१ गाय वाचल्यास एका शेतकर्‍याची आत्महत्या थांबेल ! – अभिनेते प्रवीण तरडे

पुणे – गायीचे दूध संपल्यानंतरही पुढील १० वर्षे ती गोमूत्र आणि शेण यांच्या माध्यमातून एका कुटुंबाला जगवू शकते. १ गाय वाचल्यास एका शेतकर्‍याची आत्महत्या थांबेल आणि त्यातून महाराष्ट्र खर्‍या अर्थाने समृद्ध होईल. गायीच्या डोळ्यांतील कारुण्य शेतकर्‍याला जगण्याची नवी प्रेरणा देईल. त्यामुळे दूध आटले की, गाय खाटिकाकडे पाठवणे, हा प्रकार आता थांबला पाहिजे, असे मत प्रसिद्ध अभिनेते श्री. प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले. येथील कृषी महाविद्यालय मैदानावर आयोजित ‘गौ टेक २०२६’ या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे विचार मांडले. या प्रसंगी व्यासपिठावर जैन आचार्य योगेश मुनीजी, डॉ. विलास खर्चे, भाजपचे आमदार हेमंत रासने आणि डॉ. वल्लभभाई कथिरिया उपस्थित होते.

येथे होणार्‍या वैचारिक मंथनात ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनीही सहभाग नोंदवला असून त्यांनी गो-आधारित अर्थव्यवस्थेवर भर दिला.

फॅमिली डॉक्टर’ प्रमाणे प्रत्येकाचा एक ‘फॅमिली फार्मर’ हवा ! – शालिनी कडू

जसा आपला ‘फॅमिली डॉक्टर’ असतो, तसाच आता प्रत्येकाचा एक ‘फॅमिली फार्मर’ असायला हवा, जो थेट शेतातील शुद्ध भाजीपाला, धान्य आणि दूध तुमच्यापर्यंत पोचवेल, असे प्रेरक आवाहन ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’च्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी ‘गौ टेक २०२६’ मधील महिला संमेलनात केले. सुटीत बाहेर फिरायला जाण्याऐवजी कुटुंबासह शेतकर्‍याच्या शेतावर जाऊन तेथील गोपालन आणि नैसर्गिक शेतीची पद्धत प्रत्यक्ष समजून घेतल्यास अन्नाच्या शुद्धतेची निश्चिती पटेल; तसेच यामुळे शेतकर्‍यांना जैविक शेती आणि गो-संवर्धनासाठी मोठे प्रोत्साहन मिळून ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ मिळेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी गो-आधारित उद्योगांना जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ! 

या महोत्सवात भारताच्या विविध प्रांतांतील देशी गायींच्या जातींचे प्रत्यक्ष दर्शन घडवले जात आहे. आयुर्वेद आणि पंचगव्य आधारित उपचारपद्धतींचे सादरीकरण हे मुख्य आकर्षण ठरत आहे. पारंपरिक भारतीय ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा सुरेख संगम येथे पहायला मिळत आहे.

मान्यवरांचे मार्गदर्शन !

जैन आचार्य योगेश मुनीजी – आपल्या जीवनात भारतमाता, जन्मदात्री माता आणि गोमाता या तिन्ही मातांचे स्थान सर्वोच्च आहे. आपण आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केल्यास गोसंवर्धन प्रभावीपणे करणे शक्य होईल. प्रत्येकाच्या मनात गोमातेविषयी कृतज्ञतेचा भाव असणे आवश्यक आहे.

डॉ. विलास खर्चे, कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ – शेतीमध्ये गोमातेचे योगदान अनन्यसाधारण आहे. सध्या रासायनिक खतांच्या अतीवापरामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. हा धोका टाळण्यासाठी ‘प्राकृतिक शेती’ हाच शाश्वत पर्याय असून महात्मा फुले कृषी विद्यापिठामध्ये या संदर्भात यशस्वी संशोधन चालू आहे.

श्री. हेमंत रासने, आमदार, भाजप – गायीपासून मिळणार्‍या विविध उपपदार्थांचे आर्थिक महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रभावीपणे होत आहे.