पाकिस्तान हे आतंकवाद्यांसाठी सुरक्षित केंद्र ! – Congress Research Service

अमेरिकेतील ‘काँग्रेस रिसर्च सर्व्हिस’चा अहवाल !

नवी देहली – पाकिस्तान अजूनही भारताच्या विरोधात सक्रीय असलेल्या आतंकवादी गटांचे सुरक्षित केंद्र बनलेला आहे. अमेरिकेतील ‘काँग्रेस रिसर्च सर्व्हिस’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानात अनेक प्रमुख आतंकवादी संघटना सक्रीय आहेत, ज्यांचे मुख्य लक्ष जम्मू-काश्मीरसह संपूर्ण भारत आहे. जम्मू-काश्मीरला लक्ष्य करणार्‍या या संघटना पाकिस्तानी भूमीवरून कोणत्याही अडथळ्याविना त्यांची कारस्थाने राबवत आहेत.

१. अनेक गटांना अमेरिकेने आधीच ‘विदेशी आतंकवादी संघटना’ असे केले आहे घोषित !

२५ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात १५ आतंकवादी संघटनांचे सविस्तर वर्णन केले आहे. यांतील अनेक गटांना अमेरिकेने ‘विदेशी आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हरकत-उल्-जिहाद-इस्लामी, हरकत-उल्-मुजाहिद्दीन आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांचा समावेश आहे.

२. पाकच्या मदरशांतून हिंसक कट्टरतावादाला मिळते खतपाणी !

अहवालानुसार पाकिस्तान या आतंकवादी संघटनांना संपवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, पाकिस्तानने वर्ष २०२३ मध्ये काही पावले उचलली असली, तरी तेथील मदरशांमध्ये अजूनही अशी विचारसरणी शिकवली जात आहे, जी हिंसक कट्टरवादाला खतपाणी घालते.

३. दुटप्पी पाकिस्तान ! – दक्षिण आशिया तज्ञ के. ॲलन क्रोनस्टॅड

दक्षिण आशिया तज्ञ के. ॲलन क्रोनस्टॅड यांनी सिद्ध केलेल्या या अहवालात पाकिस्तानचे दुटप्पी रूप उघड झाले आहे. एकीकडे पाकिस्तान स्वतःच्या देशातील अंतर्गत हिंसाचाराने (बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामधील बिघडलेली परिस्थिती) त्रस्त आहे, तर दुसरीकडे तो अशा आतंकवादी संघटनांना आश्रय देत आहे, जे भारताला लक्ष्य करत आहेत.

संपादकीय भूमिका  

अमेरिकेतून अशा प्रकारचे अहवाल प्रसिद्ध होत आहेत आणि त्यांचेच राष्ट्राध्यक्ष अशा देशाला मांडीवर बसवून भारताला त्रास देत आहेत !