
तमिळनाडूमध्ये नव्याने स्थापन झालेल्या तमिळगा वेत्तरी कळघम् (टीव्हीके – तमिळनाडू विजय पक्ष) पक्षाने सर्वच्या सर्व म्हणजे २३४ जागांवर त्याचे उमेदवार घोषित केले आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा आणि अभिनेते जोसेफ विजय यांनी एका कार्यक्रमात या उमेदवारांची घोषणा केली. त्या वेळी ३० वर्षे त्यांच्या वाहनाचे चालक असणारे राजेंद्रन् यांचा मुलगा सबरीनाथन् यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्या वेळी सबरीनाथन् भावूक झाले आणि त्यांनी विजय यांना वाकून नमस्कार केला. या क्षणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. ‘तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांना कुणी टक्कर देऊ शकतो, तर तो विजय यांचा पक्ष’, अशी हवा सध्या राज्यात निर्माण झाली आहे. तमिळनाडूमध्ये विजय यांचा पुष्कळ मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या मतांवर स्वार होऊन तमिळनाडूच्या राजकारणात उंच भरारी मारण्याचा विजय यांचा मानस आहे. त्यामुळे विजय यांनी सबरीनाथन् यांना आलिंगन देतांना, त्यांचे अश्रू पुसतांना आदी कृतींद्वारे लोकांच्या भावनांना हात घातला आहे. सध्यातरी ‘सामान्य लोकांना महत्त्व देणारा आणि त्यांच्या अडचणींना प्राधान्य देणारा नेता’, अशी विजय यांची प्रतिमा निर्माण होत आहे. या निवडणुकीत विजय यांनी त्रिची पूर्व आणि पेरंबूर या मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही द्रमुकेच बालेकिल्ले आहेत. त्रिची पूर्व हा शहरी भाग असून तेथे ख्रिस्त्यांची संख्या लक्षणीय आहे. अगदी अलीकडच्या काळापर्यंत केवळ ‘विजय’ हे नाव लावणारे सध्या ‘जोसेफ विजय’ असे पूर्ण नाव का लावत आहेत? याचे गुपित त्रिची पूर्व येथील लोकसंख्येच्या समीकरणामुळे लोकांसमोर उघड झाले असेल. अण्णाद्रमुक आणि भाजप यांनी विजय यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले होते, अशा बातम्या होत्या; मात्र विजय यांनी प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यांनी राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे निश्चित केले. एका कसलेल्या राजकारण्याप्रमाणे ते राजकारणात त्यांची पावले टाकत आहेत. पहिल्याच फटक्यात त्यांना सत्तेची चव चाखायला मिळेल का ?
वास्तविक गेली अनेक दशके तमिळनाडूचे राजकारण द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांच्या अवतीभोवती फिरत आहे. तमिळनाडू तसा पुरो(अधो)गामी, सुधारणावादी, धर्मनिरपेक्षतावादी थोडक्यात हिंदुद्वेष्ट्यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे काँग्रेसने येथे पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ती अपयशी ठरली. भाजपने हिंदुत्वाचे सूत्र उपस्थित करून तेथे पाय रोवण्याचा प्रयत्न केला; मात्र तमिळी लोकांची नस त्याला पकडता आली नाही. जे भाजप आणि काँग्रेस यांना जमले नाही, ते टीव्हीके करून दाखवणार का ? विजय यांनी ‘या वेळची निवडणूक ही द्रमुक विरुद्ध टीव्हीके अशी आहे’, असे स्पष्ट केले आहे. अण्णाद्रमुक वगैरे त्यांच्या खिजगणतीतही नाहीत. काही राजकीय तज्ञांच्या मते या वेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा पक्ष राजकीय अंदाज पालटू शकतो. भारतीय जनतेचे लक्ष सध्या बंगाल आणि आसाम राज्यांमधील निवडणुकीकडे लागले आहे; मात्र त्यासह तमिळनाडूची निवडणूक आणि त्याचा निकालही भारतियांसाठी विशेषतः हिंदूंसाठी महत्त्वाचा आहे. ‘हिंदु धर्म मिटवून टाकण्याची भाषा करणार्या द्रमुकला पुन्हा सत्तेत बसवायचे कि धर्मनिरपेक्षतेची झूल पांघरून अल्पसंख्यांकांच्या हितासाठी लढण्याची भाषा करणार्या टीव्हीकेला आपलेसे करायचे ? कि हिंदुहिताचा निर्णय घेणार्या उमेदवारांना सत्तेत आणायचे’, हे तमिळी जनतेने ठरवायचे आहे. या निवडणुकीत तमिळनाडूचे खर्या अर्थाने भवितव्य ठरणार आहे.
