गुरुकार्याची तीव्र तळमळ असणार्‍या बेळगाव येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) पुष्पा बालवीरसिंग यादव (वय ६९ वर्षे) !

२४.२.२०२६ या दिवशी बेळगाव येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पुष्पा बालवीरसिंग यादव (वय ६९ वर्षे) यांचे निधन झाले. २६.३.२०२६ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुली आणि एक साधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्या रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कै. (सौ.) पुष्पा बालवीरसिंग यादव

१. सौ. नीलम यादव (कै. (सौ.) पुष्पा यादव यांची मोठी मुलगी), आग्रा, उत्तरप्रदेश.

१ अ. शिस्तबद्ध जीवन : ‘माझी आई सौ. पुष्पा यादव हिचे जीवन अतिशय शिस्तबद्ध होते. ती दैनंदिन कृती वेळेतच करत असे. कितीही शारीरिक त्रास होत असला, तरी ती रात्री दात घासूनच झोपत असे. ती निरोगी असतांना नियमितपणे व्यायाम करत असे आणि आम्हालाही त्यासाठी प्रेरित करत असे.

१ आ. ती आम्हा सर्व भावंडांना समान वागणूक देत असे. एखाद्याकडून चूक झाली, तर ती सर्वांना समान रितीने समज देत असे.

१ इ. प्रेमभाव : ती नेहमी सर्वांच्या आरोग्याची विचारपूस करत असे. घरी पाहुणे आल्यावर त्यांना पेठेतील पदार्थ देण्याऐवजी ती त्यांना स्वतः पदार्थ बनवून प्रेमाने खाऊ घालत असे. आमचे आग्रा जिल्ह्यातील राणीपूर येथे मोठे एकत्र कुटुंब आहे. तेथेही ती सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागत असे. गावातील नातेवाइकांनाही ती अत्यंत प्रिय होती. आजही आम्ही गावाला गेलो की, लोक तिची आठवण काढून तिचे कौतुक करतात. गावात असतांनाही ती सर्वांसाठी प्रेमाने जेवण बनवत असे. तिने बनवलेले जेवण सर्वांना अतिशय आवडत असे.

१ ई. तिने भूमी, घर किंवा संपत्ती या संदर्भात कोणाशीही कधीही वाद घातला नाही किंवा मनात दुःख ठेवले नाही.

१ उ. कुटुंबियांना साधना करण्यास प्रवृत्त करणे : तिने आम्हाला ‘कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप कसा करायचा ?’, हे शिकवले. तिचे साधनामय जीवन पाहून आम्हालाही साधना करण्याची प्रेरणा मिळत असे. आज मी साधनेशी जोडली गेल्याचे पूर्ण श्रेय माझ्या आईला जाते. माझी आईच माझ्या जीवनातील सर्वांत मोठी प्रेरणा आणि आदर्श आहे.

१ ऊ. सेवेची तळमळ : ती घरातील सर्व कामे अत्यंत वेगाने पूर्ण करत असे आणि त्यानंतर प्रसारासाठी बाहेर पडत असे. ती ग्रंथप्रदर्शन लावण्याचीही सेवा करत असे. तिच्या जीवनातील प्रत्येक क्षण साधना आणि गुरुकार्यासाठी समर्पित होता.

सौ. नीलम यादव

१ ए. रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे

१ ए १. आनंदी आणि सकारात्मक असणे : वर्ष २०१३ मध्ये तिला पक्षघाताचा झटका आला, तरीही ‘तिच्याशी बोलतांना तिला शारीरिक त्रास होत आहे’, असे मला जाणवत नसे. त्या स्थितीतही ती नेहमी आनंदी आणि सकारात्मक रहात असे. जीवनाच्या शेवटच्या काळातही ती अत्यंत शांत आणि स्थिर होती. तिच्या जवळ बसल्यावर माझ्या मनाला समाधान मिळत असे.

