२६ मार्च या दिवशी ‘श्रीरामनवमी’ आहे. त्या निमित्ताने प्रतिदिन वाचा ‘श्रीरामनामावली’ सदर !
(लेखांक १)
‘अनेक देवीदेवतांच्या नामावली प्रसिद्ध आहेत. ‘विष्णुसहस्रनाम’, ‘ललितसहस्रनाम’, ‘शिवसहस्रनाम’ हे जनमानसात लोकप्रिय आहेत. त्याखेरीज अनेक शतनामावली, अष्टके प्रचलित आहेत. तीसुद्धा भावभक्तीने भक्त म्हणत असतात. समर्थ रामदासस्वामी यांच्या समर्थ संप्रदायात ‘श्रीरामनामावली’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. साधक दैनंदिन उपासनेत ही श्रीरामनामावली तालासुरात श्रद्धेने भावविभोर होऊन नित्य गातात. त्यातील पहिले नाम आहे निर्गुणरूप जय जय राम.
श्रीराम हे श्रीसमर्थ रामदासस्वामी यांचे आराध्य दैवत आहे. त्यासह श्रीराम त्यांचे सद्गुरु आहेत. श्रीराम म्हणजे साक्षात् परब्रह्म अशी त्यांची निष्ठा आहे. रामप्रेमाने त्यांचा रोमन्रोम ओथंबलेला आहे. राम कुणी व्यक्ती वा वस्तू नाही, तर चराचरात व्यापून असणारे चैतन्य म्हणजे राम. मनोबोधात श्रीसमर्थ म्हणतात, ‘रिता ठाव या राघवेवीण नाही ।।’ (मनोबोध, ओवी १९६)

निर्गुणाची व्याख्या आणि प्रभु श्रीराम शतकोटीचे बीजरूपी निर्गुण
अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे ते रामतत्त्व. श्रीसमर्थ या तत्त्वालाच ‘आत्माराम’ म्हणतात. हे तत्त्व एकाच वेळी सगुणही आणि निर्गुणही आहे. निर्गुण म्हणजे अमूर्त परब्रह्म. श्रीसमर्थांना शिष्य प्रश्न विचारतात, ‘निर्गुण म्हणजे काय ?’ श्रीसमर्थ उत्तर देतात, ‘निर्गुण म्हणजे गुणच नाही’ आणि अजून एके ठिकाणी म्हणतात, ‘निर्गुण म्हणजे बहुगुणी.’ याची संगती नेमकी कशी लावायची ?
एक छोटे बीज फोडून पाहिले, तर त्यात वृक्ष सापडत नाही; मात्र जर ते बीज भूमीत रूजवले, तर त्यातून रोपटे निर्माण होते. हळूहळू त्याचे वृक्षात रूपांतर होते. त्या वृक्षाला फुले अन् फळे लागतात. एका बीजापोटी वृक्ष, फुले आणि फळे निपजतात. त्यातील बीज हे निर्गुण; वृक्ष, फळे अन् फुले सगुण आहेत, तर राम हे शतकोटीचे बीज आहे, ‘एकोऽहं बहु स्यामः।’, म्हणजे ‘मी एक आहे, आता मी अनंत रूपांत प्रकट होईन.’

सृष्टीच्या मुळाशी रामतत्त्व आणि रामबीज
या मूळ स्फुरणातून हे दृश्यविश्व आकाराला आले. बहुगुणी झाले. अर्थात् निर्गुण हेच बहुगुणी आहे. ‘ॐ’ हे एकाक्षर ब्रह्म आहे आणि त्याचेच नाव ‘राम’ आहे. कधीही नाश न पावणारा असा याचा अर्थ. या निर्गुण निराकार रामतत्त्वात कोट्यवधी ब्रह्मांडे समावलेली आहेत. सकल शास्त्र आणि वर्णमाला यांचेही ते प्राणतत्त्व आहे. दृश्य विश्वातील पंचमहाभूते, सूर्य-चंद्र-तारे-सागर, वनस्पती, सजीव सृष्टी या सार्यांमध्ये कार्यरत असणारी जी शक्ती आहे, त्याच्या मुळाशी हे रामतत्त्व आणि रामबीज आहे. अविनाशी रूपाने हे तत्त्व एका रामबिजात एकवटलेले आहे. निर्गुणत्व हे सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. जेव्हा ते विशाल रूप घेते, तेव्हा त्यात दडलेले अनेक गुण बहुविधप्रकारे प्रकटतात; म्हणून ते बहुगुणी असते. वीज जशी अनेक उपकरणांतून कार्यरत असते; पण दिसत नाही, तसेच परब्रह्म तत्त्व हे रामतत्त्व सर्वांतर्यामी असून अदृश्य निर्गुण असते.
श्रीसमर्थ ‘मनोबोधा’त वर्णन करतात,
‘वसे हृदयी देव तो जाणा ऐसा । नभाचे परी व्यापकु जाण तैसा ।
सदा संचला येत ना जात काही । तयावीण कोठे रिता ठाव नाही ।।’ – मनोबोध, ओवी १९५
ॐ कार हे एकाक्षर ब्रह्म, तसेच राम हे निर्गुण, निराकार, अजः, अनंत विश्वाच्या उत्पत्तीचे कारण असलेल्या परब्रह्माची ओळख आहे; म्हणून श्रीसमर्थ त्या निर्गुणाचा जयजयकार करतांना म्हणतात, ‘निर्गुण रूप जय जय राम.’
(क्रमशः)
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
– श्रीमती स्नेहल पाशुपत, चिंचवड, पुणे.
(साभार : ‘श्रीरामनामावली’ पुस्तकातून)
लेखांक २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020732.html
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !