।। आजानुबाहु जय जय राम ।।

‘श्रीरामनवमी’च्या निमित्ताने ‘श्रीरामनामावली’ सदर !

लेखांक ६

श्रीसमर्थ रामदासस्वामी श्रीरामाच्या सगुण साकार रूपाचे वर्णन स्वतः राम होऊनच करत आहेत. राम रंगाने सावळा आहे. ‘जलदप्रभानिभ’ आहे. राजीव लोचन आहे आणि आता म्हणत आहेत श्रीराम ‘आजानुबाहु’ आहे. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोचतात, तेवढे लांब आहेत, अशा व्यक्तीला ‘आजानुबाहु’ म्हणतात. हा झाला शब्दशः अर्थ. सामान्यतः सगळ्यांचे हात गुडघ्याच्या वर वितभर तरी असतात. आजानुबाहु हे असामान्य लक्षण आहे. असे असणे भाग्याचे समजले जाते. योगीजनांचे हात असे असतात. यौगिक सामर्थ्याचेच हे प्रतीक आहे. हे कसे शक्य होते, यासंबंधीचे वर्णन ‘पतंजलियोग’ क्रियेत दिलेले आहेत.

लेखांक ५ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1022263.html

श्रीराम

बद्धपद्मासनाचे महत्त्व

आसनांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, उदा. पद्मासन, बद्धपद्मासन, सिद्धासन इत्यादींपैकी बद्धपद्मासन योगमार्गातील एक महत्त्वाचे आसन आहे. त्यामुळे मन एकाग्र होण्यास साहाय्य मिळते. बाहू बलिष्ठ आणि कणखर बनतात. पद्मासन कसे घालावे ? यासंबंधी मार्गदर्शन तेथे केले जाते. बद्धपद्मासन बसतांना स्वतःचे दोन्ही पाय एकावर एक असे ठेवायचे आणि दोन्ही हात पाठीमागून दुमडून आपले दोन्ही पायांचे अंगठे धरायचे असतात. तेव्हा आपल्या हाताचा एकप्रकारे गोलाकार होतो. त्या गोलाची लांबी (परिघ) चार हाताची होते. असे अगदी लहानपणापासून, म्हणजे जेव्हा स्वतःचे शरीर अत्यंत लवचिक असते, तेव्हापासून नित्यनेमाने केले, तर त्या साधकाचे हात अजानु, म्हणजे गुडघ्यापर्यंत पोचतील एवढे लांब या व्यायामामुळे होतात. बाहूमध्ये प्रचंड सामर्थ्य येते. असा साधक निरंतर अभ्यासाने आजानुबाहु होतो आणि त्याला परमेश्वरस्वरूप प्राप्त होते.

श्रीमती स्नेहल पाशुपत

प्रभु श्रीराम शस्त्रास्त्रसंपन्न आणि योगाभ्यासामुळे सामर्थ्यवान

श्रीराम हे देवावतार असले, तरी महर्षि वाल्मीकि रामाचे वर्णन मनुष्यरूपातच करतात. श्रीराम योगी आहेत. मौंजी बंधनानंतर लहानपणापासून चारही भावंडांचे शिक्षण ब्रह्मर्षि वसिष्ठ यांच्या गुरुकुलात तत्कालीन प्रथेप्रमाणे तेथील खडतर नियमांचे पालन करत झाले आहे. त्या काळातील गुरुकुलातील शिक्षण जीवनोपयोगी होते. लौकिक व्यावहारिक शिक्षणासह पारलौकिक, आध्यात्मिक उत्तरदायित्व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी षट्चक्र जागृती आणि यौगिक प्रक्रिया सुसूत्र होणे आवश्यक असते. त्यासाठी ध्यानधारणा, जपजाप्य, आध्यात्मिक ग्रंथांचे पठण या सार्‍यांचे योग्य मार्गदर्शन गुरुकुलात मिळत होते. हे तर अयोध्येचे राजकुमार आहेत. भावी योद्धे, महावीर आहेत. श्रीराम तर अयोध्येचे भावी राजे आहेत. दिव्य, स्वर्गीय आयुधे स्वतःच्या भरभक्कम खांद्यावर त्यांना अखंड पेलायची आहेत. यासाठी खांदे, मनगट, बाहू कणखर आणि सामर्थ्यसंपन्न असणे आवश्यक आहे. पूर्वनियोजनाप्रमाणे सर्व ऋषिमुनी, देवता यांनी मिळून रावणवधाचे ध्येय नजरेसमोर ठेवूनच श्रीरामाला विशेष शिक्षण देऊन सिद्ध केले आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून महर्षि विश्वामित्र रामलक्ष्मणांना शस्त्रास्त्रसंपन्न करण्यासाठी आपल्यासह घेऊन जातात आणि त्या दोघांना विशेष शिक्षण देतात. त्यांच्या बाहूत विशेष बल प्रदान करतात; म्हणून श्रीराम जनकाचे शिवधनुष्य लीलया उचलू शकले. त्यामुळेच श्रीराम लहान वयात महाबलाढ्य ताटीका राक्षसी, मारिच-सुबाहू राक्षस आणि तिच्या १४ सहस्र राक्षसांचा निःपात करू शकले. योगाभ्यासामुळेच त्यांना एवढे सामर्थ्य प्राप्त झाले. श्रीरामाच्या पराक्रमाचे गुणगान करतांना गोस्वामी तुलसीदास म्हणतात, ‘शिर मुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषणं । आजानु भुज शर चाप धर संग्राम-जित-खरदूषणं ।।’

असे हे योग्यांचे योगी असणार्‍या श्रीरामाचे कौतुकाने रसभरीत वर्णन करतांना श्रीसमर्थ म्हणतात… ‘आजानुबाहु जय जय राम ।’

।। जय जय रघुवीर समर्थ  ।।

– श्रीमती स्नेहल पाशुपत, चिंचवड, पुणे.

(साभार : ‘श्रीरामनामावली’ पुस्तकातून)

श्री समर्थ रामदासस्वामी यांच्यासारख्या विरागी महात्म्यांनीही छत्रपती शिवरायांचे गुणानुवाद गायिले आहेत, त्यांना ‘श्रीमंत योगी’ म्हटले आहे. (साभार : प.पू. स्वामी वरदानंद भारती लिखित ग्रंथ ‘हीच गुरुपूजा खरी’)