१ ए २. साधनेविषयी बोलणे : ती जेव्हा माझ्याशी भ्रमणभाषवर बोलत असे, तेव्हा बर्‍याच वेळा साधनेविषयी चर्चा करत असे. तिला व्यावहारिक विषयांपेक्षा आध्यात्मिक विषयावर बोलण्यात अधिक आनंद वाटत असे. वर्ष २०२५ मध्ये झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’विषयी तिने मला उत्सुकतेने विचारले आणि त्याविषयी माझ्याशी बराच वेळ चर्चा केली.

१ ए ३. आई प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकणे, तसेच मीठ-पाण्याचे पाणी, अत्तर आणि कापूर यांचे उपाय अत्यंत निष्ठेने करत असे.

माझ्या आईचे जीवन आम्हाला शिकवते की, साधना, शिस्त, प्रेम आणि सेवा यांच्या आधारे जीवन अत्यंत सुंदर अन् अर्थपूर्ण बनू शकते. ती आज आमच्यात नसली, तरी तिचे संस्कार, शिकवण आणि प्रेरणा आमच्या समवेत सदैव राहील.’

२. सौ. ललिता यादव (कै. (सौ.) पुष्पा यादव यांची धाकटी मुलगी), आग्रा, उत्तरप्रदेश. 

२ अ. अध्यात्मप्रसाराची तळमळ

२ अ १. प्रवासातही लोकांना साधना सांगणे : ‘आईला थोडासा वेळ मिळाला, तरी ती तो वेळ समष्टी सेवेसाठी वापरत असे. मार्गात किंवा प्रवासात ओळखीचे कोणी भेटले, तर आई त्याला कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप सांगून साधनेसाठी प्रेरित करत असे. आई आमच्या मूळ गावी आग्रा (उत्तरप्रदेश) येथे जातांना बॅगेत सनातनचे ग्रंथ, नामपट्ट्या आणि अन्य प्रसारसाहित्य घेऊन जात असे. ती प्रवासात किंवा प्रत्यक्षात जो कोणी भेटेल, त्याला मराठी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा वर्गणीदार बनवत असे आणि गुरुकार्याचे महत्त्वही सांगत असे.

२ अ २. आईने प्रवाशाचे हरवलेले पाकीट त्याला देणे आिण त्याने आईला पैसे देऊ केल्यावर आईने त्याला साधना सांगून ‘सनातन प्रभात’चा वर्गणीदार करून घेणे : एकदा आगगाडीच्या प्रवासात एका व्यक्तीचे पाकीट प्रसाधनगृहात राहिले होते. ते आईला मिळाले आणि तिने ते माझ्या वडिलांना दाखवले. त्यामध्ये आधार कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. आई-वडिलांनी त्यातील दूरभाष क्रमांक शोधून त्या व्यक्तीला संपर्क केला आणि तिला पाकीट घेण्यासाठी बोलावले. ते भारतीय सैनिक होते आणि सुटी मिळाल्यामुळे घरी जात होते. हरवलेले पाकीट परत मिळाल्याने त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी आईला एक सहस्र रुपये देऊ केले; परंतु आई त्यांना म्हणाली, ‘‘मला पैसे नको. या पैशात तुम्ही मराठी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार व्हा आणि सात्त्विक उत्पादने घ्या.’’ हे ऐकून त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यानंतर आईने त्यांना कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करण्यास सांगितले.

२ आ. कुटुंबियांचा विरोध असतांनाही साधना आणि सेवा चालू ठेवणे : त्या काळात माझे वडील आईच्या साधनेला विरोध करत असत, तरीही आईने त्यांच्या विरोधाची पर्वा न करता सेवा आणि साधना चालू ठेवली. एकदा आई आग्रा जिल्ह्यातील राणीपूर या गावी गेली होती. तेथे भागवत कथा चालू होती. आमच्या परंपरेनुसार स्त्रिया पडद्यामध्ये रहातात, तरीही आईने व्यासपिठावर जाऊन सत्संग घेण्याची अनुमती मागितली आणि तेथील उपस्थित लोकांना कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करण्यास सांगितले. त्या वेळी आमचे आजोबा (आईचे सासरे श्री. लाखनसिंग यादव) तेथे बसले होते. त्यांनी घरी आल्यावर आईला विरोध दर्शवला, तरीही आईची साधना आणि गुरुकार्याविषयीची तळमळ इतकी प्रबळ होती की, तिने या विरोधाकडे दुर्लक्ष करून सेवा अन् साधना चालूच ठेवली.

