‘श्रीरामनवमी’च्या निमित्ताने ‘श्रीरामनामावली’ सदर !
लेखांक ४
वेदकालात प्रत्यक्ष समोरासमोर भेटल्यावर अशी रित होती की, आधी आपला कुलवृत्तांत सांगून नंतर स्वतःचे नाव सांगायचे आणि समोरच्याला व्यवस्थित ओळख करून द्यायची. मी अमुक एक कुळातील आहे. हे माझे पिता असून त्यांचे अमुक हे नाव आहे. त्याच प्रथेप्रमाणे रामनामावली गातांना श्रीसमर्थ रामदासस्वामी सर्वांत आधी निर्गुण रामतत्त्वाचा जयजयकार करतात. नंतर सगुणाचा जयजयकार, त्यानंतर त्या परमतत्त्वाने घेतलेल्या दशावताराचे गायन केल्यावर राम आणि कृष्ण दोन वेगळे अवतार असले, तरी मूळ एकच हे दाखवून दिले अन् त्याच अवतार मालिकेतील सगुण राम, त्याचा वंश याची ओळख करून घेतली. आता रामाचे पिताश्री राजा दशरथ यांची थोडी ओळख आपण करून घेऊया.
लेखांक ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1021550.html

प्रभु श्रीरामाच्या जन्मापूर्वीच माता-पित्याची योजना
फार पूर्वी सत्ययुगात राजा मनु आणि राणी शतरूपा यांना आदिनारायणाच्या भेटीची ओढ लागली. राज्यकारभार मुलाच्या हाती सोपवून ते अरण्यात गेले आणि अत्यंत कठीण तपाचरण करू लागले. अन्नपाण्याचा त्याग केला. कित्येक वर्षे उभयतांनी कठोर तपाचरण केल्यानंतर त्यांना भगवंताने दर्शन दिले. भगवंताच्या त्या अतीसुंदर रूपाने राजा गदगद झाला. राजाने भारावलेल्या अवस्थेत ‘मला तुमच्यासारखाच पुत्र व्हावा’, असे मागणे मागितले. राणी शतरूपाने पतीच्या म्हणण्याला दुजोरा दिला. भगवंताने त्यांना ‘पुत्ररूपाने मीच तुमच्या पोटी अवतार घेईन’, असा वर दिला. पुढच्या जन्मात हेच उभयता राजा दशरथ आणि राणी कौसल्या झाले अन् भगवंताच्या वराने त्या उभयतांना जगत्नियंत्याचे, म्हणजेच श्रीरामाचे मात-पिता होण्याचे भाग्य लाभले. संत तुलसीदास यांच्या ‘रामचरितमानस’मध्ये आणखी एक उल्लेख असा आहे, ‘कस्यप अदिति तहाँ पितु माता । दसरथ कौसल्या बिख्याता ।।’ पूर्वजन्मीचे महर्षि कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती हेच राजा दशरथ अन् राणी कौसल्या आहेत. अशा प्रकारे श्रीराम जन्मापूर्वीच माता-पित्याची योजना झालेली आहे.

दशरथाचे गुण आणि त्याच्या नावाचा भावार्थ
सूर्यवंशातील अनेक महान राजांप्रमाणेच अत्यंत पुण्यवान, पराक्रमी आणि लोकोत्तर, असे राजा दशरथाचे चरित्र आहे. दशरथ म्हणजे ज्याच्या रथाला १० अश्व आहेत तो ! ‘भावार्थ रामायणा’त दशरथ हे एक रूपक मानले आहे. त्याचे असे वर्णन येते की, शरीर हा रथ, बुद्धी ही सारथी, मन हा लगाम, स्वतःची दशेंद्रिये (५ कर्मेंद्रिये आणि ५ ज्ञानेंद्रिये) हे १० अश्व. या अश्वांच्या साहाय्याने गतीमान असलेला हा रथ नित्य विषय सेवनात दंग असतो. रघुकुलातील अज राजाचा पुत्र राजा दशरथ हा वेदवेत्ता, चतुर, बुद्धीमान, जनप्रिय, सत्यप्रिय, संस्कारी, प्रजाहितदक्ष आणि पराक्रमी राजा आहे. हृदयाची श्रीमंती आणि स्वभावातील सरलता हे दशरथाचे विशेष गुण आहेत. कर्तव्य, सत्य आणि तत्त्व यांची निष्ठा पुरेपूर असणार्या राजा दशरथाकडे राजकारण्यांच्या धूर्तपणाचा मात्र अभाव आहे.
हा सरलपणाच भगवंताला विशेष आवडतो. स्वतः श्रीरामाला ‘दशरथपुत्र’ म्हणवून घेण्यात धन्यता वाटते; म्हणून श्रीसमर्थ म्हणतात, ‘दशरथनंदन जय जय राम ।’
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
– श्रीमती स्नेहल पाशुपत, चिंचवड, पुणे.
(साभार : ‘श्रीरामनामावली’ पुस्तकातून)
लेखांक ५ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1022263.html
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !