सनातन भारत : समाज, राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांच्यासंबंधी प्रासंगिक सूत्रांवर भाष्य करणारे सदर
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्या युद्धात इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगावर इंधन संकट ओढवले आहे. आखातामधील सर्व तेल निर्मात्या इस्लामी देशांना जोडून असलेल्या या सामुद्रधुनीतून जगभर पेट्रोल, डिझेल, गॅस इत्यादी इंधनवाहू नौका प्रवास करतात. इराणने केवळ भारताच्या इंधनवाहू नौकांना दिलेला सुरक्षित मार्ग हा जागतिक चर्चेचा विषय ठरला आहे.

इराणने भारतालाच सवलत का दिली ?, याचे उत्तर इतिहासात आहे ! एकेकाळी ‘आर्यावर्त’ असलेल्या सनातन भारताचे ‘आर्याणा’, म्हणजेच सध्याच्या इराणशी तेलापेक्षाही घट्ट ‘आर्य नाते’ आहे. हे विधान भावनिक नसून त्यामागे सहस्रो वर्षांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा ‘आर्य’ या शब्दाभोवती विणलेला आहे. याचा उलगडा करणारा हा लेख !
१. ‘इराण’ म्हणजेच आर्यांचा देश !
आज आपण इराण म्हणून ज्या देशाला ओळखतो, त्याचे मूळ नाव ‘आर्य’ या शब्दाशी जोडलेले आहे. झोरोस्टरच्या (जरथुस्तच्या) काळापासून आणि विशेषतः भूतकाळातील येथील ससानियन साम्राज्यात इराणी लोक त्यांच्या देशाला ‘आर्याणा’, ‘इराण’, ‘इराणझमीन’ किंवा ‘इराण शहर’ म्हणत असत. ‘इराण’ या शब्दाचा शब्दशः अर्थच ‘आर्यांची भूमी’ असा होतो.

ख्रिस्तपूर्व ५ व्या शतकात सायरस द ग्रेट याने इराणमधील पार्स प्रांतात पहिल्या पर्शियन (अकेमेनियन) साम्राज्याची स्थापना केली. त्याला पुढे लॅटिन भाषेतून ‘पर्शिया’ हा शब्द रूढ झाला, त्यांची ‘पार्सा’ (पारसी) ही जमात ज्या भागात राहिली, त्याला आज ‘फार्स’ (फारस) किंवा ‘पार्स’ (पारस) प्रांत म्हटले जाते. भारतीय संस्कृतीचा पाया असलेला ‘ऋग्वेद’ आणि पारसी संस्कृतीचा ‘अवेस्ता’ (Vendidād – वेंदिदाद) ग्रंथ यांमध्ये अद्भुत साम्य आहे. ‘अवेस्ता’मधील ‘ऐर्यानाम’ हे वैदिक देव ‘आर्यमन’चेच प्रतिबिंब मानले जाते. दोन्ही ठिकाणी ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ ‘सुसंस्कृत’, ‘उदात्त’, ‘कुलीन’ किंवा ‘प्रतिष्ठित’ असा होतो.
पारसी धर्माचा पवित्र ग्रंथ ‘अवेस्ता’मध्ये १६ उत्तम आणि पवित्र भूमींचा (देशांचा) उल्लेख आहे, ज्या आर्यांच्या मूळ वास्तव्याशी संबंधित आहेत. त्यातील पहिली भूमी ज्याला प्राचीन इराणी भाषेत ‘आर्यानाम वैजह’ (Airyanām Waijah) म्हणतात. याचा अचूक अर्थ ‘आर्यांचे उगमस्थान’ किंवा ‘आर्यांची भूमी’ असा होतो. उर्वरित उल्लेख असलेल्या १५ आर्यभूमींचा आजचा भूगोल पाहिला, तर त्यात भारत (आर्यावर्त), पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, सीरिया, उझबेकिस्तान, ताजकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान हे मध्य-दक्षिण आशियातील देश येतात. थोडक्यात सांस्कृतिकदृष्ट्या भारत आणि इराण यांचे उगमस्थान एकाच भौगोलिक परिघाभोवती फिरतांना दिसते.
२. राजा दरायसचे ऐतिहासिक घोषणापत्र
इराणमधील ‘नक्श-ए-रुस्तम’ येथील शिलालेखात राजा दरायस प्रथम (Darius I) याने स्वतःची ओळख करून देतांना जे शब्द वापरले आहेत, ते कोणत्याही भारतियाला थक्क करणारे आहेत. तो म्हणतो, ‘पार्स पार्सह्य पुत्र अरीय अरीयचिश्र’ अर्थात् ‘मी दरायस, महान राजा, राजांचा राजा… एक पार्सी, पार्सीचा मुलगा, एक आर्य, आर्यांच्या वंशातील.’

हा शिलालेख सिद्ध करतो, ‘आर्य’ ही ओळख कोणतीही विदेशी संकल्पना नसून ती इराणच्या मातीतील मूळ ओळख होती.’
३. व्यापाराचे प्राचीन मार्ग
भारत अन् इराण यांच्यातील व्यापार केवळ वस्तूंचा नव्हता, तर तो संस्कृतीचा सेतू होता.
३ अ. रेशीम मार्ग (Silk Road) : प्राचीन काळापासून इराण हा रेशीम मार्गाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू होता. भारतीय व्यापारी अफगाणिस्तानमार्गे इराणमध्ये शिरून तेथून पुढे युरोपपर्यंत जात असत.
३ आ. समुद्री व्यापार : सिंध, गुजरात आणि कोकण किनारपट्टीवरून पर्शियन आखातातील ‘हॉर्मुझ’ (Hormuz) आणि ‘सिरफ’ (Siraf) या बंदरांशी भारताचा मोठा व्यापार चाले.
तेलापेक्षा घट्ट असलेल्या संबंधांचे काही दाखले

मौर्य साम्राज्याच्या काळात (विशेषतः सम्राट चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक यांच्या वेळी) भारत अन् पर्शिया यांच्यातील राजकीय संबंध शिखरावर होते. दोन्ही साम्राज्यांनी एकमेकांच्या राजदरबारात राजदूत पाठवले होते, ज्यामुळे प्रशासकीय पद्धतींचीही देवाणघेवाण झाली.
केवळ व्यापार आणि भाषाच नाही, तर संगीतावर खोल परिणाम झाला. सतार हे वाद्य अमिर खुसरो यांनी भारतीय वीणा आणि पर्शियन तनबुरा (पर्शियनमध्ये ‘तीन तारा’) यांच्या संयोगातून विकसित केले. या वाद्याच्या निर्मितीत भारतीय आणि पर्शियन संगीताचे मिश्रण दिसून येते.
भारतातील प्राचीन ग्रंथांत ‘मग’ किंवा ‘शाकद्वीपी’ ब्राह्मणांचा उल्लेख आढळतो. ऐतिहासिक पुराव्यांनुसार हे मूळचे पर्शियातील ‘मगी’ पुरोहित होते. त्यांनी सौर उपासना आणि ‘सौर सिद्धांत’ यांचा मोठा प्रचार केला. आजही इराणमध्ये उगम पावलेल्या पारशी धर्मात ‘सूर्या’ला सर्वोच्च स्थान होते. पारशी लोक सूर्याला ‘मिथ्र’ (Mithra) म्हणतात. (संस्कृतमध्ये सूर्याचे एक नाव ‘मित्र’ आहे.)
प्राचीन पर्शियन खगोलशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवरून ‘झिज’ (Zij) नावाची सारणी बनवली जात असे. भारतीय ‘सिद्धांत’ ग्रंथांशी याचे कमालीचे साम्य आहे.
भारतीय परंपरेत २७ नक्षत्रांना महत्त्व आहे, तर पर्शियन परंपरेत राशीचक्राला (Zodiac) अधिक महत्त्व होते. कालांतराने दोन्ही संस्कृतींनी एकमेकांच्या पद्धती स्वीकारल्या.
‘भृगु’ किंवा ‘नाडी’ ग्रंथांमध्ये ज्याप्रमाणे कुंडलीतील स्थानांचा विचार केला जातो, तशीच पद्धत प्राचीन पर्शियन ‘अख्तर’ शास्त्रामध्ये आढळते. ‘भृगु’ संहितेत आणि ‘नाडी’ ग्रंथात वापरली जाणारी अनेक चिन्हे (उदाहरणार्थ मासा, सिंह, धनुष्य) ही केवळ कल्पित नसून ती आकाशातील तार्यांच्या समूहाची भारतीय मांडणी आहे. प्राचीन पर्शियन आणि त्यांच्या ‘बंदेहश्न’ (Bundahishn) या ग्रंथामध्ये तार्यांचे जे वर्गीकरण आहे, ते भारतीय नक्षत्र मंडळाशी मिळतेजुळते आहे.
– श्री. चेतन राजहंस
३ इ. चाबहार बंदराच्या विकासातून आधुनिक काळातील ‘रेशीम मार्गा’ची निर्मिती : आजही भारत सरकार चाबहार हे इराणचे बेट ‘व्यापारी बंदर’ म्हणून स्वखर्चाने विकसित करत आहे. आजच्या युगात चाबहार हे बंदर भारत आणि इराण यांच्यातील प्राचीन ‘रेशीम मार्गाचे’ आधुनिक पुनरुज्जीवन ठरणार आहे. भौगोलिक अडथळ्यांना उत्तर म्हणून पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तान, तसेच मध्य आशियातील देशांशी थेट व्यापार करण्यासाठी भारताने विकसित केलेले हे एक धोरणात्मक बंदर आहे.
ज्याप्रमाणे प्राचीन काळी भारतातील व्यापारी इराणमार्गे युरोपपर्यंत प्रवास करत असत, अगदी तसाच हा मार्ग आता ‘इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर’ (INSTC – आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण महामार्ग)चा मुख्य दुवा बनला आहे. या नव्या ‘रेशीम मार्गामुळे’ रशिया आणि युरोप यांच्यापर्यंत पोचण्याचा वेळ अन् खर्च जवळपास ४० टक्क्यांनी घटणार आहे. हे बंदर केवळ इंधन किंवा वस्तू यांची ने-आण करणारे केंद्र नसून ते ‘आर्यावर्त’ आणि ‘आर्याणा’ या दोन प्राचीन संस्कृतींना पुन्हा एकदा जोडणारा एक भक्कम आधुनिक सेतू ठरत आहे.

