‘श्रीरामनवमी’च्या निमित्ताने ‘श्रीरामनामावली’ सदर !
लेखांक २
जगत्चालक परब्रह्म शक्ती निर्गुण-निराकारच आहे. निर्गुण-सगुण या तर एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. अव्यक्त ते निर्गुण आणि जेव्हा व्यक्त होते ते सगुण. व्यक्तात त्या अव्यक्त निर्गुण अस्तित्वाची आपल्याला कल्पनासुद्धा करता येत नाही; कारण कल्पना करणारे आम्ही सगुण आणि आकारात आहोत. आमच्या डोळ्यांना जे दिसत नाही, त्याची कल्पना कशी करणार ? म्हणून आम्ही देवाला आपल्याप्रमाणे समजून तशी कल्पना करून आकारात आणतो. ‘आमच्यापेक्षा देव अधिक शक्तीमान आहे, अधिक कर्तृत्ववान आहे’, या विचाराने आमच्या कल्पनेत आम्ही देवाला दोन हात अधिकचे कल्पिले आणि देवाची मूर्ती घडवली. श्रीराम हा राजा आहे. आमच्या शास्त्रात राजा विष्णुरूप आहे. तेव्हा अयोध्येचा हा राजा विष्णूचा अवतार आहे.
लेखांक १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020452.html

अवतार संकल्पना
आता अवतार संकल्पना जरा समजून घेऊया. मूळ निर्गुण परब्रह्म सगुणात येते, म्हणजे परमात्मा अवतरतो. अवतरण म्हणजे खाली उतरणे. ‘भक्ताचिया काजासाठी, साधुचिया प्रेमासाठी’ निर्गुण परमात्मा अवतरतो. ‘परित्राणाय साधूनाम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ८) म्हणजे ‘सज्जनांच्या उद्धारासाठी’ हेच अवताराचे प्रमुख कारण आहे. आपले सर्वाेच्च असे व्यापकत्व – अनंतत्व – निर्गुणत्व त्यागून पुन्हा संकुचित होत खाली येणे, म्हणजे सगुणात येणे. निर्गुण निराकारावर स्वतः रूपगुणांनी युक्त माणूस कसा प्रेम करणार ? माणसासमोर व्यक्त आणि सगुण साकार विग्रह हवा असतो. अंतःकरणातील भावना व्यक्त करण्यासाठी सगुण साकारच समोर लागते; म्हणूनच विठ्ठलाची सावळी मूर्ती पाहून संत त्यावर भाळतात आणि म्हणतात, ‘सावळे सुंदर रूप मनोहर ।’ श्री समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘रामदास म्हणे रामरूपावरीं । भावें मुक्ति चारी ओवाळीन ।।’ आपल्या आराध्याचे रूप भक्ताला वेड लावते. श्रीराम तर भक्ताच्या या सगळ्या अपेक्षापूर्तीचे मूर्तीमंत अधिष्ठान आहे. ते निर्गुण परब्रह्म पूर्वजन्मातील मनु-शतरूपाला दिलेल्या वचनपूर्तीसाठी कौसल्यामातेला मातृत्व बहाल करते. दशरथाच्या अंगणात ४ वेदच जणू बालकरूपात बाललीला करतात. या बाललीला पाहून राजा दशरथाला त्रिखंडातील एकच समाधान मिळते.
सहस्रो वर्षांनंतर आजही रामराज्य आणि प्रभु श्रीराम आदर्श कसे ?

महर्षि वाल्मीकिंना राजा रामामध्ये ब्रह्मांडातील सर्व दैवी गुणसंपदा एकवटलेली दिसते. परब्रह्म जेव्हा सगुण रूपात अवतरते, तेव्हा ते सर्व गुणांनी परिपूर्ण (संपन्न) असते. सगळ्यात रमणारा आणि सगळ्यांना स्वतःच्या उत्तम गुणांनी मोहवणारा, रमवणारा श्रीराम राजा झाल्यावर केवळ आपल्या प्रजाजनात लोकप्रिय नाही, तर स्वतःच्या शौर्याने सद्गुणांनी अवघ्या विश्वात लोकप्रिय राजा होतो. सहस्रो वर्षांनंतर आजही आदर्श राज्य कसे ? तर रामराज्य हाच मापदंड लावला जातो. मर्यादापुरुषोत्तम राम अनेक गोष्टींत आदर्श आहे. कौटुंबिक जीवनात तो आदर्श पुत्र, आदर्श बंधू आणि आदर्श पती आहे. समाज जीवनात आदर्श सवंगडी आणि आदर्श सखा आहे. राजकीय जीवनात तो आदर्श प्रजाहितदक्ष राजा आहेच, त्यासह मुत्सद्दी राजकारणी आहे. आदर्श शत्रू आहे आणि हे सगळे आदर्शाचे उच्चांक आजही सहस्रो वर्षे झाली, तरी श्रीरामाच्याच नावावर आहेत. श्रीराम रावणासारख्या शत्रूलाही मृत्यूदंड दिल्यावर मुक्ती प्रदान करतो. श्रीराम दासाभिमानी आहे, याचे अनेक दाखले मनोबोधात श्रीसमर्थ देतात. श्रीसमर्थ म्हणतात,
राघवाच्या गुणा न दिसे तुळणा । कैलासीचा राणा लाचावला ।। – ‘मनोबोध’
असे आपले श्रीरामराय निर्गुण आणि सगुण दोनही रूपात आपल्या भक्ताचे मनोवांच्छित पूर्ण करून त्याला अखंड समाधान अन् परमानंद यांचा धनी बनवतात; म्हणून श्रीसमर्थ आदराने म्हणतात, ‘सगुणरूप जय जय राम.’
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
– श्रीमती स्नेहल पाशुपत, चिंचवड, पुणे.
(साभार : ‘श्रीरामनामावली’ पुस्तकातून)
लेखांक ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1021550.html
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !