ नसतो. त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर (ओळखीवर) ते स्वतःचे वर्णन ‘सामाजिक कार्यकर्ता’ किंवा ‘संस्थापक – आमची वसई’ असे करतात. तरीही ‘सामाजिक कार्यकर्ता’ किंवा ‘संस्थापक’ असे कुठेही न म्हणता बातम्यांत त्यांना ‘धर्मगुरु’, ‘आध्यात्मिक गुरु’ असे का संबोधण्यात येते ?

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

३. बातमीचे मथळे वाचकांना आकर्षित करण्यासाठी; पण सामाजिक हानी मोठी !

अनेकदा बातम्यांच्या मथळ्यांमध्ये केलेल्या आरोपांचे थेट विधानात रूपांतर केले जाते.

अ. ‘मी महादेवाचा अवतार’, ‘तू माझी पार्वती’, ‘नाशिक पाठोपाठ मुंबईतही भोंदूबाबाचा अघोरी खेळ’

आ. ‘मी महादेवाचा अवतार आहे’, असे सांगून महिलेवर बलात्कार’; ‘वसईच्या स्वयंघोषित धर्मगुरु ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा’

इ. ‘स्वत:ला ‘महादेव’ म्हणत अत्याचार’, ‘ऋषिकेश वैद्य अखेर सापडला’

आरोपाची थेट विधाने करणारे हे काही बातम्यांचे मथळे. हे अशा प्रकारचे मथळे वाचकांना आकर्षित करण्यासाठी आणि ‘व्ह्यूज’ (मथळे बघणे) मिळवण्यासाठी केले जात असले, तरी त्यामुळे होणारी हानी मोठी आहे. अनेकदा केवळ मथळे आणि फार तर पहिला परिच्छेद वाचून लोक पुढील बातमीकडे वळतात. यात जे ठसवले जाते, तेच ठसते. ‘खरातच्या घरात ‘५ रिकाम्या पुंगळ्या’ सापडल्या’, त्यावर ‘५ नरबळींचा संशय’ असा मथळा येतो, तेव्हा पोलिसांना प्राथमिक अन्वेषणात सापडलेल्या वस्तूंवरून थेट निष्कर्ष काढलेला असतो. अनेकदा असे निष्कर्ष आधीच सिद्ध असतात, रिकाम्या पुंगळ्या सापडणे बाकी असते. गोव्यातील उसगावच्या पूजा अल्हाट प्रकरणातही ‘अपत्यप्राप्तीसाठी नरबळी’ असे थेट मथळे देण्यात आले होते. ‘अंधश्रद्धा’, ‘नरबळी’ ठसवायचे होते आणि त्यासाठी लहान मुलीचा पुरलेला मृतदेह पुरेसा होता !

४. गुरु आणि अध्यात्म यांच्या परंपरेची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न !

घटनेची बातमी करतांना ती खळबळजनक बनवण्याच्या नादात आपण जे करत आहोत, त्याचे परिणाम काय होतील, याचे भान वृत्तपत्रांना उरलेले नाही. आपलेच गुरु आणि अध्यात्म यांच्या परंपरेची आपण नकारात्मक प्रतिमा उभी करत आहोत, हे लक्षातच येत नाही. कदाचित् तेच करण्यासाठी तर मुद्दाम हे केले जात नसावे ना ?

घटनेची बातमी होतांना ती घटनेशी प्रामाणिक असावी, अशी अपेक्षा असते; पण बातमी करतांना त्यात हेतू ‘अजेंडा’ (कार्यसूची) आणि विमर्श (नॅरेटिव्ह) मिसळले की, घटना अन् बातमी यांचा संबंध तुटतो. घडलेले वेगळेच असते आणि सांगितले वेगळेच जाते !

– श्री. प्रसन्न बर्वे, पणजी, गोवा. (२९.३.२०२६)

(साभार : ‘प्रसन्नवदने ब्लॉग’वरून)