सनातनच्या ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवा करतांना साधकाला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपेने शिकायला मिळालेली सूत्रे

पणजी येथील ‘गोवा बुक फेस्टिव्हल २०२६’चे भव्य आयोजन

‘४ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बांदोडकर मैदान, पणजी येथे प्रथमच ‘गोवा बुक फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्यात आला होता. या कक्षावर सनातनचे ‘मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि गुजराती’ या भाषांतील ग्रंथ ठेवले होते. ग्रंथप्रदर्शन कक्षावर मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. ग्रंथप्रदर्शन कक्ष आकर्षक पद्धतीने लावण्यासाठी गुरुकृपेने केलेले प्रयत्न

गोवा राज्यातील साधकांसाठी असा पुस्तक महोत्सव हा पहिलाच आणि नवीनच होता. त्यामुळे विविध प्रकारचे अनुभव घेण्याची आम्हाला संधी लाभली होती. आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर करायच्या ग्रंथवितरण सेवेची व्याप्ती ठाऊक नव्हती. प्रत्येक दिवशी कुणी नवीन संकल्पना सुचवल्यावर चांगला आणि आकर्षक ग्रंथकक्ष लावण्याचा प्रयत्न गुरुदेवांनीच आम्हा साधकांकडून करून घेतला. ‘अन्य ग्रंथकक्षांची मांडणी कशी केली आहे ? त्यांनी पुस्तकांचे प्रदर्शन कसे लावले आहे ?’, ते बघून ‘सनातनच्या ग्रंथकक्षावर काही पालट करू शकतो का ?’ ‘संस्थेचा कक्ष लांबून ठळकपणे दिसेल आणि लक्षात येईल’, यासाठी काय करता येईल ?’ यासाठी अन्य साधकांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही पालट केले. हे सर्व करतांना मला आनंद मिळत होता.

गोवा पुस्तक महोत्सवात लावलेले सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन

‘गोवा बुक फेस्टिव्हल’ची व्यापकता

जेव्हा मला ‘गोवा बुक फेस्टिव्हल’मध्ये सनातनच्या ग्रंथप्रदर्शन कक्षाच्या संदर्भातील सेवा मिळाली, तेव्हा मला वाटले की, ‘पुस्तक महोत्सव म्हणजे विविध पुस्तकविक्रेते मंडपात पटलावर आपली पुस्तके मांडून त्यांची विक्री करतील; पण जेव्हा मी महोत्सवाच्या ठिकाणी गेलो, तेव्हा ‘या महोत्सवाची व्यापकता पुष्कळ मोठी आहे’, असे माझ्या लक्षात आले.

अ. ५ दिवसांच्या या पुस्तक महोत्सवात एकूण २०० कक्ष (स्टॉल्स) आणि ७० – ८० पुस्तक प्रकाशक होते.

आ. महोत्सवात ‘अनेक मान्यवर, विचारवंत, इतिहासकार, लेखक आणि संपादक’ यांच्या चर्चासत्रांचे आयोजन केले होते.

इ. तेथे पुस्तकांचे प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, तसेच वाद्यवृंद अशा प्रकारचे कार्यक्रमही ठेवले होते.

ई. प्रतिदिन शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि कथा यांच्याविषयीच्या कार्यशाळांचे नियोजन केले होते.

उ. चित्रकला प्रदर्शनासाठी एक वेगळा मंडप होता आणि तिथे ‘ऑथर कॉर्नर’ या नावाने चर्चासत्रासाठी एक मंडप उभारला होता.

या कार्यक्रमाची व्याप्ती पुष्कळ मोठी होती.

२. व्यष्टी आणि समष्टी साधना होण्यासाठी प्रयत्न करणे, सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना भावपूर्ण प्रार्थना केल्यावर ‘गुरुदेवच जिज्ञासूंना कक्षावर येण्याची बुद्धी देत आहेत’, अशी अनुभूती येणे

मी व्यष्टी साधनेच्या स्तरावर प्रत्येक दिवशी मनात ध्येय ठेवले होते की, ‘स्वभावदोष किंवा अहंच्या ज्या पैलूंमुळे सेवेतील आनंद घेण्यापासून मी वंचित रहातो, त्यावर मला प्रयत्न करायचे आहेत.’ भक्तीसत्संगात सांगितल्याप्रमाणे ऐकण्याची वृत्ती वाढवण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. ग्रंथकक्षावर सेवेला येण्यापूर्वी मी नामजप आणि आध्यात्मिक उपाय पूर्ण करत होतो. ग्रंथकक्षावर सेवा करतांना माझ्याकडून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना सतत प्रार्थना होत होती, ‘ज्या जिज्ञासूपर्यंत हे ज्ञानमय चैतन्य पोचणे आवश्यक आहे, त्यांना तुम्हीच या ग्रंथकक्षावर घेऊन या. अधिकाधिक लोकांपर्यंत हे ज्ञानाचे भांडार पोचू दे आणि अधिकाधिक जणांना साधना करण्याची बुद्धी होऊ दे !’ त्या वेळी ‘गुरुदेवच जिज्ञासूंना कक्षावर येण्याची बुद्धी देऊन ग्रंथवितरण करून घेत आहेत’, अशी अनुभूती आम्हाला आली. आम्हाला सेवा करतांना पुष्कळ उत्साह जाणवत होता. ‘५ दिवस कसे गेले ?’, हे आम्हाला समजलेच नाही.