सौ. ललिता यादव

२ इ. रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे

२ इ १. रुग्णालयातही इतरांना साधना सांगणे : वर्ष २०१३ मध्ये आईला पक्षघाताचा पहिला झटका आला. त्या वेळी तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. गुरुकृपेने तिसर्‍या दिवशी तिला शुद्ध आली. काही कालावधीनंतर तिला पुन्हा पक्षघाताचा झटका आला. त्यामुळे तिचा डावा हात आणि पाय निकामी झाला. ती रुग्णालयात असतांना नातेवाईक आणि परिचित तिला भेटायला येत असत. एकदा तिथे वडिलांचे एक मित्र भेटायला आले होते. आईने त्यांना विचारले, ‘‘या वर्षी तुम्ही सनातनचे किती पंचांग घेणार ?’’ हे ऐकून ते हसले आणि वडिलांना म्हणाले, ‘‘आपण दोघे छोटे व्यापारी आहोत. खर्‍या व्यापारी वहिनीच आहेत; कारण या स्थितीतही त्या पंचांगाविषयी विचारत आहेत.’’ रुग्णाईत असतांनाही आईने नामजप करणे आणि इतरांना साधना सांगणे चालू ठेवले. ती भ्रमणभाष करून लोकांना साधनेसाठी प्रेरित करत असे.

२ इ २. भाव : आईच्या मनात गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) अपार भाव होता. अनुमाने १३ वर्षे तिने तीव्र शारीरिक वेदना सहन केल्या; परंतु तिचा गुरूंप्रतीचा भाव आणि श्रद्धा कधीही न्यून झाली नाही.

२ इ ३. एकदा पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४९ वर्षे) आईला भेटायला आल्यावर आई म्हणाली होती, ‘‘माझा देह संत होण्यासाठीच आहे. त्यासाठी उशीर झाला, तरी चालेल.’’

आईचे जीवन हे साधना, सेवा, त्याग आणि गुरुभक्ती यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे.’

३. सौ. अर्चना घनवट (साधिका), बेळगाव, कर्नाटक.

३ अ. रुग्णाईत असतांना वेदना होत असूनही स्थिर रहाणे : ‘सौ. पुष्पा यादवकाकूंना पक्षघाताचा झटका आल्याने त्या १३ वर्षे अंथरुणावरच होत्या. त्यांना अन्य शारीरिक त्रासही होते. त्यांच्या दोन्ही पायांना पुष्कळ सूज आली होती. त्यांना उठवून बसवावे लागत होते. त्यांना वेदना होत असूनही त्यांच्या चेहर्‍यावर कसलाच त्रास जाणवत नव्हता. त्या पुष्कळ स्थिर होत्या.

३ आ. प्रेमभाव : त्यांना अधिक बोलता येत नव्हते, तरीही आम्ही भेटायला गेल्यावर त्या त्यांच्या मुलीला आम्हाला चहा आणि अल्पाहार देण्यास सांगत असत.

३ इ. एकदा मी काकूंना विचारले, ‘‘तुम्ही परम पूज्यांशी बोलत आहात ना ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी श्रीकृष्णाला सर्व सांगते आणि त्याच्याशी बोलते.’’

३ ई. एकदा सद्गुरु स्वाती खाडये त्यांना भेटायला गेल्या होत्या. तेव्हा ‘काकूंचा चेहरा पुष्कळ आनंदी झाला आणि त्यांच्या चेहर्‍यावरील तेज वाढले’, असे मला जाणवले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १८.३.२०२६)