‘live-in’ Relationship : विवाहित पुरुषाने दुसर्‍या महिलेसमवेत ‘लिव्ह-इन’मध्ये रहाणे गुन्हा नाही !

  • अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निरीक्षण

  • कायदा आणि नैतिकता दोन भिन्न गोष्टी ! – न्यायालय

(लिव्ह-इन, म्हणजेच लिव्ह-इन रिलेशनशिप अर्थात् विवाह न करता एकत्र रहाणे)

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – एखादा विवाहित पुरुष दुसर्‍या महिलेसमवेत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहात असेल, तर तो गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवतांना स्पष्ट केले की, नैतिकता आणि कायदा या दोन भिन्न गोष्टी आहेत. ‘लिव्ह-इन’मध्ये रहाणार्‍या जोडप्याला महिलेच्या कुटुंबियांकडून मिळणार्‍या धमकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी न्यायालयाकडून संरक्षण मागितले होते.

न्यायालयाने पुढे म्हटले की, कायद्यानुसार कोणताही गुन्हा सिद्ध होत नसेल, तर नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सामाजिक मतप्रवाह आणि नैतिकता न्यायालयाच्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकत नाहीत.

व्यक्तीचा विवाह झाल्यामुळे दुसर्‍या महिलेसमवेत नात्यात रहाणे गुन्हा आहे, अशा शब्दांत महिलेच्या कुटुंबियांनी न्यायालयात बाजू मांडली होती. यावर न्यायालयाने वरील मत नोंदवले. न्यायमूर्ती जे.जे. मुनीर आणि न्यायमूर्ती तरुण सक्सेना यांच्या खंडपिठाने या प्रकरणी सुनावणी केली. यानंतर पोलिसांनी या जोडप्याच्या सुरक्षेचे दायित्व शाहजहानपूरच्या पोलीस अधीक्षकांवर सोपवले आहे.

संपादकीय भूमिका

अशामुळे हिंदु कुटुंबव्यवस्था मोडकळीस यायला, तसेच त्यातून संस्कृतीचा र्‍हास व्हायला वेळ लागणार नाही. भारताचे पाश्‍चात्त्यीकरण होऊ नये, असे बहुतेक हिंदूंना वाटते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाची स्वत:हून नोंद घेऊन कुटुंबव्यवस्था वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी जनतेची विनम्र अपेक्षा आहे !