इराणने पाकिस्तानी नौकेला हॉर्मुझ पार करण्यापासून रोखले !

युद्ध झाल्यापासून भारताच्या ५ नौकांनी आधीच पार केले आहे हॉर्मुझ

तेल अवीव/तेहरान/वॉशिंग्टन – अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाला आता २६ दिवस झाले आहेत. या युद्धाला रोखण्यासाठी पाकिस्तानने मध्यस्थीसाठी पुढाकार घेतल्याचे समोर आले असतांनाही इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ सैन्याने पाकच्या कराचीकडे जाणार्‍या एका नौकेला हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करण्यापासून रोखले. सैन्याने म्हटले की, ‘सेलेन’ नावाच्या पाकच्या नौकेला आधी इराणी अधिकार्‍यांकडून अनुमती घ्यावी लागेल. पाकिस्तानी भूराजकीय विशेषज्ञांनी यावर टीका करत म्हटले की, गेल्या ४ आठवड्यांत भारताचे तब्बल ५ एल्.पी.जी. आणि तेल टँकर हॉर्मुझमधून गेले आहेत.

भारताच्या या ५ नौकांनी पार केले हॉर्मुझ !

१. जग वसंत

२. पाईन गॅस

३. शिवालिक

४. नंदादेवी

५. जग लाडकी

इराणमध्ये झाला सत्तापालट ! – ट्रम्प यांच्या दाव्यांचे सत्र चालूच

ट्रम्प म्हणाले,

१. इराणने अण्वस्त्रे विकसित न करण्यावर पूर्णपणे स्वीकृती दर्शवली.

२. इराण तडजोडीसाठी सिद्ध झाला आहे. या वाटाघाटींचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स, परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ, स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर करत आहेत.

३. इराणच्या नेतृत्वात आधीच मोठे पालट झाले आहेत. याला ‘सत्तापालट’च म्हणता येईल. इराणचे नवीन नेते अगदी वेगळे आहेत.

इराणने दावे फेटाळले !

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई म्हणाले की,

१. ट्रम्प यांच्या चर्चा आणि राजनैतिक वाटाघाटींच्या दाव्यांवर विश्वास ठेवता येणार नाही.

२. गेल्या काही दिवसांपासून मध्यस्थीचे संदेश येत आहेत. आम्ही प्रतिसादही दिला आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे – ‘आम्ही आमचे संरक्षण करत राहू.’

३. अमेरिकेनेच हे युद्ध चालू केले आणि ती सतत आक्रमणे करत आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या या दाव्यावर कुणी विश्वास ठेवू शकेल का ?

‘न्यूयॉर्क टाइम्स’चा दावा : सौदी अरेबियाने ट्रम्प यांना इराणवरील आक्रमणे चालू ठेवण्यास सांगितले !

सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान यांनी डॉनल्ड ट्रम्प यांना इराणवर आक्रमणे चालू ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, इराणचे सध्याचे सरकार उलथवून टाकले पाहिजे. मध्यपूर्वेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे.

सौदी अरेबियाने फेटाळला दावा

तथापि सौदी सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. ‘संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढणे’, हेच आमचे अधिकृत धोरण आहे आणि युद्धाची तीव्रता वाढवण्याच्या बाजूने आम्ही नाही’, असे सौदी सरकारने म्हटले आहे.

युद्धासंबंधी ५ देशांच्या भूमिका !

चीन : चीनने इराणला लवकरात लवकर शांतता चर्चा चालू करण्याचे केले आवाहन : सर्व वाद संवाद आणि मुत्सद्देगिरी यांद्वारे सोडवा !

इराण : इराणला केवळ तात्पुरता युद्धविराम नको, तर संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा हवा ! – इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची

सौदी अरेबिया : युद्ध संपावे; पण इराणची क्षेपणास्त्र शक्ती नष्ट झालीच पाहिजे. आम्ही एका आक्रमक शेजार्‍यासह राहू शकत नाही. तथापि इराणच्या नागरी पायाभूत सुविधा किंवा सामान्य जनतेला हानी पोचवण्याच्या बाजूने आम्ही नाही.

इराक : इराकला युद्धात ओढण्याच्या आणि त्याच्या भूमीवर आक्रमण करण्याच्या अमेरिका अन् इराण यांच्या प्रयत्नांचा इराकने निषेध केला. पंतप्रधान कार्यालयाने दोन्ही देशांच्या राजदूतांना जाब विचारला.

युरोपियन युनियन (ईयू) : ‘ईयू’ने रशियाच्या तेलावरील कायमस्वरूपी बंदी स्थगित केली आहे. हा प्रस्ताव मूलतः १५ एप्रिलला सादर होणार होता; परंतु आता तो पुढे ढकलण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानवर इराणमुळेही नामुष्की ! भुकेकंगाल आणि आर्थिक डबघाईला लागलेल्या पाकचा याहून अधिक अवमान तो कोणता ?