द्रमुकला पर्याय कुणाचा ?

तमिळनाडूत अभिनेत्यांचा राजकारणात प्रवेश, ही काही नवी गोष्ट नाही. एम्.जी. रामचंद्रन्, जयललिता, विजयकांत यांनी तमिळी राजकारणावर प्रभाव टाकला. त्यानंतर कमल हासन यांनी राजकारणात नशीब आजमावून पाहिले; मात्र त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यानंतर आता विजय ही परंपरा चालू ठेवतील का ? तमिळनाडूमध्ये जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्यासारखा खमका राजकारणी राजकीय पटलावर दिसून येत नाही. द्रमुकच नव्हे, तर अण्णाद्रमुककडेही असा चेहरा नाही. ‘ही पोकळी विजय भरून काढू शकतात’, असाही एक अंदाज वर्तवला जात आहे. विजय यांनी अभिनेते म्हणून त्यांच्या कामाला आरंभ केल्यावर त्यांच्याकडे ‘ठोकळेबाज अभिनेता’ म्हणून पाहिले गेले; मात्र हळूहळू अभिनयाला विनोदाची झालर देऊन त्यांनी तमिळी चित्रपटक्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. २७ सप्टेंबर २०२५ या दिवशी टीव्हीकेच्या स्थापनेची घोषणा करण्यासाठी करूर येथे आयोजित सभेसाठी साधारण ६० ते ७० सहस्र लोकांचा जमाव कार्यक्रमस्थळी जमा झाला होता. त्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ४१ लोक ठार झाले, ही गोष्ट वेगळी; मात्र या घटनेनंतर ‘विजय यांच्या मागे जनसमुदाय आहे’, हे त्या वेळी अन्य राजकीय पक्षांच्याही लक्षात आले होते. त्यामुळे विजय यांना कुणीही हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. त्याचाच एक भाग म्हणून ‘विजय यांना त्यांची प्रत्येक रॅली (मिरवणूक) किंवा सभा यांची अनुमती घेण्यासाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत आहेत’, अशा तक्रारी पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. ‘टीव्हीके’ला अशा प्रकारे त्रास देण्याचा प्रकार सत्ताधारी द्रमुककडून आतापासूनच चालू झाला आहे.
हिंदूंना लाभ काय ?
‘तमिळनाडूमध्ये द्रमुक, अण्णाद्रमुक किंवा टीव्हीके असा कोणताही पक्ष सत्तेत आला, तरी त्याचा हिंदूंना काय लाभ होणार ?’, हा कळीचा प्रश्न आहे. तमिळनाडूच्या राजकारणावर आजही पेरियार यांच्या कुविचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे वेगळी तमिळी संस्कृती, भाषा आणि आचार-विचार यांच्या दुष्प्रभावाद्वारे तेथील तमिळी जनतेला हिंदु धर्म, संस्कृती आणि परंपरा यांपासून विलग करण्याचे जे षड्यंत्र चालू आहे, ते आजतागायत चालू आहे. त्यातच तमिळी जनता व्यक्तीनिष्ठतेच्या आहारी जाते, हा इतिहास आहे. चित्रपटांतून कलाकारांचे जे वास्तविकतेपेक्षा भव्य-दिव्य रूप दाखवले जाते, त्यावर जनता विश्वास ठेवते आणि ‘हे कलाकार वास्तवातही असे काहीतरी भव्य दिव्य कृती करतील’, अशी भाबडी आशा बाळगून या अभिनेत्यांपासून राजकारणी बनलेल्या लोकांच्या मागे धावते. मागील अनेक दशकांप्रमाणे या वेळीही मतदार खोट्या तमिळी अस्मितेच्या प्रभावाखाली येऊन मतदान करणार कि हिंदुहित आणि राष्ट्रहित यांना प्राधान्य देणार ?, हे येणार्या काही दिवसांत समोर येईलच !
| बेगड्या तमिळी अस्मितेच्या आहारी गेलेली तमिळी जनता या वेळी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन तमिळनाडूत सत्तांतर घडवून आणणार का ? |
संपादकीय : ‘जय’शंकर !
संपादकीय : जसपाल राणा यांच्या जाण्याने …
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
संपादकीय : सत्तापिपासू तृणमूल बंडखोर !
संपादकीय : पंतप्रधानांची तपपूर्ती आणि हिंदूंच्या अपेक्षा !
संपादकीय : भारत युद्धसज्ज !