एकत्रित सूर्यनमस्कार घातल्याने लक्षात आलेले लाभ !

‘२५.१२.२०२५ ते २५.१.२०२६ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात प्रतिदिन १ घंटा निवडक साधकांसाठी सूर्यनमस्कार वर्ग घेण्यात आला. ‘साधकांची सूर्यनमस्कार घालण्याची क्षमता वाढावी आणि त्यातून मिळणारे शारीरिक अन् मानसिक लाभ त्यांनी अनुभवावे, तसेच साधकांनी नियमित व्यायाम आणि सूर्यनमस्कार घालावेत’, हा या वर्गाचा उद्देश होता. सूर्यनमस्कार नियमित घालणार्‍या साधकांना या वर्गात सहभागी केले होते. या वर्गात १८ – ७२ पर्यंत वयाचे एकूण १५ साधक आणि साधिका सहभागी झाले होते. 


१. सूर्यनमस्कार वर्ग घेण्याचे कारण !

साधक आपापल्या स्तरावर विचार करत की, ‘एकटे व्यायाम करतांना ‘काहीतरी त्रास होईल’, अशी भीती, क्षमतेचा अंदाज नसणे, प्रेरणा न्यून पडणे, वेळेचे कारण सांगणे, व्यायाम अपेक्षित इतक्या तीव्रतेचा होत नाही’, अशी विचारप्रक्रिया व्यायाम करणार्‍यांच्या संदर्भात बर्‍याचदा होत असते. यासाठी उपाययोजना म्हणून सूर्यनमस्काराचा वर्ग घेण्याचे ठरवले.

२. वैयक्तिकरित्या आणि एकत्रितपणे सूर्यनमस्कार घालतांना साधकांची झालेली विचारप्रक्रिया !

२ अ. वैयक्तिकरित्या सूर्यनमस्कार घालतांना झालेली विचारप्रक्रिया ! : साधक दिवसाला ५, ७ आणि अधिकाधिक १२ सूर्यनमस्कार घालत होते. सूर्यनमस्कारांची संख्या न वाढवण्यामागे साधकांची विचारप्रक्रिया पुढे दिली आहे.

१. माझी आणखी घालण्याची क्षमताच नाही.

२. आता मी दमलो आहे.

३. आणखी घातले, तर मला विश्रांती घ्यावी लागेल.

४. अधिक वेळ देता येणार नाही.

५. आणखी घातले, तर ‘गुडघेदुखी, खांदेदुखी इत्यादी होईल’, अशी भीती वाटते.

२ आ. एकत्रित सूर्यनमस्कार घालतांना झालेली विचारप्रक्रिया !

१. इतर सर्व जण घालत आहेत, तर मीही प्रयत्न करायला हवा. ‘माझीही क्षमता असू शकते’, ‘आपण थोडे घालून तरी पाहूया.’

२. एकत्रित घालतांना स्वतःकडे किंवा स्वतःच्या त्रासाकडे लक्ष न्यून असते. त्यामुळे ‘आपण दमलो आहोत’, याची जाणीव उशिरा होते किंवा न्यून होते.

३. इतर साधकही इतके सूर्यनमस्कार घालत आहेत, तर त्यांना कुठे विश्रांती घ्यावी लागते. मीही थोडे घालून पहातो. काही झाले, तर वर्ग घेणार्‍यांचे लक्ष आहेच ना !

४. ‍वर्गाचा कालावधी प्रतिदिनच्या नियोजनातच असल्याने ‘वेळ देता येत नाही’, हे कारण लागू पडत नव्हते.

५. काही त्रास झालाच, तर लगेच वर्ग घेणार्‍यांना सांगू शकतो. त्यामुळे चिंता वाटत नाही.

अशा पद्धतीने सर्व अडचणींवर उपाययोजना लागू पडल्यामुळे साधक एकत्रितपणे अधिक संख्येने सूर्यनमस्कार घालू शकले. इतकेच नव्हे, तर रथसप्तमी नंतरही अनेक साधकांनी नियमितपणे सूर्यनमस्कार चालू ठेवले.

श्री. निमिष म्हात्रे

३. सूर्यनमस्कार वर्ग चालू केल्यावर लक्षात आलेले सूत्र

काही साधकांनी स्वतःच्या वेळेत, तर काही साधकांनी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत एकत्र येऊन सूर्यनमस्कार घालायला चालू केले.

४. टप्प्याटप्प्याने सूर्यनमस्कार वाढवणे

वर्गामध्ये प्राणायाम आणि व्यायामापूर्वी शरिराचे तापमान वाढवून (वॉर्म-अप) मग सूर्यनमस्कार घालत होतो. ‘सूर्यनमस्कार घालणे आनंददायी व्हावे’, यासाठी संगीताच्या तालावर सूर्यनमस्कार घालायला सांगितले होते. वैयक्तिकरित्या घालणार्‍यांना त्यांच्या क्षमतेनुसार प्रतिदिन २ – ३ सूर्यनमस्कार वाढ‌वण्याचे ध्येय दिले.

अ. पहिल्या आठवड्यात योग्य पद्धतीने अधिकाधिक २५ सूर्यनमस्कार घालण्याकडे कल होता.

आ. दुसर्‍या आठवड्यापासून सूर्यनमस्कारांची संख्या वाढवू लागलो.

इ. शेवटच्या आठवड्यात एकत्रित सूर्यनमस्कार घालणार्‍यांची संख्या ८० पर्यंत गेली, तर वैयक्तिकरित्या घालणार्‍यांची संख्या साधारण ४० – ५० इतकी झाली.

ई. रथसप्तमीला, म्हणजे शेवटच्या दिवशी वर्गाला येणार्‍या आणि वैयक्तिकरित्या घालणार्‍या सर्वच साधकांना एकत्रित बोलावले. एकूण १७ साधकांनी एकत्रित सूर्यनमस्कार घातले. यामध्ये १० साधकांनी १०८, तर ७ साधकांनी ५० पेक्षा अधिक सूर्यनमस्कार घातले.

५. सूर्यनमस्कार घातल्यामुळे साधकांना झालेले लाभ !

५ अ. वजन न्यून होणे : खाणे-पिणे यांत काहीच पालट न करता काही साधकांचे वजन न्यून झाले.

५ आ. वजन आणि शारीरिक क्षमता वाढणे : शरिराने कृश असलेल्या साधकांचे वजन आणि शारीरिक क्षमता वाढली.

५ इ. पचनक्रिया : जवळजवळ सर्वच साधकांची भूक आणि पचनक्रिया सुधारली.

५ ई. झोप : साधकांना चांगली झोप लागू लागली.

आपल्याला एकटे व्यायाम करतांना सातत्य ठेवणे कठीण वाटत असल्यास किंवा व्यायामात आवश्यक ती वाढ होत नसल्यास एकत्रित व्यायामात सहभागी होऊन तुम्हीही व्यायामाचा लाभ घेऊ शकता !’

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (२.३.२०२६)

🪷 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