३. सेवेची योग्य प्रकारे विभागणी आणि नियोजन केल्यामुळे साधकांवर सेवांचा ताण न येणे

श्री. शिवदत्त नाडकर्णी

या वेळी सेवांची विभागणी पुढील प्रमाणे केली होती, ‘साधकांना महोत्सवस्थळी घेऊन येणे आणि परत पोचवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेचा समन्वय करणे, ग्रंथकक्षावर साहित्याचा पुरवठा करणे, ग्रंथांच्या वितरणाची नोंद करून त्यांचा हिशोब ठेवणे, वितरकांकडे ग्रंथांची मागणी करणे आणि वितरणाच्या संदर्भातील संगणकीय सेवा करणे.’ यामुळे कोणत्याही साधकाला सेवेचा ताण आला नाही. यातून ‘संघटनात्मक रचनेनुसार सेवा केली, तर सेवेतील ताण न्यून होतोे आणि सेवेतील आनंद मिळतो’, हे मला शिकता आले.

४. प्रतिदिन ग्रंथांचा पुरेसा साठा ग्रंथकक्षावर उपलब्ध असणे

जिज्ञासू ग्रंथकक्षावर आल्यावर ‘आपल्याकडील ग्रंथ संपले आहेत’, असे त्यांना सांगण्याची वेळ येऊ नये, यासाठी ग्रंथांची मागणी वेळच्या वेळी करण्याचा मी प्रयत्न केला. वितरकानेही तत्परतेने प्रत्येक दिवशी सकाळी ग्रंथकक्षावर ग्रंथ पाठवले. कधी मागणी करायला उशीर झाला, तरी वितरकाने परिस्थिती समजून मागणीनुसार वेळेवर ग्रंथ पाठवले. त्यामुळे ग्रंथकक्षावर ग्रंथांचा पुरेसा साठा उपलब्ध रहात होता. हीसुद्धा देवाचीच कृपा होती.

४ अ. रात्री दीड वाजता वितरकाकडे ग्रंथांची मागणी पाठवणे आणि दुसर्‍या दिवशी एका स्त्रीने इंग्रजी ग्रंथांचा संच विकत घेतल्यावर ‘गुरुदेवांनी रात्रीच ही सेवा का करून घेतली होती ?’, याची जाणीव होणे : पुस्तक महोत्सवाच्या चौथ्या दिवशी इंग्रजी आणि मराठी भाषांतील बरेच ग्रंथ संपले होते. दुसर्‍या दिवशी महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्यामुळे ‘अधिक लोक येतील’, असे मला वाटत होते. त्यामुळे ‘सर्व ग्रंथांची मागणी वितरकाला पाठवूनच झोपूया’, असा विचार करून मी रात्री दीड वाजता सेवा पूर्ण केली. वितरकाने मागणीनुसार सकाळी ग्रंथ पाठवून दिले. पाचव्या दिवशी संध्याकाळी एक महिला ग्रंथकक्षावर आली आणि तिने भराभर सगळे इंग्रजी ग्रंथ बघितले. तिने इंग्रजी ग्रंथांचा एक संच विकत घेतला. त्या वेळी ‘आदल्या रात्री दीड वाजता मागणी करण्याची सेवा गुरुदेवांनी माझ्याकडून का करून घेतली होती ?’, हे लक्षात येऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले आणि गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

५. ग्रंथकक्षावर विविध प्रकारच्या सेवा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती शरणागत आणि कृतज्ञता भाव दाटून येणे

आरंभी माझ्याकडे केवळ वितरण झालेल्या ग्रंथांची मागणी करणे आणि तिचा पाठपुरावा करणे, एवढीच सेवा होती; पण ग्रंथकक्षावर गेल्यावर ‘तिथे येणार्‍या जिज्ञासूंची छायाचित्रे काढणे, प्रतिष्ठित व्यक्तींच्या लहान मुलाखती (बाईट) घेणे, कार्यक्रमातील चर्चासत्रांचे वृत्त तयार करून पाठवणे’, आदी सेवा मला गुरुदेवांच्या कृपेने मिळाल्या. लहान मुलाखती (बाईट) घेणे, छायाचित्र काढणे आदी सेवांच्या माध्यमातून ‘स्वतःतील ‘सतर्कता, तत्परता आणि निरीक्षणक्षमता’ वाढायला हवी’, याची मला जाणीव झाली.

‘ग्रंथकक्षावरील सर्व सेवा गुरुदेवच करून घेत असून मी केवळ माध्यम आहे’, या विचाराने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती माझा शरणागत आणि कृतज्ञता भाव दाटून यायचा.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, या पुस्तक महोत्सवात आपण मला सेवेची संधी देऊन माझ्याकडून सेवा करून घेतली, त्यातील बारकावे लक्षात आणून दिले आणि प्रत्येक क्षणी अनुभूती दिल्या’, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. शिवदत्त नाडकर्णी, फोंडा, गोवा. (२३.२.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक