श्रीरामरक्षास्तोत्राचा अर्थ

२६ मार्च या दिवशी झालेल्या ‘श्रीरामनवमी’च्या निमित्ताने…

श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीरामरक्षास्तोत्र (अर्थासहित) प्रसिद्ध करत आहोत. त्यातील काही श्लोकांचा अर्थ आपण २७ मार्च या दिवशी पाहिला. आज उर्वरित श्लोकांचा अर्थ समजून घेऊया. संस्कृत भाषेत २ शब्दांमध्ये स्वल्पविराम येत नाही; परंतु हे स्तोत्र म्हणतांना जिथे आपण किंचित् थांबतो, तिथे २ शब्दांमध्ये स्वल्पविराम दिले आहेत. मोठ्या शब्दांचा उच्चारासाठी संधीविग्रह केला आहे, तिथे स्वल्पविराम दिला आहे; पण शब्दांत अंतर ठेवलेले नाही. यामुळे श्रीरामरक्षास्तोत्र म्हणणार्‍यांना उच्चार करणे सुलभ होईल.

भाग ४ 

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1022863.html

श्रीराम

माता रामो, मत्पिता रामचन्द्रः ।
स्वामी रामो, मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वम् मे, रामचन्द्रो दयालुर्, नान्यञ् जाने, नैव जाने न जाने ॥ ३० ॥

अर्थ : राम माझी आई, राम माझा पिता, राम माझा धनी, राम माझा सखा आहे. माझे सर्वस्व तो दयाघन रामचंद्र आहे. मी रामाविना अन्य कुणाला जाणत नाही. (मी रामाचा एकनिष्ठ भक्त आहे.) हे मी त्रिवार सांगतो.

दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य, तं वन्दे रघुनन्दनम् ॥ ३१ ॥

अर्थ : ज्याच्या उजवीकडे लक्ष्मण, डावीकडे जानकी आणि समोर मारुति आहे, त्या रघुनंदन रामाला मी वंदन करतो.

लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ।
कारुण्यरूपङ् करुणाकरन् तम्, श्रीरामचन्द्रं शरणम् प्रपद्ये ॥ ३२ ॥

अर्थ : लोकांना आनंद देणारा, युद्धात धैर्य धारण करणारा, कमलनेत्र, रघुवंशाचा स्वामी, दयेची केवळ मूर्तीच, अशा त्या कृपाळू रामचंद्राला मी शरण आलो आहे.

मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये ॥ ३३ ॥

अर्थ : मनोवेगाने जाणारा, वार्‍याप्रमाणे (मरुत् म्हणजे वारा) वेगवान, जितेंद्रिय, बुद्धीमंतांमध्ये श्रेष्ठ, वायूपुत्र, वानर-समुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे.

कूजन्तं रामरामेति, मधुरम् मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां, वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥ ३४ ॥

अर्थ : कवितारूपी फांदीवर बसून ‘राम राम’ अशा मधुर अक्षरांचे कूजन करणार्‍या वाल्मीकिरूपी कोकिळ पक्ष्याला मी वंदन करतो.

आपदामपहर्तारन्, दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामम्, भूयो भूयो नमाम्यहम् ॥ ३५ ॥

अर्थ : संकटे दूर करणारा, सर्व प्रकारचे वैभव देणारा अन् लोकांना आनंद देणारा, अशा रामचंद्राला मी पुनःपुन्हा नमस्कार करतो.

भर्जनम् भवबीजानाम्, अर्जनं सुखसम्पदाम् ।
तर्जनं यमदूतानाम्, रामरामेति गर्जनम् ॥ ३६ ॥

अर्थ : ‘राम राम’ हा नामघोष जन्म-मरणाचे मूळ जाळून टाकणारा, सुखसंपदेचा लाभ करून देणारा आणि यमदूतांना भय उत्पन्न करणारा आहे.

रामो राजमणिः सदा विजयते, रामं रमेशम् भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणम् परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर ॥ ३७ ॥

अर्थ : राम राजांमध्ये श्रेष्ठ असून तो नेहमी विजयी होतो. अशा रमापती (सीतापती) रामचंद्राला मी भजतो. राक्षससेना ठार करणार्‍या रामाला माझा नमस्कार असो. रामाविना मला कुणी प्रिय नाही. मी रामाचा दास आहे. रामाच्या ठायी माझे चित्त नेहमी एकाग्र होवो. हे रामा, माझा उद्धार कर !

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यम्, रामनाम वरानने ॥ ३८ ॥

अर्थ : (भगवान शिव पार्वतीला सांगतात) हे सुमुखी, ‘राम राम राम’ असा मनाला आनंद देणारा नामजप करत मी तल्लीन होतो. रामाचे एक नाम (विष्णूच्या) सहस्रनामांच्या समतुल्य आहे.

॥ इति श्रीबुधकौशिकविरचितं, श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

अर्थ : याप्रमाणे बुधकौशिकऋषिरचित श्रीरामरक्षास्तोत्र संपूर्ण झाले. हे श्रीसीतारामचंद्राच्या चरणी अर्पण असो.

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥

(समाप्त)

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)’)

हे रामरक्षास्तोत्र पठण करणार्‍यांना स्तोत्रापासून अधिकाधिक आध्यात्मिक लाभ होवो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !