US-Iran War : अमेरिकी सैन्याला हाकलून देण्याची हीच योग्य वेळ ! – इराण

इराणचे आखाती देशांना आवाहन

नवी देहली – इराण सौदी अरेबियाचा आदर करतो आणि त्याला आपला भाऊ मानतो. आमची कारवाई अशा शत्रू आक्रमणकर्त्यांच्या विरोधात आहे, जे अरब किंवा इराणी लोकांचा आदर करत नाहीत आणि कोणतीही सुरक्षा देऊ शकत नाहीत. ‘इराणने अमेरिका आणि इस्रायल यांच्या वायूदलांचे काय केले ?’, ते त्यांनी पहावे. त्यांच्या देशातून अमेरिकी सैन्याला हाकलून देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी सर्वांनी एकवटले पाहिजे आणि आपल्या शत्रूला आपल्या प्रदेशातून हाकलून लावले पाहिजे, असे आवाहन इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची यांनी ‘एक्स’वर अरब देशांना केले आहे.

हॉर्मुज सामुद्रधुनीतून जाणार्‍या नौकांकडून टोल वसूल करण्यास इराणच्या संसदेची संमती

इराणने हॉर्मुज सामुद्रधुनीतून जाणार्‍या नौकांकडून टोल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इस्रायल आणि अमेरिका यांच्या नौकांना या मार्गातून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासह इराणविरोधी निर्बंधांमध्ये सहभागी असलेल्या देशांच्या नौकांवरही बंदी घालण्यात आली आहे. इराणच्या संसदेतील सुरक्षा समितीने या संदर्भात ‘हॉर्मुझ व्यवस्थापन योजना’ संमत केली. हॉर्मुज सामुद्रधुनी ही जगातील अत्यंत व्यस्त समुद्री मार्गांपैकी एक असल्याने या टोलमधून इराणला मोठे उत्पन्न मिळू शकते. या सामुद्रधुनीसाठी कायदेशीर चौकट उभारण्यासाठी ओमानसमवेत  सहकार्याची रूपरेखा निश्चित करण्यात आली आहे.

या निर्णयाचा जागतिक स्तरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल या मार्गातून वाहून नेले जाते. ही सामुद्रधुनी इराण आणि ओमान यांच्या मध्ये स्थित आहे.

हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली, तरीही अमेरिकेला फरक पडणार नाही !

‘हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली, तरीही अमेरिकेला काही फरक पडणार नाही. ती इराणसमवेतचे युद्ध संपवणार’, असे वृत्त अमेरिकेतील दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिले आहे. या वृत्तानुसार प्रशासनाचा असा विश्वास आहे की, हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याचा अमेरिकेने प्रयत्न केल्यास युद्ध संपण्याऐवजी लांबण्याची शक्यता आहे. अमेरिका युद्ध संपवण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. ‘हॉर्मुझ बंद असल्यामुळे ज्या देशांची हानी होत आहे, ते देश ती उघडण्यासाठी विचार करतील’, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

अमेरिकेचे इराणमधील शस्त्रसाठ्यावर मोठे आक्रमण

अमेरिकेने इराणमधील इस्फहान शहरात एका मोठ्या शस्त्रास्त्र साठ्यावर आक्रमण केले. यासाठी २ सहस्र पाऊंड वजनाच्या बंकर-बस्टर बाँबचा वापर करण्यात आला. या बाँबचा वापर भूमीगत ठिकाणे नष्ट करण्यासाठी केला जातो. आक्रमणानंतर तेथील साठ्यामध्ये स्फोट झाल्याने अनेक धमाके झाले आणि परिसरात आगीचे मोठे लोळ उठले.

दुबईजवळ कुवेतच्या तेलवाहू नौकेवर इराणचे आक्रमण : समुद्रात तेल गळतीची शक्यता

दुबई बंदराच्या क्षेत्रात उभ्या असलेल्या कुवेतच्या ‘अल-साल्मी’ नावाच्या एका महाकाय तेलवाहू नौकेवर इराणने आक्रमण केले. यात नौकेच्या मुख्य भागाची हानी झाली असून मोठी आग लागली होती. दुबई प्रशासनाला ही आग विझवण्यात यश आले असले, तरी मोठ्या प्रमाणात तेल गळती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही नौका कुवेतचा ध्वज लावून प्रवास करत होती आणि चीनला तेल पोचवणार होती.

इराणच्या समर्थनार्थ तैनात होण्यास रशियातील चेचेन योद्धे सिद्ध

इराणच्या ‘प्रेस टीव्ही’ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार चेचेन सैन्य तुकड्यांनी इराणच्या समर्थनार्थ तैनात होण्यास सिद्ध असल्याचे म्हटले आहे. हे योद्धे रशियाच्या चेचन्या प्रदेशाचे प्रमुख रमजान कादिरोव्ह यांच्याशी एकनिष्ठ आहेत आणि आवश्यकता भासल्यास इराणी सैन्याला पाठिंबा देतील. अमेरिका इराणमध्ये भूमीवरून आक्रमण करण्याच्या दाव्यावरून चेचेन योद्ध्यांचे हे वक्तव्य केले आहे.

अमेरिकेचे विमानवाहू युद्धनौका ‘यु.एस्.एस्. त्रिपोली’ हिंद महासागरात तैनात

इराणसमवेतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तिची विमानवाहू युद्धनौका यु.एस्.एस.् त्रिपोली हिंद महासागरात तैनात कली आहे. या नौकेवर अनुमाने १ सहस्र ८०० नौदल सैनिक आहेत.

ट्रम्प आणि नेतान्याहू यांनी इराणला ओळखण्यात चूक केली ! – माजी ‘रॉ’ प्रमुख विक्रम सूद

विक्रम सूद

भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’ (‘रिसर्च अँड ॲनिलिसेस विंग’चे) माजी प्रमुख विक्रम सूद यांनी अमेरिका आणि इस्रायल यांच्या युद्धाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, डॉनल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणला ओळखण्यात चूक केली आहे. या संघर्षात इराण जोरदारपणे लढत आहे आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर देत आहे. काही विश्लेषकांच्या मते, इराणला दुर्बल करणे आणि या प्रदेशात इस्रायलचे वर्चस्व वाढवणे, ही एक मोठी रणनीती असू शकते.

युद्धाचा खर्च भागवण्यासाठी आरोग्यसेवेत कपात होऊ शकते ! – अमेरिकी खासदार

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार ॲडम शिफ यांनी चेतावणी दिली आहे की, इराणविरुद्धच्या युद्धासाठी मागण्यात येत असलेल्या २०० अब्ज डॉलर्सच्या (१९ लाख कोटी रुपयांच्या) अतिरिक्त निधीचा सार्वजनिक आरोग्यसेवेवर परिणाम होऊ शकतो. या युद्धाचा आणि स्थलांतरितांवरील कारवाईचा खर्च भागवण्यासाठी रिपब्लिकन नेते सरकारी आरोग्यसेवा खर्चात कपात करण्याचा विचार करत आहेत. हे एक असे युद्ध आहे जे तुम्हाला नको आहे आणि त्याची किंमत तुमच्या आरोग्यसेवेतील कपातीच्या रूपात चुकवावी लागेल.

भारत इराण युद्ध थांबवू शकतो, तर पाकिस्तान स्वतःच आतंकवादी देश ! – इस्रायल

इराण-अमेरिका युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानला कोणतेही ठोस यश मिळालेले नाही. इस्लामाबाद येथे ४ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक घेण्यात आली होती; मात्र त्यातून कोणताही तोडगा निघू शकला नाही. तसेच पाकच्या माध्यमांतून इराणला दिलेली १५ सूत्रेही इराणने फेटाळली. या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विशेष दूत फ्लूर हसन-नहूम यांनी ‘आखातात चालू असलेला संघर्ष थांबवण्यास पाकिस्तानपेक्षा भारत अधिक सक्षम मध्यस्थ ठरू शकतो. पाकिस्तान स्वतःच एका आतंकवादी देश असल्याने तो समस्या सोडवू शकणार नाही. भारताचे इस्रायलशी निकट संबंध आहेत आणि इतर पक्षांशीही संतुलित संबंध आहेत. त्यामुळे तो अधिक प्रभावी मध्यस्थ ठरू शकतो’, असे म्हटले आहे.