‘श्रीरामनवमी’च्या निमित्ताने ‘श्रीरामनामावली’ सदर !
लेखांक ५
पूर्वजन्मात स्वायंभुव मनू आणि शतरूपा या दांपत्याने विराट भगवंताच्या दर्शनाचे मनोरथ मनी धरून कठोर तप केले. अखेर निर्गुण परमात्मा प्रसन्न झाले. ‘आमच्या उदरी तू पुत्र म्हणून यावेस’, अशी इच्छा उभयता पतीपत्नीने व्यक्त केली आणि ‘पुत्र वात्सल्याच्या प्रेमासाठी तुमची इच्छा मी त्रेतायुगात रामावतार घेईन, तेव्हा पूर्ण करीन’, असे वचन दिले. पुढच्या जन्मात कश्यपमुनी आणि अदिती झाले. तेच पुन्हा त्रेतायुगात राजा दशरथ आणि राणी कौसल्या म्हणून जन्माला आले. या जन्मात भगवंताचा वर सत्य झाला. मागच्या भागात आपण राजा दशरथाचे चरित्र बघितले.
लेखांक ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1021925.html

वेदविद्या पारंगत धर्मपरायण कौसल्या
आताची कौसल्या राणी पूर्वजन्मातील तपस्विनी शतरूपा, म्हणजे सामान्य स्त्रीच्या शतपट रूपवान सौंदर्यवती, त्यासह अत्यंत सत्शील आणि धार्मिकही आहे. हे सगळे गुण घेऊन शतरूपा पुढील जन्मात कश्यपपत्नी अदिती होते. या जन्मात देवमाता होण्याचे भाग्य तिला लाभले. तेवढ्याने तिचे समाधान होत नाही. बाल परब्रह्मरूप मांडीवर खेळवण्याचे मनोरथ घेऊन या जन्मात कोसल देशाची राजकन्या आणि अयोध्यापती दशरथाची ज्येष्ठ पत्नी कौसल्या होते. ब्रह्मांडनायक त्रैलोक्याधिपती राम नावाने कौसल्यात्मज होऊन वचनपूर्ती करतात. कौसल्या अत्यंत रूपवती असल्याने श्रीराम रूपसंपन्न आहेत. ती स्वतः वेदविद्या पारंगत धर्मपरायण आहे. मृदुभाषी, प्रेमळ अन् सरळ अंतःकरणाची सुशील स्त्री, तसेच विदुषी (विद्वान) होती. दशरथासमवेत धर्मशास्त्र आणि राजशास्त्रातील शास्त्रार्थाची चर्चा करत असे.

कौसल्यामातेचे गुण आणि तिचे धैर्य
आईचे हे गुण रामाचे ठिकाणी आलेले आपल्याला दिसतात. कुटुंबात एकसंधता ठेवण्याचे कौशल्य तिच्याकडे आहे. राम तिचा पुत्र आहे, तेव्हा त्याच्यावर प्रेम, ममता, वात्सल्य, असणारच; पण त्यासमवेत भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांच्यावर ही तिचे तेवढेच प्रेम आहे. चौघा भावंडांवर उत्तमोत्तम संस्कार कौसल्येने केले आहेत. कठीण प्रसंगी आवश्यक असणारे संयम, धीरोदात्तता, कर्तव्यनिष्ठा आणि विवेक हे गुण प्रकर्षाने कौसल्येच्या जीवनात ठळकपणे दिसतात. जेव्हा श्रीराम वनवासाला निघतो, तेव्हा सामान्य स्त्री दुःखी होते. ‘रामा तू वनात जाऊ नको. जाणार असशील, तर मला घेऊन जा’, असे भावनेच्या भरात बोलते; पण क्षणार्धात स्वतःला सावरते. ‘तुलसी रामायणा’त ती रामाला म्हणते, ‘आई वडिलांची आज्ञा आहे, तर तुला जावे लागेल. ते वचन तुला १०० अयोध्यांप्रमाणे असणार आहे.’
‘जौ पितु मातु कहेउ बन जाना ।
तौ कानन सत अवध समाना ।।’ या एका वाक्यात कौसल्येच्या विचारांची उंची लक्षात येते. रामाचा वनवास अटळ आहे, हे कळताच कौसल्या ‘या तिघांचे (श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे) रक्षण करावे’, अशी प्रार्थना वनदेवतेला करते. अशा लोकोत्तर, धीरोदात्त आणि कर्तव्यपरायण मातेचे ‘आत्मज’ (पुत्र) श्रीराम आहेत. ‘कौसल्यात्मज जय जय राम ।’
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
– श्रीमती स्नेहल पाशुपत, चिंचवड, पुणे.
(साभार : ‘श्रीरामनामावली’ पुस्तकातून)
लेखांक ६ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1022648.html
बिदर (कर्नाटक) : महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळताच समाजकंटकांकडून श्रीरामाचा अवमान !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
‘सनातन क्रांती’ची नांदी !