४. भारत-इराण यांच्यात ‘आर्य’ संस्कृतीचे सनातन नाते !
भारत आणि इराण यांच्यातील हे नाते केवळ ‘तेलाचे’ नव्हते, तर ते ‘तारे’ आणि ‘खगोल गणित’ यांचेही होते. इराणवर वर्ष ६५१ च्या सुमारास अरबांचे आक्रमण झाले आणि तेथील सामाजिक स्थितीमध्ये परिवर्तन घडले; मात्र त्याआधीची सहस्रो वर्षांची परंपरा दोन्ही देशांना एकाच सूत्रात बांधते. भारत आणि इराण यांच्यामधील आजचे संबंध हे केवळ भू-राजकीय किंवा केवळ ‘तेलाच्या व्यवहारा’पुरते मर्यादित नाहीत. हे नाते ‘ऋग्वेदा’च्या सूक्तांपासून अवेस्ताच्या गाथांपर्यंत आणि ‘आर्यावर्ता’पासून ‘आर्याणा’पर्यंत पसरलेल्या एका सामायिक सांस्कृतिक वारशाचा परिपाक आहे. काळ पालटला, धर्म परिवर्तन झाले आणि सीमाही पालटल्या, तरीही ‘आर्य’ या शब्दाने विणलेले हे रेशीम बंध आजही तितकेच घट्ट आहेत. तेल ही केवळ आजच्या जगाची आवश्यकता आहे; पण ‘आर्य’ संस्कृतीचे नाते हे सनातन आहे. आजच्या अस्थिरतेच्या काळात इराणने भारताच्या नौकांना दिलेला सुरक्षित मार्ग असो किंवा भारताने चाबहारमध्ये केलेली गुंतवणूक असो, हे सर्व ‘तेलापेक्षाही घट्ट’ असलेल्या सनातन नात्याची आधुनिक प्रचीती आहे.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (२४.३.२०२६)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?